आतां वाच्य अलंकाराला उपस्कारक असलेली उपमा ही:-
“ ज्याप्रमाणें कमल शिशिर ऋतूमुळें अथवा चंद्रमंडळ दिवसा-मुळें, त्याप्रमाणें हे सुंदरी, कोपामुळें तुझें तोंड, जरासुद्धां शोभत नाहीं . ”
ह्या श्लोकतील उपमा, वाच्य दीपकालंकाराला उपस्कारक आहे. पण, रसभाव वगैरे कधींहि वाच होत नाहींत असें पूर्वींच आम्ही सांगितलें आहे.
आतां ह्या ठिकाणीं एक शंक अशी कीं, एका अलंकाराला दुसरा अलंकार उपस्कारक होतो, असें तुम्ही कसें म्हणतां ? कारण कीं, प्रधान अर्थ असेल तरच तो अलंकार्य असतो. ( तो स्वत: अलंकार नसतो. )
( आतां अशा अलंकार्याला उपस्कारक होईल तो अलंकार, हें कबूल; पण दुसर्या अलंकारानें उपकार्य होणारा, स्वत: अलंकार असू शकेल तरी कसा ? ). पण ही शंका बरोबर नाहीं. उपमा वगैरे अलंकार, व्यंग्य झाले असतां, प्रधान होतात; मग त्यांना उपस्कारक म्हणून रसवत् वगैरे दुसरे अलंकार आले आणि ती व्यंग्य उपमा अलंकार्य झाली तर, त्यांत विरुद्ध असें कांहींच नाहीं. त्याचप्रमाणें एखादा वाच्य अलंकार ( श्लोकांत ) मुख्य म्हणून आला असेल, आणि त्याला उपस्कारक म्हणून दुसरा एखादा अलंकार आला असेल तर त्यांत गैर तें काय? ज्याप्रमाणें दुकानांत विकायला ठेवलेल्या मालांत, एखादें सोन्याचें कर्णभूषण असेल; व त्याला, शोभा देण्याकरितां म्हणून एखादें रत्न, अलंकार म्हणून त्या कर्णभूषणाला जडविलें असेल, तर तें योग्यच होईल. आणि असें तें रत्नजडित सोन्याचें कर्णभूषण, पुन्हां, सुंदर स्त्रीच्या कानांत अलंकार म्हणून घालण्यांत आलें तर, त्या स्त्रीचे कान, जी प्रधान वस्तु, तिला साक्षात् शोभा देणारे सोन्याचें कर्णभूषण, व त्या सोन्याच्या भूषणांतील त्याला जडविलेलें रत्न, ही परंपरेने त्या सुंदर स्त्रीच्या कानाचें भूषण होतात; व अशा रीतीनें त्या सोन्याच्या अलंकाराला व रत्नाला-दोघांनाहि अलंकार म्हणतां येतें, त्याप्रमाणें, वाक्यांत, मुख्य रस व्यंग्य असेल तर, त्याला उपस्कारक एखादा रूपकादि अलंकार व त्या रूपकादि अलंकाराला शोभा देणारा दुसरा एखादा अलंकार आला असेल, तर त्या दोघांनाहि मुख्य रसादि व्यंग्याचे उपस्कारक ( अलंकार ) म्हणतां येईल.
अशा रीतीनें, प्राचीनाच्या मतें उपमेचे २५ प्रकार व पुन्हां त्यांपैकी प्रत्येकीचे वर दाखविलेल्याप्रमाणें पुन्हां पांच पोटप्रकार मानल्यास, एकंदर उपमेचे १२५ प्रकार होतील. ज्यांच्या मतें उपमेचे मुख्य बत्तीस होतात, त्यांच्या मतें त्यांतील प्रत्येकीचे पाच पोटप्रकार मिळून एकंदर १६० प्रकार होतील. ह्याहीपेक्षां जास्त प्रकार होणे शक्य आहे; ते सूक्ष्म बुद्धीच्या विद्वानांनीं स्वत: शोधून काढावे.
आतां ह्या उपमेच्या सर्व प्रकारांतील साधारण धर्म, कुठें अनुगामी असतो, तर कुठें केवळ बिंबप्रतिबिंबभावयुक्त असतो; कुठें ह्या दोन्ही प्रकारांचें मिश्रण असते; तर कुठें तो वस्तु-प्रतिवस्तु भावानें मिश्रित अशा बिंबप्रति-बिंबभावानें युक्त असतो; कुठें साधारण धर्म खरा ( साधारणधर्म ) नसूनहीं उपचाराने साधारण धर्म बनविलेला असतो; तर कुठें तो केवळ शब्दरूप असतो. अशा ह्या साधारण धर्माच्या अनेक प्रकारांपैकीम अनुगामी धर्माचें ( म्हणजे अनुगामी धर्म असलेल्या उपमेचें ) उदाहरण हें-