उपमालंकार - लक्षण ७

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


ही उपमा, उपमेय कृष्ण, उपमान मेघ, पीडा हरण करणें हा साधारण-धर्म, आणि सादृश्यवाचक इव हें पद-हीं चारीही, शब्दांनीं सांगितलीं असल्यानें, पूर्णा समजावी. सादृश्याला इव या शब्दानें साक्षात्‍ सांगितलें असल्यानें, श्रौती उपमा समजावी.
पूर्णा, आर्थी व वाक्यांतील उपमा, अशी-
प्राण घेण्याच्या तुझ्या गुणामुळें, तूं मला हालाहल विषासारखा वाटतोस. हे चंद्रा, कोण्या मूर्खानें तुला सुधांशु ( म्हणजे अमृतकिरणांचा ) म्हटलें ( कोण जाणे ? ) ”
पूर्णा, श्रौती व समासांत होणारी उपमा अशी-
कमळाप्रमाणें असणार्‍या श्रीहरीच्या चरणाच्या नखांचे जे किरण, त्यांच्या समूहाप्रमाणें अत्यंत स्वच्छ अशी भीष्म-जननी गंगा, माझे डोळे निववो ”.
ह्या श्लोकांत श्रेणी ह्या पदाचा इव या पदाशीं समास झाला आहे. पूर्णा आर्थी व समासांत होणार्‍या उपमेचें उदाहरण हें-
“ हे राजा, लोकांना आनंद देण्यानें, त्यांचा ताप सर्व बाजूंनीं दूर करण्यानें, व सर्व कलांत प्रवीण असल्यानें, तूं चंद्रासारखा आहेस. ( चंद्र ही आनंद देणारा, ताप दूर करणारा व षोडश कलांनी युक्त असा असतो ). ”
पूर्णा उपमेच्या श्रौती व आर्थी ह्या, तद्धितांत होणार्‍या, दोन प्रकारांचे
हे उदाहरण:-
“ सकल जगाला पूज्य अशी ज्याची कांति नूतन मेघाप्रमाणें आहे; व कमलाप्रमाणें ज्याचे डोळे विशाल आहेत; अशा त्या सगुन ब्रह्माचा ( भगवान्‍ श्रीकृष्णाचा ) मी आश्रय घेतों. ”
ह्या श्लोकाच्या पूर्वार्धांत ‘ तत्र तस्येव ’ ह्या सूत्रानें सांगितलेलें सादृश्य असल्यामुळें , ही श्रौती तद्धित उपमा आहे, व उत्तरार्धांत ‘ तेन तुल्यम्‍ ० । ’
इत्यादि सूत्रानें सांगितलेला सदृश्य या अर्थी ‘ वत्‍ ’ हा तद्धित प्रत्यय आला असल्यानें ही आर्थी व तद्धितांतील उपमा आहे. उपमानलुप्ता ह्या प्रकारां-तही वाक्यांत असलेली उपमा अशी:-
“ सर्व फुलांत श्रेष्ठ असणार्‍या हे चाफ्याच्या फुला, अलैकिक रंग व चहूंकडे दरवळणारा अलैकिक सुगंध ह्या बाबतींत, ज्याच्याशीं तुझी तुलना करता येईल, असा पदार्थ आम्हांला मुळींच ठाऊन नाहीं. ”
ह्या श्लोकांतील ‘ यस्य तुलामधिरोहसि ’ ह्या पदांच्या ऐवजीं, ‘ यत्तुलनामधिरोहसि ’ अशीं पदें घालून, पहिला चरण तयार केला तर, हाच श्लोक समासांतील उपमानलुप्ता उपमेचें उदाहरण म्हणून देतां येईल.
येथें कुणाला अशी शंका येईल कीं, . “ ह्या श्लोकांत उपमानाचा अभाव असल्यानें शेवटपर्यंत सादृश्याचा अभावच दिसतो आणि ‘ सादृश्य शेवटपर्यंत दिसणें ’ हा तर उपमेचा प्राण आहे; तेव्हां, ह्या ठिकाणीं, दुसरा कोणता तरी अलंकार मानावा; पण उपमानलुप्ता ( उपमा ) मानूं नये. ” पण अशी शंका घेण्याचें कारण नाहीं. कारण कीं, ज्याच्याशीं तुझी तुलना करतां येईल असा पदार्थं आम्हांला माहीत नाहीं असें म्हटल्यानें, “ आम्ही सर्वज्ञ नसल्यानें आम्हांला माहीत नाहीं; पण आम्हांला माहीत नसणारा एखादा पदार्थ तुझें उपमान म्हणून असूं शकेलही, ” असा अर्थ होऊन, शेवटीं येथें सादृश्यच दाखविलें जातें. तेव्हां येथें उपमानलुप्ता उपमाच आहे. दुसरा कोणताही अलंकार नाहीं .
अशा रीतीनें ( वरीलसारख्या ) श्लोकांत शेवटीं सादृश्य प्रतीत होत असल्यानें, )
“ हे भ्रमरा, तूं गुड्‍ गुड्‍ करीत ( अथवा धुंडाळीत ) केवड्याच्या बनांत मेलास तरी, मालतीच्या फुलासारखें फूल तुला केव्हांही मिळणार नाहीं. ”
ह्या श्लोकांत, उपमेहून निराळाच असा, असमालंकार आहे असें म्हणणारे अलंकाररत्नाकरकार वगैरेंचें खंडन झाल्यासारखेंच आहे. ( कारण येथेंही शेवटीं उपमानाची प्रतीति होतेच. )
धर्मलुप्ता श्रौती वाक्यांतील उपमा ही-
“ चंद्राच्या एकच उरलेल्या कलेप्रमाणें, अथवा मूळ तोडलेल्या रायआवळीच्या लतेप्रमाणें, पूर्ण शोकानें विव्हळ झालेली ती सीता अशो-काच्या मुळाशीं बराच वेळ बसली. ”

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP