आतां ,“ ही उपमा संक्षेपानें तीन प्रकारची आहे-(१) कुठें स्वत:च्या वैचित्र्यांतच जिचें पर्यवसान आहे अशी; उदाहरणार्थ, स च्छिन्न-मूल: क्षतजन रेणु: ( रघु० ७।४३ ) ही उपमा. (२) कुठें ती सांगितलेल्या अर्थाचेंच समर्थन करते. उदाहरणार्थ, ‘ अनंतरत्नप्रभवस्य यस्य ’ ( कुमार० १।३ ) इत्यादि श्लोकांत (३) व कुठें व्यंग्य जिच्यांत प्रधान असतें अशी. ”
असें जें त्याच द्रविड महाशयांनीं म्हटलें आहे, तें सुद्धां त्यांचें कांहीं तरीच बोलणें आहे. कारण हे तीनच प्रकार उपमेचे मानिल, तर ‘ नयने शिशिरीकरोतु’ इत्यादि श्लोकांतील, वाच्य वस्तूला उपकारक जी शर-च्चंद्राची उपमा तिचा उपमेंत अंतर्भाव करतां येणार नाहीं. अलंकार म्हणून म्हटलेल्या उपमांच्या वर्गांत स्वत:च्या वैचित्र्यांतच जिचें पर्यवसान होतें अशा उपमेचा अंतर्भाव करावयाचा; आणि व्यंग्य उपमेची अलंकारांतून हकालपट्टी व्हावी एवढयाकरितां, अव्यंग्य हें विशेषण, उपमा अलंकाराच्या लक्षणांत घालावयाचा हट्ट धरावयाचा, ह्याला काय म्हणावें ? अहो, हा मोठाच अन्याय आहे कीं, उपमेच्या लक्षणांत जी बसत नाहीं, तिचा स्वीकार करावयाचा, आणि जिचें लक्षण करायला पाहिजे, तिचा स्वीकार करावयाचा नाहीं. प्राचीनांनीं ( सर्व ) सामान्य उपमेचें लक्षण करतांना व्यंग्य उपमे-प्रमाणें ह्या तुमच्या स्वत:च्या वैचित्र्यांत विश्रांत होणार्या उपमेचाही स्वीकार केला आहे, ह्यांत गैर काहींच नाहीं. पण तुम्ही मात्र ( एका बाजूनें ) मोठया प्रयासानें, व्यंग्य उपमेची हकालपट्टी करून, ( दुसर्या बाजूनें ) “ आम्ही अलंकारभूत उपमेचें लक्षण करणार आहों ” असें घसा खरवडून जाहीर करतां; आणि केवळ स्वत:च्या वैचित्र्यांत विश्रांत होणार्या उपमेचा संग्रह करतां; हें फारच गैर आहे. आतां ( ह्या आक्षेपांतून पळवाट काढण्या-करितां ) “ स्ववैचित्र्यांत विश्रांत होणारी ही उपमा आम्ही उपमालंकार म्हणून संगृहीत करतों, याचें कारण असें कीं, ती सबंध प्रबंधांतील व्यंग्याला उपस्कारक होते; ” असें म्हणाल तर मग , ‘ स्ववैचित्र्यांतच विश्रांत होणारी ’ असे जें वर तुम्ही त्या उपमेचे वर्णन केलें आहे, त्याच्याशीं आतांचें हें तुमचें बोलणें विरुद्ध होईल .
आतां ‘ अनंतरत्नप्रभवस्य० ’ ह्या श्लोकाच्या पूर्वार्धांतील ‘ गुणां-च्या समूहाबरोबर राहाणारा एकच दोष, दोष असा वाटत नाहीं, ’ ह्या अर्थाचें समर्थन करणारा उत्तरार्धांतील अर्थ सामान्यस्वरूपाचा आहे; त्याचें, विशेषरूप उदाहरण दिल्याखेरीज, नीट आकलन होणार नसल्यानें, चंद्र-किरणाशेजारी राहाणार्या चंद्राच्या डागाचें उदाहरण कवीनें दिलें आहे खरें; पण येथें चंद्राच्या डागाचा उपमान म्हणून निर्देश केलेला नाहीं. ( गुणसमूहांतील दोष हें सामान्याचें विधानम व चंद्रकिरणाजवळचा डाग हें विशेषाचें विधान आहे. ) सामान्याचा विशेषाहून मुळींच भेद नसल्यानें, त्यांच्यांत सादृश्य असूच शकत नाहीं. अर्थातच त्या दोहोंमुळें येथें उपमा अलंकार होत नसल्यानें, त्याऐवजी, येथें उदाहरण नांवाचा एक निराळाच अलंकार आम्ही मानला आहे. जसें, ‘ इको यणचि ( पा० ६।१।७७ ) ( ‘ इकाच्या जागीं यण् होतो, स्वर पुढें आला असतां, ’ )