उपमालंकार - लक्षण १७

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


“ शरद्‍ ऋतूंतील चंद्राप्रमाणें आल्हादजनक असलेला रघुनाथ ( रामचंद्र ), वनमालेच्या योगानें, इंद्रधनुष्ययुक्त मेघाप्रमाणे शोभला. ”
ह्या श्लोकांतील पूर्वार्धांत आल्हादजनक हा धर्म एकदांच सांगितलेला असल्याने अनुगामी आहे. केवळ बिंबप्रतिबिंबभावरूप साधारण धर्म ( पूर्वीं आलेल्या ) ‘ कोमलातपशोणाभ्र०’ इत्यादि श्लोकांत आहे असें जाणावें. व ह्या श्लोकाच्या ( म्ह० प्रस्तुत शरदिन्दु० ह्याच्या ) उत्तरार्धांतील उभय प्रकाराच्या ( म्ह०बिंबप्रतिबिंबभावयुक्त अनुगामी धर्म आहे ) असें समजावे. ( म्ह० विभाति हा धर्म अनुगामी आणि वनस्रजा व सेन्द्रचाप हा बिंबप्रतिबिंबभावयुक्त. )
आतां साधारण धर्माच्या तिसर्‍या प्रकाराचे ( म्ह० बिंबप्रतिबिंबभाव-मिश्रित वस्तुप्रतिवस्तुभावरूप साधारण धर्म असलेल्या प्रकाराचे ) पुन्हा तीन पोट प्रकार होतात. ते असे:- केवळ विशेषणांतच असलेल्या, केवळ विशेष्यांतच असलेला, अथवा त्या दोहोंत असलेला; असा तीन प्रकारचा ( बिंबप्रतिबिंबभावरूप ) साधारण धर्म , वस्तुप्रतिवस्तुभावानें मिश्रित होऊन येतो. ह्यापैकीं पहिल्या प्रकारचें उदाहरण हें-
“ ज्यामध्यें भुंगे पिंगा घालीत आहेत अशा कमलाप्रमाणें चंचल असणार्‍या नयनांनीं युक्त, असें तिचें मुख पहावयास मिळेल तर, मदन खुशाल रागावो, त्याची काय परवा ? ”
ह्या ठिकाणीं चलन व अधीरत्व हीं दोन्हीं विशेषणें, खरें पाहतां एकाच अर्थाचीं आहेत; पण तीं निरनिराळ्या शब्दांत सांगितलीं असल्यानें, त्यांच्यांत वस्तुप्रतिवस्तुभाव आहे. उलट ह्या विशेषणांचीं जीं दोन विशेष्य़ें-
भृग व नयन - त्यांच्यांत बिंबप्रतिबिंबभाव आहे. म्हणून विशेषणांतील, व वस्तुप्रतिवस्तुभावानें मिश्रित जो प्रतिबिंबभाव, त्यानें युक्त हा प्रकार आहे, असें म्हटलें आहे. दुसर्‍या ( म्हणजे केवळ विशेष्यांत असलेला व वस्तुप्रति-वस्तुभावानें मिश्रित, जो बिंबप्रतिबिंभाव, त्यानें युक्त असणार्‍या ) साधारण धर्माचें उदाहरण हें :-
“ प्रियंगु लतेनें वेष्टिलेल्या तमाल वृक्षाप्रमाणें, लक्ष्मीकडून लीलेनें आलिंगिलेला भगवान विष्णु, माझा देह पडण्याच्या वेळेला माझ्या ह्लदयांत प्रकाशित होवो. ”
ह्या ठिकाणीं आलिंगिला जाणें व वेष्टिला जाणें ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असल्यानें, ह्यांत वस्तुप्रतिवस्तुभाव आहे. हीं दोन्हीं विशेष्यें आहेत. आतां, त्यांची विशेषणें जीं जलधिकन्या व प्रियंगुलता, त्या दोहोंत बिंबप्रतिबिंबभाव आहे. तेव्हां ही बिंबप्रतिबिंबभावमिश्रित वस्तुप्रतिवस्तुभाव-युक्त उपमा आहे.
आतां मिश्रित साधारण धर्माचा तिसरा प्रकार हा-“ घमेंडखोर रावणाकडून नेली जाणारी सती सीता, मदांध हत्ती-कडून खेंचल्या जाणार्‍या कमळाच्या वेलीसारखी वाटली. ”
ह्या श्लोकांतील दृप्तत्व व मदांधत्व ह्या दोन विशेषणांत आणि नीयमानत्व व कृष्यमाणत्व ह्या दोन विशेष्यांत वस्तुप्रतिवस्तुभाव आहे; व ह्या दोन वस्तुप्रतिवस्तुभावयुक्त धर्मांच्या मध्येम दशानन व द्विरद ह्यांच्यांतील बिंबप्रतिबिंबभाव सांपडला आहे; म्हणून हाहि त्या दोन्ही भावांच्या मिश्रणाचा प्रकार आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP