(गीति)
जातां जातां नगरीं, तेथुन राहे चतुर्थ कोस पुरी ।
गणपति वदे शिवाला, वस्ती करणें इथेंच फार बरी ॥१॥
आधीं धाडूं दूतां, सिंधूसी योग्य तें करुं साम ।
धाडावें कवणाला, योजित करिती अधीं असें काम ॥२॥
शृंगीप्रमथांदिक हे, योजावे वीरभद्र नी दत्त ।
असती क्रोधित भारी, यास्तव धाडूं गणांत जो शांत ॥३॥
गांभीर्ये योग्य असा, नंदी आहे तयास धाडावा ।
पुढला विचार कैसा, धाडुन सत्वर अधींच ऐकावा ॥४॥
तोरें नंदी गेला, गंडकि नगरीं प्रवेशिकाद्वारीं ।
नगरामध्यें जाउन, असुरसभें पातला नि साम करी ॥५॥