आतां यानंतर, मागें ज्याचें लक्षण सांगितलें आहे, व जो काव्याचा आत्मा ( मानला गेला ) आहे, त्या व्यड्रयार्थाच्या रमणीयतेला कारण होणार्या अलंकारांचें निरूपण करतों. पण ( त्यांतल्या त्यांत ) त्यां ( सर्व अलंकारां-) पैकीं अनेक अलंकारांच्या पोटांत ( बीजरूपानें ) राहणार्या उपमेचा प्रथम विचार करूं.
“ वाक्यार्थाला उपस्कारक ( शोभविणारें ) जें सुंदर सादृश्य, तो ( च ) उपमा अलंकार . ”
( सुंदर वस्तूंत धर्म म्हणून असणारें ) सौंदर्य म्हणजे चमत्कार उत्पन्न करणारा धर्म. ( शब्द्श:-चमत्कृति उत्पन्न करणेंपणा. ) चमत्कार हा विशिष्ट प्रकारचा आनंद असून, सह्लदयांचें ( रसिकांचें ) ह्लदय हें त्याचें ( अस्तित्व सिद्ध करणारें ) प्रमाण. अनन्वय अलंकारांत ( उदाहरणार्थ ) ‘ आकाश ( आकारानें ) आकाशासारखें आहे. ’ इत्यादि वाक्यांत, असलेलें सादृश्य, “ या ( आकाशा ) सारखा दुसरा एकही पदार्थ नाहीं ” असें सांगण्याकरितांच केवळ, ( प्रस्तुत वाक्यांत ) आणलें असल्यामुळें, तें स्वत:शेवटपर्यंत टिकत नाहीं; ( अर्थात् च ) तें ( सादृश्य ) मुळींच चमत्कार उत्पन्न करीत नाहीं. आणि म्हणूनच त्या सादृश्याचा ( उपमान आणि उपमेय या दोहोंशींही ) संबंध ( अन्वय ) होत नसल्यानें, त्याला ‘ अनन्वय ’ अलंकार म्हणतात. ( तें योग्यच आहे. )
“ तुझ्या मुखाशीं कमळ तुलना कसें पावू शकेल ,” इत्यादि व्यतिरेक अलंकारांत, निषेध म्हणजे सादृश्याचा निषेध हा चमत्कारजनक असून, तो ( निषेध ) सांगन्याकरिता ( च केवळ ) त्या निषेधाचा प्रतियोगी जें सादृश्य त्याचा निर्देश केला जातो; आणि म्हणूनच तें सादृश्य, चमत्कार उत्पन्न करीत नाहीं. अशाच प्रकारें अभेद ज्यांच्यांत प्रधान असे रूपर्के, अपह्नुति, परिणाम, भ्रान्तिमत्, उल्लेख इत्यादि अलंकार, प्रत्येकीं विशिष्ट चमत्कार उत्पन्न करणारे असले तरी, त्यांच्यांतील तो विशिष्ट चमत्कार अभेदाच्या योगानें उत्पन्न झालेला असतो; व तो अभेद प्रतीत व्हावा म्हणूनच त्या सर्व अलंकारांत सादृश्य येऊन राहिलेलें असतें. अर्थात् च तें सादृश्य ( मुळींसुद्धां ) चमत्कारकारी नसतें; आणि म्हणूनच या सर्व अलंकारांना उपमा अलंकार म्हणतां येत नाहीं; याचप्रमाणें भेद ज्यांच्यांत प्रधान आहे असे, दृष्टान्त, प्रतिवस्तूपमा, दीपक, तुल्ययोगिता इत्यादि
अलंकारही चमत्कारकारी आहेत; पण त्या प्रत्येकांतील विशिष्ट चमत्कार भेदामुळें उत्पन्न झालेला असतो; आणि तो भेद स्पष्टपणें प्रतीत व्हावा म्हणूनच ( केवळ ), त्या अलंकारांत सादृश्य येऊन राहिलेलें असतें, आणि म्हणूनच तें सादृश्य चमत्कारकारी नसतें. अर्थात् च, त्या अलंकारांनाही उपमा अलंकार म्हणतां येणार नाहीं. आतां, “ मुखासारखा चंद्र ” यांतील प्रतीप अलंकारांत, व
“ चंद्रासारखें मुख ( आणि ) मुखासारखा चंद्र ” यांतील उपमेयोपमा अलंकारांत, सादृश्य चमत्कारकारी असल्यानें, ( या दोन अलंकारांना उपमा अलंकार मानायचा ) अतिप्रसंग ( आपत्ति ) येईल ”, अशीही शंका कुणी काढूं नये; कारण या दोन्हीही अलंकारांना आम्ही ( उपमेचेच दोन प्रकार म्हणून ) उपमेंत समाविष्ट करण्यास योग्य मानतो.