वरील शंकेस आमचें ( जगन्नाथाचें ) उत्तर असें-
तुम्ही सांगितलेला निपाताचा कर्त्याशीं अन्वय योग्य नव्हे. कारण तसा जर अन्वय केला तर , ‘ गज इव गच्छति ’ ह्या वाक्यांत, सादृश्य हें
विधेय आहे अशी जी सर्वांना प्रतीति होते, तिचा अपलाप होण्याची आपत्ति येईल. आणि शिवाय, ‘ गज इव य: पुरुष: स: गच्छति ’ आणि ‘ पुरुषो य: स गज इव गच्छति ’ ह्या दोन वाक्यांतून भिन्न तर्हेचा अर्थ प्रतीत होतो, असा सर्वांचा अनुभव आहे. आणि निपाताचा केवळ कर्त्यांशीं अन्वय करूं लागल्यास, ‘ वनं गज इव गृहं देवदत्तो गच्छति गच्छति ’ इत्यादि वाक्यांत वनाचा कुठेंच अन्वय न होणें, ही आपत्ति येईल. त्याचप्रमाणें, बिंबप्रतिबिंब-भावानें युक्त कोणतेंहि कारक अशा तर्हेच्या वाक्यांत आल्यास, त्याचाही अन्वय होऊं शकणार नाही, असें समजावें. म्हणून , ‘ गज इव गच्छति ’ ह्या वाक्याचा शाब्दबोध, ‘ गजानें निरूपति जें सादृश्य त्या सादृश्याला कारण होणारें जें गमन त्याचा आश्रय गच्छति क्तियापदाचा कर्ता ’ , असाच मानावा लागेल. पण ज्या ठिकाणीं क्तियापदाशीं संबंध ठेवणारें कर्मादि-कारक वाक्यांत आलें असेल तेथें ( तथा उपमानवाक्यांत ) , उपमानवाचक पदांचा, लक्षणेनें, उपमानानें केलेली क्तिया ’ असाच अर्थ घेणें योग्य होईल. पण असा अन्वय केल्यास, पूर्वी जो नियम सांगितला कीं, ‘ धातूच्या अर्थाशीं विशेषण म्हणून अन्वय करणें झाल्यास, त्या विशेषणवाचक पदापुढें विभक्तीचा अर्थ आलाच पाहिजे ’ ह्या नियमाचा भंग होऊं लागेल, त्याची वाट काय? ” अशी शंका येथें घेऊं नये. कारण कीं, शंकाकारानें सांगितलेल्या नियमाचा आम्ही स्वीकार ( सर्वत्र ) करीत नाहीं. धात्वर्थाशीं अन्वय जोडतांना, विभक्तीचा अर्थ आवश्यक आहे असा शंकाकारानें सांगितलेला नियम जर स्वीकारला तर [ ‘ तूष्णीं तिष्ठति ’ ‘ आराद् वसति ’ ‘ पृथक् करोति ’ इत्यादि वाक्यांत आलेल्या ] तूष्णीम् आरात् पृथक६ इत्यादि अव्ययांच्या पुढें विभक्ति नसल्यानें, त्यांचा धात्वर्थाशीं अन्वय होणार नाहीं; पण तो, होतो ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे, मग तिचा अपलाप कसा करतां येईल ? ह्यावर शंकाकार पुन्हां म्हणेल कीं, मग, “ आमच्या मतें ( म्ह० जगन्नाथाच्या मतें ) ‘ घटो न पश्यति ’ ह्याचा ‘ घटाच्या अभावाला पाहतो असा अन्वयबोध होणार नाहीं , ’ असें तुम्ही म्हणतां हें तरी कसें ? ” ह्या प्रश्राला आमचें ( जगन्नायाचें ) उत्तर हें कीं, धात्वर्थ हें विशेष्य व त्याच्याशीं संबंध ठेवणारें जें विशेषण त्या दोहोंचा अन्वय त्या विशेषणांच्या पुढें विभक्ति नसली तरी होऊं शकतो. फक्त नञ् ह्या निपाताचा अर्थ वाक्यांत आला असतां तो मात्र धातूच्या अर्थाशीं स्वत:चा अन्वय करण्यास प्रतिबंध करतो, असा शंकाकारांनीं आपल्या नियमाला, नञ् चा अपवाद मानावा, म्हणजे झालें. आतां अशा स्थळीं, “ धात्वर्थ हा नामार्थाहून भिन्न असला पाहिजे ” ( तरच त्याचा निपाताशीं अन्वय होईल ) असें ‘ नामार्थभिन्न ’ हें विशेषण धात्वर्थाला लावणें, तुमच्याप्रमाणें आम्हांलाही मान्य आहे. आणि तसें विशेषण लावल्यास , ‘ पाको न याग: ’ ( स्वयंपाक करणें म्हणजे यज्ञ नव्हे ) इत्यादि वाक्यांचा अन्वय करतांना अडचण येणार नाहीं. पण ह्या अप्रस्तुत गोष्टींचा विचार करणें आतां पुरें झालें.
आतां, अरविंदतुल्यो भाति ’ हया वाक्याचा शाब्दबोध कसा कराल ? असा प्रश्र करणाराचें म्हणणें असें कीं, तुल्य ह्या पदाचा अर्थ निपाताहून भिन्न असा, ( म्ह० ) नामाचाच अर्थ असल्यानें, त्याचा ‘ भाति ’ यांतील धात्वर्थाशीं, भेदसंबंधानें अन्वय करणें जुळणार नाहीं. कारण, निपाताहून भिन्न अशा प्रातिपदिकाच्या अर्थाचा धात्वर्थाशीं भेद-संबंधानें अन्वय होत नाहीं, असा नियम आहे. आतां, अन्वय जुळविण्या-करतां, वरील वाक्यांत, तुल्यत्वाला उद्देश्यकोटींत घालून, केवळ भान क्तियेला विधेय कोटींत घातल्यास, अन्वय कसा तरी जुळेल. पण मग, ह्या वाक्यांत वक्त्यला जो अर्थ सांगावयाचा आहे, त्याची प्रतीति होणार नाही. यावर कुणी अशी तोड काढील की, तुल्य ह्या शब्दावर लक्षणा करून त्याच , ‘ तुल्यत्व हा ज्याच्यांत प्रकार आहे ’ असा अर्थ केल्यास, त्याचा अभेदसंबंधानें भाति ह्या धातूच्या भान या अर्थाशीं, अन्वय होऊ शकेल. परंतु तसेंहि म्हणतां येणार नाही. कारण क्तियेचें विशेषण होऊं पाहाणार्या, अरविंदतुल्य ह्या शब्दाला नपुंकसलिंग लावण्याची आपत्ति येईल. ( म्ह०द्योतक, वाचक नव्हे ) मानावें.