ह्याप्रमाणें उपमेचे दुसरेहि प्रकार शोधून काढतां येतील. उदाहरणार्थ-
“ जसें तुझें तोंड चंद्र आहे, तसें तुझें हसणेंहि चांदणें आहे; व जसा चंद्र चंद्रासारखा, तशी तूंहि तुझ्या सारखीच. ”
[ ह्या श्लोकांतील पूर्वार्धांत, दोन रूपकें आहेत. व त्यांतले पहिलें रूपक उपमानभूत व दुसरें रूपक उपमेयभूत असून, त्यामुळें व यथा-तथा ह्या शब्दांमुळें पूर्वार्धांत एक उपमा तयार झाली आहे; व श्लोकाच्या उत्तरार्धांतील तिसर्या व चौथ्या ओळींत एकेक अनन्वय अलंकार आहे; आणि वरच्या पूर्वार्धाप्रमाणेंच ह्या दोन अनन्वय वाक्यांत परस्पर उपमानो-पमेय भाव असून त्यामुळें होणार्या उपमेंत पुन्हां यथातथा शब्द वाचक आहेत. पहिल्या उपमेंतील साधारण धर्म आरोपमूलक विषयविषयींचे ऐक्य हा आहे. व दुसर्या उपमेंतील साधारण धर्म अद्वितीयता अथवा असाधा-रणता हा आहे. ]
[ ह्या आतां सांगितलेल्या प्रकाराशीं, मागें साधारण धर्माचे आम्ही जे भेद सांगितले त्याच्यासकट पूर्णा व लुप्ता उपमांचे सर्व भेद, यांचा, शक्य असेल तेथें गुणाकार केल्यास, एकंदर उपमेचे खूपच प्रकार होतील. तसेंच साधारण धर्म वाच्य असल्याने होणारी जी वाच्यधर्मा उपमा तिचेही अनेक प्रकार सांगितले. जिच्यांतील धर्म व्यंग्य असेल तिला व्यंग्यधर्मा उपमा म्हणावे, व जिच्यांतील धर्माचा लोप झाला असेल तिला धर्मलुप्ता म्हणावें, हें आम्ही पूर्वांच सांगितलें आहे. आतां धर्म लक्ष्य असेल तर त्यामुळें होणार्या उपमेचें ( म्ह० लक्ष्यधर्मा उपमेचें ) उदाहरण हें -
“ हा, सापासारखा सौम्य आकृतीचा, कुत्र्यासारखा पूर्ण मानी, दारुड्यासारखा सावध आणि माकडासारखा अत्यंत निमूटपणें बसणारा आहे. ”
ह्या ठिकाणीं साप, कुत्रा वगैरे उपमानांच्या समर्थ्यामुळें शांतमूर्ति वगैरे शब्दांनीं, अशांतता, कोडगेपणा वगैरे विरुद्ध धर्म लक्षणेनें घेतले जातात.
ही उपमा कुठें कुठें मुख्यार्थाला प्रत्यक्षपणें उपकारक होते, तर कुठें कुठें मुख्यार्थाला साक्षात् उपकारक होणार्या वस्तूला उपकारक होऊन मुख्यार्थाला ( अप्रत्यक्षपणें ) उपकारक होते. प्रत्यक्षपणें मुख्यार्थाला उप-कारक होणार्या उपमेचीं उदाहरणें आम्ही पूर्वीं बरींच दिलीं आहेत.
अप्रत्यक्षपणें मुख्यार्थाला उपकारक होणारी उपमा ही-
“ हे राजा, शत्रूंच्या महालांत, माजलेले हत्ती गर्जना करीत आहेत; घोडयांच्या तुकडया थयथयाट करीत आहेत; आणि भाट बिरुदें गात आहेत; पण हें त्यांचें सर्व वैभव, कल्पांताच्या वेळेच्या अग्रीसारखें असलेलें तुझ्या डोळ्यांच्या कोपर्यांतलें लाल तेज खूप वाढलें नाहीं, तोंपर्यंतच. ”
ह्या श्लोकांतील मुख्यार्थ, राजाला कवीविषियीं वाटणारें प्रेम हा. ह्या मुख्यार्थाला साक्षात् उपकारक वस्तु, ‘ ज्या क्षणीं तुझा राग उसळेल त्याच-क्षणीं तुझ्या शत्रूंच्या वैभवांची राखरांगोळी होईल, ’ ही; व ह्या वस्तूला उप-कारक-डोळ्यांच्या कोपर्यांतील लाल तेजाला दिलेली कल्पांताच्या अग्नीची उपमा ही.
ही उपमा इव यथा इत्यादि वाचक शब्दांनीं सांगितली असतां, वाच्य अलंकार होतो ( हें आम्ही मागेंच सांगितलें आहे. ) याशिवाय, ही उपमा लक्ष्य असूनहि, मुख्यार्थाला अलंकृत करीत असलेली दिसते.