ह्या उपमालंकाराचे, प्राचीनांच्या मतानुसार, कांही प्रकार होतात, ते सांगतों-
उपमा दोन प्रकारची-(१) पूर्णा व (२) लुप्ता. पुन्हां, पूणेचे श्रौती व आर्थी असे दोन प्रकार होत असून, ते प्रत्येकीं, वाक्य, समास व तद्धित ह्यांत संभवतात; त्यामुळें पूर्णा उपमेचे एकंदर सहा प्रकार होतात. आतां, लुप्ता उपमेचे सात प्रकार होतात, ते असे- (१) उपमानलुप्ता (२) धर्मलुप्ता (३) वाचकलुप्ता (४) धर्मोपमानलुप्ता (५) वाचक-धर्मलुप्ता (६) वाचकोपमेयलुप्ता व (७) धर्मोपमानवाचकलुप्ता. ह्यांपैकीं, पहिली उपमानलुप्ता वाक्यांत व समासांत संभवते; म्हणून ती दोन प्रकारची. धर्मलुप्ता, समासांत असेल तेव्हां, श्रौती व आर्थी अशी दोन प्रकारची. वाक्यांत होणारी धर्मलुप्ता उपमा दोन प्रकारची ( म्ह० श्रौती
व आर्थी ); पण, ती तद्धितांत जेव्हां असेल तेव्हां श्रौती नसते; ती केवळ आर्थीच असते. अशा रीतीनें धर्मलुप्ता उपमा पांच प्रकारचील. आतां वाचकलुप्ता ही (१) समासामध्यें, (२) कर्मक्यच् मध्यें (३) आधार-क्यच् मध्यें (४) क्यड्मध्यें, (५) कर्मणमुल् मध्यें व (६) कर्तृणमुल् मध्यें, अशी सहा प्रकारची. धर्मोपमानलुप्ता दोन प्रकारची-(१) वाक्यांत व (२) समासांत. वाचकधर्मलुप्ता, क्किब् प्रत्यययुक्त शब्दांत व समासांत अशी दोन प्रकारची. वाचकोपमेयलुप्ता एक प्रकारची व धर्मोपमानवाचकलुप्ता फक्त समासांतच संभवते, म्हणून एकच प्रकारची. असे हे लुप्तोपमेचे एकंदर एकोणीस प्रकार होतात. व ते पूर्णेच्या ६ प्रकारात मिळविले, म्हणजे समग्न उपमेचे एकंदर पंचवीस प्रकार होतात. ह्या सर्व प्रकारांचीं क्तमानें उदाहरणें देतों .
पूर्णा, श्रौती व वाक्यांत होणारी उपमा, अशी “ ग्रीष्म ऋतूंतील सूर्यमंडलाच्या भयंकर ज्वाळांत फिरत असल्यानें, ज्याचें शरीर तप्त झालें आहे, अशा माझी पीडा, पावसाळ्यांतील ढगाप्रमाणें असणारा श्रीकृष्ण दूर करो. ”
ह्या श्लोकांत, ( इवेन नित्यसमासो- इत्यादि वार्तिकांतील नियमा-प्रमाणें, खरें म्हणजे, प्रावृषेण्य ह्या पदाशीं इव या पदाचा समास होणें योग्य होतें; पण ) प्रावृषेण्य हें पद वारिधर ह्या पदाचें विशेषंण असल्यानें, त्याचा इवशीं कांहीं संबंध नाहीं ( इव ला त्याची आकांक्षा नाहीं ); ( बरें, ह्या श्लोकांतील मुख्य विशेष्य जें वारिधर पद, त्याच्याशीं इव पदाचा समास होईल म्हणावें, तर तसेंही होणार नाहीं; कारण उपमानवाचक पदाच्या अगदीं जवळ असलेल्या इव पदाचाच त्या उपमानवाचक पदाशीं समास होतो, असें वार्तिक सांगतें; आणि वारिधर हें पद इवच्या जवळ नसल्यानें त्याचा इवशीं समास होणार नाहीं ). शिवाय सदरहु वार्तिकांतील शब्द ( ‘ इवेन नित्यसमास: ’ । असे नसून ) ‘ इवेन समास: ’ । असेंच आहेत. आणि ( ‘ सर्वे समासविधय: अनित्या: ’ असा वैयाकरणांचा संकेत असल्यानें ) इवशीं होणारा समास नित्य नसल्यानें ( इव हें पद वारिधर ह्या पदाची आकांक्षा बाळगते असें मानलें तरी, वारिधर ह्या पदाचा ‘ इव ’ शीं समास आवश्यकही नाहीं ( अर्थात् हें वाक्यगता उपमेचेंच उदाहरण आहे. )