“ तिचें निर्मळ तोंड कलंकरहित चंद्रासारखें दिसतें, ” ह्या वाक्यांत वैमल्य ( म्हणजे निर्मळपणा ) व निष्कलंकत्व ह्या दोहोंचा खरें पाहतां एकच अर्थ असल्यानें, त्यांच्यांत वस्तुप्रतिवस्तुभाव आहे. आणि तो बिंबप्रति-बिंबभावाने मिश्रित नसल्यामुळें, शुद्ध स्वरूपाचा आहे. ह्या शुद्ध वस्तु-प्रतिवस्तुभावाने युक्त अशा दोन धर्मांनीं ह्यांतील उपमा तयार होते, असें मानले तर, शुद्ध वस्तुप्रतिवस्तुभावानीं युक्त साधारणधर्म असा सहावा प्रकारही सांगता येईल. येथें कुणी म्हणतील कीं, ह्या ठिकाणीं वस्तुप्रतिवस्तु-भावयुक्त साधारण धर्म मानण्याची जरूरच काय? कारण, ‘ कोमलातप-शोणाभ्र०’ इत्यादि श्लोकांत यति व सायंकाळ यांची उपमा साधण्याकरता दुसरा कोणताहि साधारण धर्म मिळत नसल्यानें, केशराची उटी व भगवें वस्त्र ही जोडी एका बाजूला, आणि कोवळें ऊन व लाल ढग ही जोडी दुसर्या बाजूला, ह्यांच्यांत बिंबप्रतिबिंबभाव जसा अवश्य मानवा लागतो, ( व तो मानूनच साधारण धर्म तयार करावा लागतो ) तसा प्रस्तुत ठिकाणीं ( म्हणजे ‘ विमलं वदनं तस्या: ’ ह्या श्लोकांत ) वस्तुप्रतिवस्तु
भाव मानणें, साधारण धर्माकरता मुळीं आवश्यक नाहीं. कारण वदन व चंद्र ह्या दोहोंमध्यें सौंदर्य हा साधारण धर्म उघड दिसत असल्यानें, दुसर्या साधारण धर्माची कांहीम जरूर नाहीं. ”
ह्यावर आम्ही असें विचारतों कीं, वरील श्लोकांत प्रतीयमान म्हणजे सूचित साधारणधर्म जो सौंदर्य, त्यानें जर काम भागत असेल तर, ‘ यान्त्या मुहुर्वलितकंधरमाननं तदावृत्तवृन्तशतपत्रनिभं वहन्त्या । ’ ( मालतीमाधव १ ) ( ज्याचा देठ वाकला आहे अशा कमलाप्रमाणें, ज्यांतील मान फिरून फिरून वळविली आहे असें वदन धारण करणार्या तिनें ) इत्यादि भवभूतीच्या श्लोकांतसुद्धां, सूचित होणार्या सौंदर्य ह्या साधारण धर्मानें काम भागलें असतें; तरीपण, ह्या श्लोकांतील मान व देंठ ह्या दोहोंत बिंबप्रतिबिंबभाव, आणि लवणें व वळणें ह्या दोहोंत वस्तुप्रतिवस्तुभाव आहे, असें सर्व आलंकारिकांनीं जें मानलें आहे तें तुमच्या, वरीलप्रमाणें मानण्याच्या, विरुद्ध जाईल. तेव्हां आम्ही ‘ विमलं वदनं तस्या: । ’ ह्या वाक्यांत वस्तुप्रतिवस्तुभावयुक्त साधारण धर्म दाखविला आहे तेंच योग्य आहे.