उपमालंकार - लक्षण ३५
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां बिंबप्रतिबिंबभावयुक्त उपमावाक्यांतील शब्दबोध असा:-
“ कोवळ्या उन्हानें लालसर झालेल्या ढगानें युक्त अशा संध्या काळच्या तोडीचा, ( म्हणजे त्या सारखा ) केशराची उटी लावलेला, व भगवें वस्त्र परिधान केलेला यति जात आहे. ”
ह्या श्लोकांत, ‘ केशराच्या उटीनें युक्त असा यति, कोवळ्या उन्हानें युक्त जो संध्याकाल त्याच्याशीं सदृश असलेल्या पदार्थाशीं अभिन्न आहे ’ असा वाक्यांतील शब्दांच्या अभिधाशक्तीनें शाब्दबोध होतो आणि नंतर यति व संध्याकाळ ह्या दोहामेंमधील सादृश्याला कारण होणार जो साधारण धर्म, त्याची आकांक्षा उत्पन्न झाली असतां, श्लोकांत ऐकू येणारी ( म्ह० प्रत्यक्ष आढळणारी ) उपमान व उपमेय यांचीं कोमलातप वगैरे जीं विशेषणें त्यांच्या सादृश्यमूलक अभेदाध्यवसायानें साधारण धर्म तयार होतो. ( आतां याच श्लोकाची ) ‘ कुंकुमालेपकाषायवसनाभ्यामयं यति: । ’ अशी पहिली ओळ केली ( व कोमलातप० इत्यादि ओळ दुसरी ठेवून श्लोक तयार केला तर त्याचा शाब्दबोध पुढीलप्रमाणें होईल-
प्रथम केशराची उटी व भगवें वस्त्र परिधान करणें, हे ( केवळ ) उपमेयाचे दोन धर्म, जरी साधारण धर्म होण्यासारखे नसले तरी, ( बिंब-प्रतिबिंबभावाच्या जोरावर उपमान संध्याकाळ ह्यांच्या विशेषणाशीं त्यांच्या ) तादात्म्याचा निश्चय करून त्यांना साधारण धर्म कल्पिता येतें. आणि मग,
हा साधारण धर्म आहे असें ज्ञान झाल्यावर, त्यानें उत्पन्न होणारें जें सादृश्य त्यच्य निष्पत्तीला हा साधारण धर्म कारणीभूत होत असल्यानें, त्या साधारण धर्मांनें उत्पन्न झालेल्या संबंधानें ( म्ह० प्रयोज्यत्वसंबंधानें ) साधारण धर्माचा सादृश्याशीं अन्वय करावा. ह्या सारख्या वाक्यांत सदृश ह्या पदार्थाचा एक भाग ( म्ह० एकदेश ) जें सादृश्य त्याच्याशीं अन्वय करावा. असा अन्वय ह्या ठिकाणीं, नाइलाज म्हणून करावा लागतो, म्हणून अशा ठिकाणीं एकदेशान्वय हा दोष नाहीं; असें आम्ही पूर्वीं सांगितलेच आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP