लावणी १४५ वी - घडि घडि घडि घडि कां तरी छ...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
घडि घडि घडि घडि कां तरी छळतो मशीं रे ? । अशी अन्यायी मी काय तुझी रे ? ॥धृ०॥
ऐशी मी लावण्ये नाजुक पुतळी । अंगि नवती भरज्वानी कवळी । जशी काय चाफ्याची कळी पिवळी । भ्रमरराया तू ये रे जवळी । घेइ सुवास आतां तरी ह्या वेळीं । आल्या लहरी ऋतुसमय काळीं । काय तरी करुणा येउं दे माझी रे ॥१॥
मी असतां नित तुमचे सेवेशीं । तरी कां अंतर देतां हो मशीं ? । कसे जातां हो तुम्ही परके अस्त्रिशीं ? । लावुनी करवत माझ्या जिवाशीं । चतुरपणाची नव्हे रीत अशी । अधिं वचनीं कां गोविलें मशीं ? । अर्जी परिसावी राजसा माझी रे ॥२॥
चित्त मनरंजना अरे मनमोहना । माझ्या रे जिवींच्या जाणसी खुणा । अशा हो मानसांतील कल्पना । मारुनी णब्रंत (?) तुमच्या त्रासेला । अशी कोण रांड ही तुमच्या हो नेमा । सादर होईल सेवेसी जाणा । अशी कोण ती सर करील माझी रे ? ॥३॥
अज्ञान तर म्हणे अशा या नेमासी । नारी चुकुं नको त्याच्या सेवेसी । बहु रितीनें की प्राणसख्यासी । समजावुन नेला रंगमहालासी । जाइ जुइ मोगरा तर्हा रे जिनसी । सुखानीं मज भोगा विलासी । सिदराम लहेरी कवि राज विराज रे ॥४॥
Last Updated : November 11, 2016
TOP