आतां ‘ अरविंदमिव सुंदरं ’ हें वाक्य घेऊं या. ह्या ठिकाणीं इवचा अर्थ सादृश्य; त्याच्याशीं, पूर्वीं, ‘ अरविंदसुंदरम् ’ ह्यांत झाला त्याप्रमाणें, अरविंदाचा, निरूपितत्वसंबंधानें इव या पदार्थाशीं अन्वय होतो. ( म्हणजे अरविंदनिरूपितसादृश्य इतका अरविंदमिव ह्या पदाचा, अर्थ झाला. आतां, त्या सादृश्याचा, पूर्वींप्रमाणेंच, सौंदर्यांशीं प्रयोजकतासंबंधानें अन्वय होतो. ( म्हणजे सादृश्य हें सौंदर्यामुळें उत्पन्न झालें असल्यामुळें, सौंदर्य हें त्या सादृश्याचें प्रयोजक म्हणजे कारण ) अशारीतीनें, अन्वय होऊन प्रस्तुत वाक्याचा-“ अरविंदानें दाखविलेल्या सादृश्याच्या प्रयोजकाशीं अभिन्न असलेलें जें सौंदर्य त्यानें युक्त जो पदार्थ त्याच्याशीं अभिन्न ” असा शाब्दबोध होतो.
पण , ‘ अरविंदमिव ’ ह्या ठिकाणीं, ‘ अरविंदानें दाखविलेल्या सादृश्यानें युक्त ’ असा, भेदसंबंधानें, एक प्रातिपदिकार्थ म्ह० येथें इवार्थ सादृश्य विशेष्य असतांना, व दुसरा प्रातिपादिकार्थ म्ह० येथें अरविंद विशेषण असतांना, त्यांचा ( इवार्थाशीं ) सरळ अन्वय करण्यांत दोष नाहीं. अशा तर्हेच्या वाच्यांत निपात जो इव त्यानें उत्पन्न झालेली जी उपस्थिति म्हणजे ज्ञान, त्याने उत्पन्न झालेली सादृश्यरूप प्रकारता, व त्या प्रकारतेनें युक्त जी विशेष्यता ( येथें सुंदरं मुखं ) यावर आलेली जी विशेष्यता हा एक प्रकार: व निपातानें उत्पन्न झालेली उपस्थिति ही जिला कारण आहे अशीं जी सादृश्यरूप विशेष्यता ( अरविंद मिव यांतील अरविदं या विशेषणाच्या दृष्टीनें इवार्थ जो सादृश्य त्याच्या ठिकाणीं आलेली विशेष्यता ) हा दुसरा प्रकार; हे दोन प्रकार सोडून बाकीच्या कोणत्याही सबंधानें नामार्थांचा शब्दबोध व्हायचा असेल तर त्या शाब्दबोधांत विभक्तीनें उत्पन्न होणारें जें अर्थज्ञान ( उपस्थिति ) तेंचि विशेष्य असतें. म्ह० दोन नामार्थांचा संबंध विभक्त्यर्थद्वाराच होतो; विभक्त्यर्थ हाच अशा ठिकाणीं विशेष्य होऊन शाब्दबोधाला कारण होतो, व नामार्थ विभक्त्यर्थाचें विशेषण होते.
[ ‘ अरविन्दमिव ’ या वाक्याच्या शाव्दबोधांत, अरविन्दनिरूपितसादृश्य असा जो अरविंद पदार्थाचा सादृश्याची साक्षात् अन्वय झाला आहे, तो ]
‘ शंकाकारांच्या मतें, योग्य नाहीं; कारण तो त्यांच्या मतें व्युत्पत्तिशास्त्राच्या नियमाच्या विरुद्ध आहे. शास्त्रनियमाप्रमाणें पाहता, प्रथम अरविंद ह्या पदाचा स्वत: पुढील प्रथमा विभक्तिच्या अर्थाशीं विशेषणविशेष्यभावानें भेदरूप अन्वय व्हायला पाहिजे आणि मग त्या विभक्तीच्या अर्थाचा इवार्थाशीं अन्वय व्हायला पाहिजे. ह्या शंकाकारांच्या शंकेला उत्तर, याच वाक्याच्या पुढच्या भागांत, दिलें आहे. त्या उत्तराचा अभिप्राय असा-] एरवीं म्ह० इवार्थ व नञ् या निपाताच्या अर्थाच्या अन्वयांना सोडून, इतर सर्व ठिकाणीं होणार्या अन्वयाच्या बाबतींत, तुमचें म्हणणें खरें आहे; म्हणजे अरविंद ह्या पदाच्या अर्थाचा त्याच्या पुढील विभक्तीच्या अर्थाशीं अन्वय व्हायलाच पाहिजे होता; व त्या अन्वयांत अरविंद ( प्रातिपदिक ) हे विशेषण व त्याच्या पुढील विभक्तीचा अर्थ विशेष्य, असाच शाब्दबोध व्हायला पाहिजे होता. पण या नियमाला एक मोठा अपवाद आहे, ( तिकडे तुम्ही लक्ष द्या. ) तो अपवाद असा:- निपातार्थाशीं म्ह० इव, नञ् वगैरेंच्या अर्थाशीं संबंध येतांना, स्वत: निपातार्थ विशेषण होत असेल ( उदा० येथें ‘ अरविन्दं इव ’ यात इवार्थ हा, पुढील मुख या प्रातिपदिकाचे विशेषण व निपातापुढील प्रातिपतिकार्थ ( मुख ) विशेष्य होत असेल, ) तर मुख या प्रातिपदिकार्थाचा इव या निपातार्थाशीं सरळ अन्वय होईल. ( म्ह० उदा० येथें इवार्थ सादृश्य हें विशेषण पुढील मुख याचें, व मुख हा प्रातिपदिकार्थ त्याचें विशेष्य होत असेल तर- ) इवशीं सरळ अन्वय होऊं शकतो. ( हा एक अपवाद ) (२) व निपातार्थाशीं संबंध येतांना, त्या पूर्वींचा एखादा नामार्थ म्ह०प्रातिपदिकार्थ, उदा० येथे अरविंद विशेषन होत असेल, व स्वत; निपातार्थ (त्याच्या अनुरोधानें ) विशेष्य होत असेल तर, मधल्या ( म्ह० अरविंदा पुढील प्रथमेच्या ) विभक्त्यर्थाशीं अन्वय न करतां, त्या नामार्थाचा निपातार्थाशीं सर्ळ अन्वय होऊं शकतो. व या दोन्ही अपवादांतील
अन्वय भेदसंबंधानेच होऊं शकतो. व त्या अन्वयातील निपातार्थ त्या नामार्थाचा एकदा विशेष झालेला असेल व एकदा विशेषण झालेला असेल. हे निपातार्थाच्या बाबतींतील अपवाद, मुख्यत: दोन निपातांच्या बाबतींत मानावे (१) नञर्थाच्या बाबतींत व (२) इवार्थाच्या बाबतींत. निपातार्थाचा अशारीतीने सरळ नामार्थाशीं, विभक्त्यार्थाला ओलांडून अथवा बाजूला सारून, अन्वय झाल्यास त्यांत कांहीं एक बिघडत नाहीं. येथें इवार्थाच्या या विशिष्ट अन्वयाच्या बाबतींत, तत्सदृश म्हणून ज्या नञर्थाचाही उल्लेख केला आहे, त्याचें उदाहरण खालीलप्रमाणें देता येईल:-
घट: पटो न ’ ह्यांत घट: व पट: हे दोन नामार्थ एकाच प्रथमा विभक्तींत असूनही त्यांचा भेदसंबंधानें अन्वय होतो.