लावणी ७ वी - आवड हीच कीं तुझ्या बसावें...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
आवड हीच कीं तुझ्या बसावें सारा वेळ जवळी ।
चित्तापुन चाहतेस जिवलगे, तूं कमळण पिवळी ॥धृ०॥
रूपदर्शन संतुष्टवदन पाहतां रंभा पिवळी ।
चिरंजीव अक्षई तुझि गडे भर नौती टिकली ।
गोड बोल रसभरित, निबिड जैशीं द्राक्षें पिकलीं ।
स्त्रीमोहपाश कठीण, गुंतलो मायेच्या चिखलीं ।
तुजवरती मन तृप्त, फेरि चौर्यांशीची चुकली ।
मेजवान जीवप्राण, तुला गडे भरज्वानी विकली ।
चपळ अंग पाहतां जशी सर्पिण सदा वळवळी ॥१॥
काहींच बरें वाटेना, वाटते केव्हां उठून गाठूं ।
तिळशर्करा तशी उभयतां नित्य अपण भेटूं ।
अजवर जें जें केलें तें नको पाण्यामध्यें लोटूं ।
जवळ घेतल्यावर तदनंतर कंठ नको काटूं ।
चंद्रकांति लखलखित तुझें मुख प्रीतीनें चाटूं ।
तुजकरितां आतीतवेष घेऊन अवघी सृष्टी पकटूं ।
बिलगुन मिठी मारुं दे, वाजते थंडीची हिवळी ॥२॥
गुणमंडित वेल्हाळ बाळमुद्रा दिसते साधी ।
सुखसंपत्ती भोगितां जशी कल्पतरूची खांदी ।
दिव्य शरिर जल तेजल, केवळ मखमाली गादी ।
तुज पोटासी धरुन येकांतीं मग्न घ्यावी समाधी ।
उंच मलमल परल्याबरोबर नव्हे शेला खादी ।
कूलशिल शुद्ध, इमान जागवी लालन अशि एकादी ।
घरिं यावें कधिं सांग, दृष्टी पडशिल कोण्या वेळीं ? ॥३॥
सोडुन अष्टाधिकार कृतसंकल्प तुझेवर्ता ।
पहा पहा रमतों, फिरत फकिर जाहलों प्रीतीकरितां ।
बंगाला, सिंहलद्वीप, काशी नवखंड हेरतां ।
हे प्रतिबिंब दिसेना, श्रवणीं ही अनुचित वार्ता ।
ताबेदार प्रीतीचे, सबळ आश्रय चालिव पुरता ।
निराश तुजविण, काळ व्यर्थ जातो झुरतां झुरतां ।
क्षिरसागरिंचें गर्भरत्न ही परकांता कवळी ।
होनाजी बाळा म्हणे, ठेवी ह्रदयांतरकमळीं ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP