ह्या त्यांच्या म्हणण्यांत कांहींच राम नाहीं. कारण कीं, ह्यांतील चञ्चा ह्या पदांत कन् ह्या सादृश्यवाचकाचा लोप असला तरी, ‘ त्या शंकराला न भजणारा ’ ह्या शब्दांनीं , ‘ शंकराला न भजणें ’ हा मर्त्य व पेंढयांचा माणूस ह्या दोहोंनाही साधारण असलेला धर्म सांगितला असल्यानें, ह्या श्लोकांत, धर्मलोप आहे असें कसें म्हणतां येईल ? तुम्ही ( म्ह० अप्यय्य-दीक्षितांच्या पक्षाचे ) म्हणाल, ‘ ह्या वाक्यांतील उपमेय जें मर्त्य त्याचें एकटया-चेंच, ‘ शंकराला न भजणारा ’ हें विशेषण असल्यानें, त्याचा अन्वय सादृश्याचें विशेषण जें चञ्चा पद त्याच्याशीं होणार नाहीं. तेव्हां शंकराला न भजणारा हा येथें साधारण धर्म होईल तरी कसा ? पण तुम्हांला असें म्हणतां येणार नाहीं. कारण कीं, “ वरील श्लोकांत बदल करून-‘ त्या शंकराला न भजणारा मनुश्य स्वहित आचरित नसल्यानें, पेंढयाच्या माणसा-सारखा आहे ’ अशा अर्थाचा श्लोकाचा दुसरा चरण केल्यास, अपवर्गति व चञ्चा ह्या दोहोंनाही साधारण धर्म मिळेल ’ असें जें तुम्ही स्वत:च म्हटलें आहे, त्याच्याशीं तुमच्या या पूर्वींच्या म्हणण्याची संगति लागत नाही, असें म्हणण्याची पाळी येईल. कारण असें कीं, ह्या तुमच्या नव्या पाठांतही उपमेय जो संसार त्याचें विशेषण म्हणून योजिलेल्या सुखमय ह्या पदाचा अपवर्गति म्हणजे ‘ अपवर्गसदृश: भवति ’ असा अर्थ करून, सादृश्याला विशेषणीभूत ( म्हणजे गौण ) जें अपवर्गपद त्याच्याशीं अन्वय होणें शक्य नसल्यानें, ह्या ठिकाणीं सुखमय ( हें पद ) हा साधारण धर्म आहे असें ( तुम्हाला तरी ) कसें म्हणता येईल ? ह्यावर तुम्ही म्हणाल कीं, “ एखादा धर्म, केवळ उपमेयचा म्हणून अथवा केवळ उपमानाचा म्हणून, सांगितला असल्यास, त्या धर्माचा त्या दोघांशीं साक्षात् ( शब्दानें ) अन्वय होत नसला तरी , तो धर्म, उपमेय व उपमान ह्या दोहोंनाही साधारण असा आहे असें वस्तुत:ज्ञान झालें, कीं ते ज्ञानच ( म्ह० हा धर्म उपमेय व उप-मान ह्या दोघांनाही साधारण असणारा आहे हें ज्ञानच, ) तो साधारण धर्म आहे असें मानायला पुरेसा पुरावा आहे. ” तर मग आम्हीही ( जगन्नाथ व तत्पक्षीय ) असें म्हणतो कीं, शंकराला न भजणारा ह्या साधारण धर्माकडे तुम्ही ह्याच दृष्टीनें पहा कीं. आता, तुम्ही शपथेवर आपला असा अभिप्राय जाहीर करीत असाल कीं , “ शंकराला न भजणें हा धर्म उपमेयाचाच आहे; व ह्या ठिकाणाचा साधारण धर्म ‘ स्वत:चें हित न साधणें, ’ हा असून, तो ह्या ठिकाणीं लुप्त आहे व हीच गोष्ट मला येथें सांगावयाची आहे, ” तर मग वर जो असंगतीचा दोष आम्ही तुम्हांला लावला होता त्याचें निवारण झालें असें समजा, व त्यांतच समाधान माना. आणखी, त्यांनींच ( अप्यय दीक्षितांनीं ) वाचकोपमेयलुप्तेचें म्हणून एक उदाहरण बनविलें आहे. तें हें-
“ रूप, यौवन व लावण्य, ह्यांच्यामुळें ज्याची आकृति सर्वांना हवीशी वाटते असा हा, मृगनयनांच्या समोर मदनासारखा वाटतो. ”
हा श्लोक, त्यांतील चुकीच्या शब्दामुळें सदोष असल्यानें, त्याच्या कर्त्याला व्याकरणशास्त्राचा गंध नाहीं असें दाखवितो. कसें तें पहा-
‘ पुरत: ’ हा ह्या श्लोकातील नगरवाची जो ‘ पुर ’ शब्द त्याला तसिल् ? ( म्हणजे तस् ) प्रत्यय लावून वनविला आहे. अशी वस्तुस्थिति असल्यानें, श्लोकांतील ‘ हरिणाक्षीणां पुरत: ’ ह्याचा अर्थ, सुंदर स्त्रियांच्या नगरांतून असा होऊन त्याचा श्लोकांतील इतर पदार्थांशीं मेळ बसणार नाहीं खरें म्हणजे, पूर्व ( म्हणजे पुढें ) ह्या अर्थीं पुर शब्द कुठेंही वापरल्याचें ऐकिवात नाहीं. पूर्व शब्दाला, ‘ पूर्वाधरावराणामसिपुरधवश्चैषाम् ’ ( पा० ५।३।३९ ) ह्या सूत्राप्रमाणें पुर् असा आदेश केला आहे; त्याला असि ( अस् ) प्रत्यय लावला असतां, पुर: असें रूप व्हायला पाहिजे. पुरत: असें ह्यांचें रूप कधींही होणार नाहीं आणि म्हणूनच ( म्हणजे पुर: हेंच रूप व्याकरण-शुद्ध असल्यानें, ) अमुं पर: पश्यसि देवदारुम् ( रघु ० २।३६ ) ह्या श्लोकांत महाकवि कालिदासानें पुर: असा प्रयोग केला आहे. पुरत: ह्या शब्दाचा आणखी एक असाच चुकीचा प्रयोग, दीक्षितांनीं, ‘ मुखस्य पुरतश्चन्द्रो निष्प्रभ: । ’ इत्यप्रस्तुतप्रंसशा ’ ( मुखाच्यापुढें चंद्र फिक्का आहे, ’ ही अप्रस्तुत प्रशंसा ) असा ( चित्रमीमांसेच्या ) दुसर्या प्रकरणाच्या प्रारंभीं केला आहे. ह्या बाबतींत व्याकरणशास्त्रज्ञांचें म्हणणें असें आहे- ‘ पत्या पुरत: परत: ’ ( पतीच्या समोर व पाठीमागें ) , ‘ आत्मीयं चरणं दधाति पुरतो निम्नोन्नतायां भुवि ’ ( उंचसखल भुईवर, पुढें आपलें पाऊल टाकते. ) ‘ पुरत: सुदती समागंत माम् ’ ( त्या सुंदरीनें आपल्यासमोर आलेल्या मला ) इत्यादि सर्व अपशब्दांचे प्रयोग व्याकरणाच्या अज्ञानामुळें झाले आहेत.