जिव जाई तों मला भोगिलें, अजुन किती छळसी ?
पुरे करा हो सख्या, अतां मी जहाले विटाळसी ॥धृ०॥
मध्यरात्र लोटली, दीपदर्शनीं मला धरलें ।
अत्यवस्थ हें काय शरिर माझें सर्व विदारिलें ।
ढिलावले कटिवसन, शुभ्र पातळ रुधिरीं भिजलें ।
अशी निर्बळा निरुपाय, नित मी दु:ख सोशितां गांजलें ।
कोमळ लवण्या माझ्या भोगितां आज फार उमगले ।
त्रिरात्र वर्जुन मला करा, बाकीचें पुढे राहिलें ।
चोळितां उरावर स्तन रुपते आंगठी
तुम्हि फार मोठे, मी अगदिंच किं हो धाकटी
धरधरून नका करुं मांडयांची फाकटी
काहाड मिठी मानेची ? राहुन राहुन कितिदां गळसी ॥१॥
फिरफिरून ओढुन अलिकडे धरतां पोटासी ।
निजवेना माझ्यानें, आलें दुखणें, जाले आडमुसी ।
लक्ष वेळ श्रम करुन काय फल ? रस नाहीं त्यासी ।
प्रीतिवर्म थोडकें, पहा दिग्गज आवळला अंकुशीं ।
द्वाड लागली सवय, कोणाचे गुणनिर्गुण शिकसी ? ।
कुठवर सोसूं ? सख्या कधिं लेकुरपण टाकिसी ? ।
तोडिले घोस, मोडिले काप कर्णिंचे
लटपटित मोकळे नग झाले बेणिचे
रुपतात वाकि, वाजती वाळे चरणिंचे
येवढे हाल मरणाचे असतां मज कशि आवळसी ? ॥२॥
मीच निजूं गुंतले, आतां केव्हां सोडाल तरी ? ।
खिळखिळित अष्टांग, हल्लक जिव झाला शरिरांतरीं ।
सत्ताबळें गवसून जशी व्याघ्रें धरिली बकरी ।
उभयतांचे भारानें गात या पलंगाचे करकरी ।
ऐकावी रदबदल, बहुत मन माझें त्रास करी ।
रत लंपट घेतली लुटुन जशी ती कमळण मधुकरीं ।
वीट करूं नका जी, मी आनवा नारी कीं
घोंगडी शाल किंमतीस नव्हे सारखी
युक्तिनें करा, तुम्हि गुणिवर्धन पारखी
देह कांतला चरखीं, तुझ्या बसले बेहमीं जवळशी ॥३॥
हलुं उठुं तरी कशी ? जाचते मानेला हासळी ।
सुटुन गेल्या चंहुकडे दुडपेटया, तन्मणी, गरसळी ।
उघडया दोनी भुजा, उर, पाठीवर सरली चोळी ।
गोरे गाल, हनवटी मुके घेतां जाली हुळहुळी ।
आजच काय जाहलें ? अशीच वर्तेन वेळोवेळीं ।
कोटें दाखवा अशी दुजी तर विरळा स्त्रीमंडळीं ।
व्हा स्वस्थ, हेत पुरल्यावर नये गजबजूं
षण्मास येथुन मजपसी नका हो निजूं
चाकरी कठिण माझी, जन्मोजन्मीं अशी रिझूं
उभयतां एकांतीं निवळसी
होनाजी बाळा म्हणे, तूंच एक मर्जी सांभाळशी ॥४॥