चालीव प्रीत माझ्या सजणा । प्राणसख्या गुणिजना ॥धृ०॥
माया ममता लाउन वचनीं गोउन मशीं जिवलगा । आशा फारशी लाउन जाशील देउन कुणीकडे दगा । मजपरीस तुला सवत चांगली कोण मिळाली ठगा ? ॥चाल॥ तिनें मोहनी घातली तुजला । पाहुन तिशीं तूं रिझला । म्हून त्यजिलें सख्या मजला ॥चाल॥ आतां काय मी करूं ? । किती ही भर नवती आवरूं ? । दावा राजहंस पांखरूं ।
जाऊन चरण कुणाचे धरूं । ? ॥चाल॥ सवतीनें घातलीं मोहनी, नेला स्वामी माझा फितवून । कोणाप न्यावी फिर्याद ? कोण माझी दाद देइल बेगीनं ? । ज्यापाशीं न्यावी फिर्याद तोच बाई बसला रुसुनशान । किती समजाऊं ? परी उमजेना ॥१॥
या रंगमहालीं शेज तुंसाठीं ठेविली करून । साजुक नाजुक कळ्या पिवळ्या हेत मनाचा धरून । चार प्रहर म्यां वाट पाहिलीं, नाहीं पाहिली फिरून (?) ॥चाल॥ रंगमहालीं शेज सुकली । सख्या, तुम्ही रात्र कुठें करमिली ? । कोणची सवत गळा पडियली ? ॥चाल॥ मर्जी कठिण कां केली ? । सख्या, कांहीं चुकी मजपासुन झाली ॥ म्हणून कां निजला राजमंदिरी ? ॥चाल॥ म्या करून कुल्पी विडे तूसाठीं तबक ठेविले भरून । येणार नाहीं बोललास माझे नेत्र आले भरून । रंगमहालीं तुझी सय होतांच उलथुन पडलें पलंगावरून । किती हात जोडूं, परि उमजेना ॥२॥
काय माझा अन्याय ? कां हो रुसला मज दुबळीवर ? । नाहीं बोलल्ये तुम्हां, कां हो टाकिलें कीं माझे घर ? । सुरतपाक मी असतां मन कां जातें दुसरीवर ? ॥चाल॥ नको दगा मशीं देऊं, सख्या, मी किती तुला समजाऊं ? । तुम्हांविण शरण कोणाप्रति जाऊं ? । ॥चाल॥ प्राणसख्या राजसा, आतां क्षणभर तरी पलंगीं बसा । करा तरी संग, होऊं द्या ठसा । सख्या, मी कमान, तुम्ही तीर कसा ॥चाल॥ आनंदाच्या वर्षामधिं सख्या तुझी मर्जी बिघडली कशी ? । आजवर चालली प्रीत, आतां भेटली कोण विवशी ? । नाहीं घेत पानाचा देठ, चला रंगमहालीं, झाले मी खुशी । विनंत्या करी सुंदर कामिना ॥३॥
करी विनंती, सुंदर सजणा, सोड मनाची अढी । सुरतपाक सकुमार सडक सडपातळ मी फुलछडी । नको झिडकाऊं मला, बसुन घे प्रेमसुखाची विडी ॥चाल॥ चाल सख्या रंगमहालीं । बोलले गंगु हैबती बोली । सुंदर पडली तुमच्या ख्यालीं ॥चाल॥ बसून पलंगावर सख्याला वारा घाली सुंदर । सख्या, तूं लूट ज्वानीचा बहर ॥चाल॥ कवि विश्वनाथ कवि म्हणे विठु लक्ष्मुण देश दक्षण । मलुद सुगुचे छंद, ख्याल कटिबंध, घ्यावा ऐकुन । वैरी झाले नादान, लागला बाणा, खोचलें मन, पळ सुटला धाक दुर्जना ॥४॥