आतां ( शंका ) -
“ ज्या ( मुखां ) तील नाकाच्या शेंडयावर मोती आहे ’ असें तिचें मुख, बुधग्रहाचा ज्याच्याशीं थोडासा संपर्क आहे अशा पूर्णिमेच्या चन्द्र-मण्डलासारखें, शोभत आहे. ”
यासारख्या ठिकाणीं, साधारण धर्म ( एक ) नसल्यामुळें, उपमा झाली ( च ) कशी ? कारण बुधग्रह ( हा धर्म ) केवळ चंद्राजवळ आहे, आणि मोती आहे केवळ ( नायिकेच्या ) नाकावर, आतां यावर, वरील शंकेला उत्तर म्हणून, कुणी असें म्हणतील कीं, “ ज्यांतील नाकाच्या टोंकावर मोती आहे असें तिचें मुख, ज्याला बुधग्रह थोडासा चिकटला आहे अशा चंद्रमंडलाप्रमाणें शोभत आहे, ” असें, अथवा शाब्दबोधाच्या शास्त्रीय भाषेंत, “ बुधाश्लिष्ट इन्दुमंडलानें ( इन्दुमंडल या उपमानानें ) निरूपित ( म्ह० दाखविलेल्या ) सादृश्याला प्रयोजक जो विलासरूपी ( साधारण ) धर्म त्याचा आश्रय झालेलें ( तशा रीतीचें म्ह० ) नासाग्रस्थितमौक्तिक असें मुख, असें या श्लोकाचें तात्पर्य आहे असें मानलें तर, ‘ वि ’ पर्गपूर्वक लस् धात् नें दाखविला गेलेला, ‘ शोभाविशेष ’ , हा अर्थ, ( प्रस्तुत श्लोकांतील उपमेंत ) साधारण धर्म होईल; ( व ही पूर्वोपमा होईल ) आणि जर, ‘ श्लोकांतील विशेषणानें युक्त असलेल्या इंदुमंडलाप्रमाणें असलेलें, श्लोकांतील विशेषणानें युक्त असलेलें मुख शोभतें, ’ असें म्हणून ( म्ह० असा श्लोकांतील पदार्थांचा अन्वय करून ) अशा सादृश्यानें युक्त असें जें मुख त्याला उद्देश्य मानाल, व ‘ विलासाला आश्रय होणें ’ हें विधेय मानाल तर, ह्या श्लोकांतील उपमा लुप्ता होईल; व मग, ‘ कमलाप्रमाणें मुख ’ ह्या उपमावाक्याप्रमाणें ( ह्या ठिकाणीं ) आल्हादकत्व ह्या साधारण धर्माचा आक्षेप करावा लागेल, म्ह० तो धर्म, कल्पनेनें बाहेरून आणावा लागेल. ( पण ह्या दोन्हीही अन्वय पद्धतींत, एक साधारण धर्म मिळाल्यानें, प्रस्तुत श्लोकांत उपमा ही होणारच ) ”
पण हें ( सिद्धांत्याच्या बाजूच्या लोकांचें ) म्हणनें बरोबर नाहीं. कारण ( प्रस्तुत श्लोकांतील ) उपमान व उपमेय ह्या उभयतांची शोभा ही स्तविक एक नव्हेच; ( आणि म्हणूनच ती प्रस्तुत उपमेंतील साधारण धर्म होऊ शकणार नाहीं ). ( याचप्रमाणें )
“ कोंवळ्या उन्हानें लाल झालेल्या ढगांनीं युक्त अशा संध्याकाला-सारखा दिसणारा, भगवें वस्त्र नेसलेला व केशराची उटी लावलेला ( एक ) यति जात आहे. ”
या श्लोकांत, ‘ कोंवळ्या उन्हानें लाल ’ इत्यादि विशेषणांना साधा-रण धर्म मानतां येणार नाहीं; कारण तीं उपमेय व उपमान यांना साधारण नाहींत; ( बरें ) दुसरा एखादा साधारण धर्म ( मानावा म्हटले तर तोही ) आढळत नाही; आणि अशा एखाद्या साधारण धर्माची कल्पना केली तरी तो सुंदर वाटणार नाही. मग ‘ कोमलातप०’ इत्यादि श्लोकांत तरी उपमा कशी मानता येईल ? या ( मूळ शंकाकारांच्या आक्षेपा ) वर मागील
दोन्ही श्लोकांतहि उपमा आहे. असे म्हणणारे सिद्धांत पक्षाचे लोक, असें उत्तर देतात-उपमेयाचे खास धर्म व उपमानाचे खास धर्म हे उभय-साधारण नसले तरी, सादृश्यमूलक अभेदनिश्चयद्वारा त्यांना ( म्ह० दोहोंच्या भिन्न धर्मांना ) एक साधारण धर्म मानून, उपमा सिद्ध करता येते. यावर ( मूळ शंकाकारांची ) शंका अशी कीं , “ बुद्धया मानलेल्या ( आहार्य ) अभेदाच्या भ्रमात्मक ज्ञानाच्या जोरावर ( कोमलातप० इत्यादि श्लोकांत ) केशराची उटी व कोवळे ऊन ह्या वस्तुत: भिन्न असणार्या धर्मांना साधारण ठरविण्याकरितां त्या दोन्ही धर्मांचा अजिबात नसलेला अभेद कसा समर्थ होईल बरे ? भ्रमाच्या जोरावर कोणत्याही वस्तूची सिद्धि होणार नाहीं. ” पण ही शंका बरोबर नाही. ज्याप्रमाणें, पूर्वी सांगितलेल्या, ‘ त्वयि कोपोममा०’ इत्यादि वाक्यांत, उपमान व उपमेय हीं अजिबात खोटीं ( असत्य )असताहि केवळ कल्पनेनें त्यांची सिद्धि केली; त्याप्रमाणे, प्रस्तुत ( विलसत्याननं इत्यादि ) श्लोकांत ( वस्तुत: नसलेल्या ) साधारण धर्माची सिद्धि करतां येईल, असें आम्ही पुढें स्पष्ट सांगणारच आहों. यालाच प्राचीन साहित्यशास्त्री बिंब-प्रतिबिंबभाव असें म्हणतात. अशा रीतीनें-
“ चाणूर दैत्याला चिरडून टाकतांना सारखा हालणारा भगवान् श्रीकृष्णाचा हात, जगाचा संहार करतांना वेगयुक्त असणार्या शंकराप्रमाणें भासतो. ” ह्या ठिकाणी भगवान् शंकर व ( श्रीकृष्णाचा ) हात या दोहोंत, आकाराच्या बाबतींत, सारखेपणा नाहीं. तसेच, ( भासतो या शब्दानें सांगितले जाणारें ) केवळ भासणें ( म्हणजे भान ) हें कोणत्याही विशेषणावाचून घेतलें तर ( साधारण धर्म होण्याची त्याची योग्यता नसल्यानें ) उपमेला कारण होणार नाही. म्हणून ( या ठिकाणीं ) चाणूराचें मर्दन करीत असतां त्यामुळें आलेला चंचलपणा ( हा उपमेयाचा धर्म ) व जगाचा
संहार करतांना उत्पन्न झालेला जो वेग ( हा उपमानाचा धर्म ) या दोहोंत अभेद मानून, ( त्या अभेदामुळें निष्पन्न होणार्या ) एक धर्मानें विशिष्ट जो भास ( भान ) त्याला ( त्या विशेष्याला ) धरून साधारणधर्म ठरविला जातो, व त्यामुळे ( येथें ) उपमा सिद्ध होते. येथील उपमालंकारांत, चाणूर व जग हीं दोन्हीं वस्तुत: भिन्न असतांही, त्या दोहोंत, विशालत्व वगैरेमुळे सादृश्य असल्यानें, बिंबप्रतिबिंबभाव आहे; ( म्हणजे त्या दोहोंत सादृश्य-मूलक अभेद आहे, व त्यामुळें त्यांतून एक साधारणधर्म निष्पन्न होतो;) ( पण ) चूर्ण करणें व संहार करणें ( ह्या दोन क्तिया ) व चंचलपणा आणि वेगयुक्त असणें, हीं ( ह्या दोन क्तिया ), ( क्तमाने, श्रीकृष्णाचा हात व शंकर या दोन ) आश्रयांतील भेदामुळे भिन्न ( वाटत ) असलीं तरी, तीं ( त्या क्तिया ) वस्तुत: एकरूपच आहेत; आणि म्हणूनच ( त्या दोन क्तियांमध्यें ) वस्तुप्रतिवस्तुभाव आहे. आशा रीतीनें उपमेचें लक्षण सांगून झालें.