लावणी १५७ वी - लावून माया गेला राया । नू...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
लावून माया गेला राया । नूतन माझी कोमळ काया ॥धृ०॥
कर्मकथा ही सांगूं काई । या शरीराची होते लाही । राव राजेन्द्र माझे शिपाई । टाकून गेले, करू गत काई ? । भागवून फसविली गाई । किति आवरूं ? आज जातें पराई । जा ग सख्यांनो, आणा तयाला । दृष्टि पाहीन मी लागेन पाया ॥१॥
मी दिनवाणी, काय करावें ? । जाउनिया कवणासी धरावें ? । हें दुख आपलें किती अवरावें ? । धिक् धिक् माझें जिणें मरावें । धनद्रव्याला काय करावें ? । वाटे जीव पतिराज असावे । मी थोराची कोमळ जाया । गर्वहरण होइल पतिराया ॥२॥
त्याच्या चरणीं लोभ हा माझा । सोडूनिया कसा गेला राजा ? । पत्र पाठवा जलदी या जा । आम्हां सांगा कानिं आवाजा । जासूद जोडी जलदी जा जा । घेऊन या किती पहातां मौजा ? । फुरफुरल्या आज दोन्ही बाह्या । तनमनधन हें त्याच्या ठाया ॥३॥
ऐकुन ग्लानी प्राणसखीची । खुणमुद्रा ठसली नारीची । स्वारी परतली पहा रायाची । चमकत पुतळी रंग बहारीची । काय तारिफ सांगूं स्वरुपाची ? । भोग आतां, झाली अग्न देहाची । फडप्रसंगी उभा गुणिराया । रामा म्हणे, कर अर्पण काया ॥४॥
Last Updated : November 11, 2016
TOP