असे हे, वर सांगितलेले प्रकार असलेली ही उपमा, वस्तुव्यंग्य, अलंकारव्यंग्य व रसव्यंग्य ह्या तीन प्रकारच्या व्यंग्याला, त्याचप्रमाणें वस्तु व अलंकार ह्या दोन प्रकारच्या वाच्याला उपस्कारक होत असल्यानें, पुन्हां पांच प्रकारची होते. ह्यापैकीं वस्तुव्यंग्याला उपकारक होणार्या उपमेचें हें उदाहरण :-
“ ज्यांचीं शुद्ध मनें, उपकार करण्याच्या कार्यांत सतत गढून गेलीं आहेत अशा महात्म्यांचीं वचनें प्रारंभीं कडु लागणार्या औषधासारखीं वाटतात. ”
ह्या ठिकाणीं , ‘ असलीं वचनें त्यांतील ( खरा ) अर्थ समजून ग्रहण करतांना, मनाची थोडीसुद्धां चलबिचल न होऊं देणाराला, शेवटीं अत्यंत सुख होतें; ’ हे वस्तुव्यंग्य प्रधान असून, त्याला उपकारक अशी ही औषधाची उपमा आहे.
व्यंग्य अलंकाराला अलंकृत करणारी उपमा ही :-
“ हे कमलनयने, कपाळावर चंद्राच्या कलंकासारखा कस्तुरीचा टिळा धारण करणारें तुझें मुख पाहून, आनंदानें ज्यांनीं आपल्या पंखांचीं मुळें पालवीसारखीं पसरविलीं आहेत अशीं चकोर पक्षांचीं पिल्लें, आपल्या चोंची हालवूं लागलीं आहेत. ”
ह्या ठिकाणीं नायिकेच्या तोंडावर चंद्राया अभेदारोप करणारा भ्रांतिमत् अलंकार प्रधान व्यंग्य आहे व त्यालाच साधक असा ( दुसरा ) अभेदारोप-कपाळावरीलं कस्तुरीच्या टिळ्यावर चंद्राच्या डागाचा आरोप हा असून, त्या आरोपाच्या मुळाशीं कस्तुरीच्या टिळ्याचें व कलंकाचें सादृश्य हा दोष असल्यानें, ह्या ठिकाणीं उपमा अलंकार झाला आहे. रसव्यंगाला उपस्कारक झालेल्या उपमेचें उदाहरण-‘ दरदलदर-विन्द०’ इत्यादि श्लोकांत पूर्वी दिलेंच आहे. ह्या ठिकाणीं रसव्यंग्य ह्या शब्दांतील रस ह्या पदानें असंलक्ष्यक्तम व्यंग्याचे इतरहि, भाव ( रसाभास भावाभास ) वगैरे प्रकार, घेतले जात असल्यानें, त्या भावादिकांना उपस्कारक अशा उपमांचाहि, ह्या रसव्यंग्याला उपस्कारक असलेल्या उपमेच्या प्रकारांत, अंतर्भाव करावा. ह्याचीं उदाहरणें, ‘ नैवापयाति ह्लदयादधिदेवतेव ’ इत्यादि व ‘ वन्यकुरंगीव वेपते नितराम् ’ इत्यादि श्लोकांत पूर्वी येऊन गेलेलींच आहेत.
आतां वाच्य वस्तूला उपस्कारक अशा उपमेचें उदाहरण हें-“ हे मित्रा, अमृताच्या द्रवाचें माधुर्य धारण करणार्या तुझ्या वाणी माझ्या कानाला सुख देतात. तुझें शरद् ऋतूंतील चंद्राप्रमाणें असणारें मुख माझे डोळे निववोत. ”
ह्या श्लोकांत डोळ्यांना निववोत हा ( मुख्य ) वाच्यार्थ आहे; व मुखाला दिलेली शरद्ऋतूंतील चंद्राची उपमा, त्याला उपस्कारक आहे.