अशा रीतीच्या भेदानें युक्त ही उपमा पूर्वीं सांगितलेल्या उपमाभेदांनीं गुणिली तर, शब्दांनीं सांगतां येणार नाहीं इतका हिचा विस्तार होईल; व हिच्या प्रकारांच्या संख्येला मर्यादाच राहाणार नाहीं. म्हणून थोडक्यांत ही सांगितली.
हीच उपमा, जेव्हां समग्र वाक्याकडून प्रधान व्यंग्य म्हणून व्यक्त केली जाते तेव्हां, हिचा अलंकारपणा नाहींसा होऊन, ध्वनि ( काव्य ) हें नांव द्यायला ही कारण होते. अशा वेळीं ह्या ( व्यंग्य ) उपमेला ( उपमा-अलंकारध्वनि ह्या प्रयोगांत आहे त्याप्रमाणें ) अलंकार हें नांव देण्याचें कारण एवढेंच कीं, ह्या ध्वनीला पूर्वी अलंकार या धर्माचा ( म्ह० दुसर्यांना अलं-कृत करण्याची योग्यता असणें या धर्माला ) ( थोडासा ) स्पर्श झाला होता. ज्यांचा अलंकार म्हणून कधींच उपयोग झालेला नाहीं, अशा पेटींत वगैरे ठेवलेल्या सलकडीं वगैरेंना अलंकार म्हणण्याचें जें कारण, तेंच ह्या व्यंग्य उपमेला अलंकार म्हणण्याच्या बाबतींत, कारण. हा उपमाध्वनि कुठें शब्दशक्तिमूलक ध्वनीचा विषय असतो, तर कुठें अर्थशक्तिमूलक ध्वनीचा विषय असतो. अशा दोन प्रकारच्या ध्वनींतील पहिल्या प्रकारच्या ( म्हणजे शब्दशक्तिमूलक ) उपमाध्वनीचें उदाहरण हें-
“ सतत गळणार्या मदाच्या जोराच्या वर्षावानें ज्यानें जमीन भिज-वून टाकली आहे; व कुबेरापुढें ज्याच्या आकृतीची प्रशंसा होते, अशा ह्या सार्वभौम नांवाच्या दिग्गजाचा जयजयकार आहे.
( ह्या श्लोकांतील प्रस्तुत राजविषयक अर्थ पुढीलप्रमाणें आहे-ज्यानें सतत दान करतांना गळणार्या पाण्याच्या धारांनीं जमीन भिजवली आहे, व धन देणार्या लोकांमध्यें ( म्ह० दात्यांमध्यें ) ज्याच्या मूर्तीची अग्रेसर म्हणून स्तुति केली जाते; अशा ह्या सार्वभैम राजाचा अत्यंत जयजयकार आहे. )
अथवा ह्या पहिल्या प्रकारच्या ( शब्दशक्तिमूलक ) ध्वनीचें
दुसरें उदाहरण-
“ अत्यंत निर्मल, अत्यंत गंभीर, अत्यंत पवित्र, सत्त्वगुणयुक्त, रसाळ, परमात्म्याचें निवासस्थान, असें त्याचें मन अत्यंत शोभतें. ”
ह्या प्रस्तुत अर्थानंतर शब्दशक्तिमूलक ध्वनीच्या बळावर पुढील दुसरा अर्थ होतो-
“ अत्यंत स्वच्छ, अत्यंत खोल, अत्यंत पवित्र, जलचर प्राण्यांनी युक्त, गोड पाण्यानें भरलेलें, हंसाचें विहारस्थान, असें ( हें ) मानस सरोवर ह्या पृथ्वीवर अत्यंत शोभतें. ”
ह्या ठिकाणीं अनेकार्थक शब्दांच्या ( अभिधा ) शक्तीच्या प्रकरणा-मुळें संकोच झाल्यानें, व शब्दशक्तिमूलक ध्वनीनें सूचित केलेला सरोवरपर दसरा अर्थ अप्रस्तुत असल्यानें, तो अभिधाव्यापारानें सांगतां येणार नाहीं; ( पण तो कवीला इष्ट म्हणून सांगितला तर पाहिजे. ) ( तो सांगता यावा ) म्हणूनच येथील प्रस्तुत व अप्रस्तुत ह्या दोन अर्थांमधील उपमानोपमेयभाव, प्रधान वाक्यार्थ म्हणून, कल्पिला आहे.
आतां अर्थशक्तिमूलक ‘ अलंकारध्वनि ’ ह्या दुसर्या प्रकाराचें उदाहरण हें-
“ कांतीच्या बाबतींत स्वत:ला अद्वितीय मानून, हे चंद्रा, तूं घमेंद कां मारतोस ? हे सर्व पृथ्वीमंडळ कुणी धुंडाळलें आहे कां ? ( सांग बरें ? ) ”