नको नको नको नको सख्या शंभरदां छळूं ।
संग अता सोसेना, शरिर जणुं दुखतें जैसें गळूं ॥धृ०॥
साजुक नाजुक नवा हवाशिर वय बांधा नेटका ।
मुख माझे चुंबितां नका हो लाउं हलकडीला धका ।
बळें बळें बांधिता बळानें बळें माझि मोट कां ? ।
कठिणकर्म हें वर्म किती सांगू ? विषयपाठका ।
निजनिजतां आग जाहली, घेउं द्या पाण्याचा घुटका ।
विशेष हाल होतात, करा लौकर येथुन सुटका ।
हात लाउन तोंडास पुरे पुरे असें म्हणते हळुहळु ॥१॥
गौर पान केळिचें, तलम तारुण्य निघालें नवें ।
शीतळ नितळ पातळ देह, निर्मळ रूप माझें आनवें ।
केवळ निवळ रायवळ आणिक बनछोडसारखी नव्हे ।
सुरतशास्त्र हें, घाय सोशितां जिव जाइल हो जिवें ।
वसनकुंचुकीरहित पाहतां अंग माझें नागवें ।
मग थरथर कांपते, तशिच निजते मायालाघवें ।
खुडुं आले हात पाय, प्रहरभर केवढा वेळा तरमळूं ? ॥२॥
लाखरूप ये, येकरतीं खराबी मालाची करूं नये ।
मजपेक्षां तुम्ही दुप्पट, लापटपणीं येवढा वेळ ठरूं नये ।
मी बायको आहे ठिसूळ, जागोजागीं आडवुन धरूं नये ।
उंच मोलाची शाल तिला चुरचुरून पांघरूं नये ।
सोडुनि सोपे मार्ग, अमार्गी काटयामधिं शिरूं नये ।
जी कामाला आली, तिला सर्वकाळ विसरूं नये ।
उशि सरली डोइची, वाकडीतिकडी नका आवळूं ॥३॥
गात्रें गेली विटुन, सकल संधी जाल्या मोकळ्या ।
तुम्ही अपल्या छंदांत, खालत्या मी देतें आकळ्या ।
पुष्पें सुकलीं, सारि दडपली शेज, उबेल्या कळ्या ।
कुसमडले हार गजरे, विखुरल्या भवताल्या पाकळ्या ।
मुदुजागा टेकतां स्तनांवर दाबुन कोपरखळ्या ।
केलें लळित, शेवटीं निवाल्या प्रेमाच्या उकळ्या ।
होनाजी बाळा म्हणे, उभयतां ज्ञानदीप पाजळूं ।
तूं आमची खेळणी, नको गडे क्रियमाणाला टळूं ॥४॥