ह्या श्लोकाच्या उत्तराधातील कवितामृत व कीर्तिचंद्र हे दोन्ही समास उपमित समासच मानले पाहिजेत, कारण कीं, विशेषणसमासानें दाखविल्या जाणार्या तादात्म्याचा प्रस्तुत स्थळीं कांहींही उपयोग नाहीं,
राजाची समुद्राशीं उपमा शब्दानें सांगितली नसली तरी, अंगभूत उपमां-वरून तिचें सहज अनुमान होऊन ती प्रतीत होते. अशा रीतीनें ही उपमा एक देशांत म्हणजे अवयवांत ( अथवा अंसांत ) विवर्तनानें म्हणजे विशेष स्पष्टपणानें, दिसत असल्यानें, हिला एकदेशविवर्तिनी उपमा असें म्हणतात.
केवलश्लिष्टपरंपरित उपमा ही-
“ त्या राजाच्या नगरांत सुरालयांत ( १ दारूच्या गुत्त्यांत २ देवांचें वसतिस्थान जो मेरू पर्वत त्यावर ) दारूडे देवाप्रमाणें शोभले. ”
ह्या श्लोकांत, ‘ सुरालये ’ ह्या पदावरील श्लेषानें मेरू पर्वत हा अर्थ दाखविल्यामुळें त्याच्याशीं गुत्त्याची उपमा तयार झाली; व ती उपमा दारू-डयांशीं देवांची उपमा तयार करायला उपयोगी पडली म्हणून ही श्लिष्ट-परंपरित उपमा. जेथें दोन उपमा एकमेकींना तयार करायला उपयोगी पडतात, तेथेंच परंपरित हा शब्द योजिला जातो. वरील श्लिष्ट परंपरित उपमेंत, मालारूपता नसल्यानें तिला केवळ म्हणावी.
आतां मालारूप श्लिष्ट परंपरित उपमेचें उदाहरण हें-
“ हे राजा, महीभतांच्या ( १. राजांच्या, २. पर्वतांच्या ) समूहांत, तूं मेरू पर्वताप्रमाणें आहेस. तूम काव्याचे बाबतींत (१. कविता, २. शुक्ताचार्य. ) वृषपर्व्याप्रमाणें शोभतोस. ”
ह्या श्लोकांत पर्वत व शुक्ताचार्य हे दोन अर्थ महीभृत् व काव्य ह्यांतील श्लेषामुळें हातीं आलें. ह्या श्लेषाच्या जोरावर पर्वत व राजे ह्या एका जोडींत आणि शुक्त व काव्य ह्या दुसर्या जोडींत, दोन उपमा तयार झाल्या. ह्या दोन उपमा, एकदां राजाची व मेरूची उपमा आणि दुसर्यादा राजाची व वृषपर्व्याची उपमा-अशा दोन उपमांना ( अनुक्तमें ) उपाय झाल्या आहेत. ( म्हणजे पहिल्या दोन उपमा प्रथम बनल्या; म्हणूनच दुसर्या दोन उपमा अस्तित्वांत आल्या . )
यावर शंका-“ वरील उपमांच्या पहिल्या जोडींत, पर्वताप्रमाणें राजे लोक व शुक्ताचार्याप्रमाणें काव्य ह्या दोन उपमा स्पष्टपणें तयार झाल्या तरी कशा? कारण ह्या ठिकाणीं पर्वत व राजे लोक आणि शुक्त व काव्य ह्या उपमान व उपमेयांच्या जोडया, निरनिराळ्या शब्दांनीं कुठे सांगितल्या आहेत ? ( एकाच शब्दानें उपमेय व उपमान दोन्हीही सांगितल्यानें, उपमा थोडीच होते? उपमा तयार व्हायला उपमेय व उपमान हीं स्वतंत्र-पृथक्-शब्दांनीं सांगायला हवींत. )
ह्यावर आमचें उत्तर:- एकाच श्लिष्ट शब्दानें दोन पदार्थ सांगितले असल्यानें, त्या दोहोंमध्यें अभेदाची कल्पना ( निश्चिति ) जशी करतां येते, तशी एकाच श्लिष्ट शब्दानें सांगितलें जाणें ह्या समान धर्माच्या बळावर, त्या
श्लिष्ट शब्दानें सांगितलेल्या दोन पदार्थांमध्यें, सादृश्याची कल्पना सहज करता येते. आणि अशी सादृश्याची कल्पना करणें हें, पुढें तयार केल्या जाणार्या मुख्य ( वृषपर्व्याप्रमाणें राजा ह्या ) उपमेला अनुकूल आहे.