उपमालंकार - लक्षण ५

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


हें विद्यानाथानें केलेले उपमेचें लक्षणहि खंडित झालें ( असें समजावें. ) कारण त्या लक्षणाची, व्यतिरेक अलंकारांत निषेधाचें प्रतियोगी म्हणून आलेल्या सादृश्यांत, अतिव्याप्ति होते ( व ) याच प्रकारें ‘ उपमान व उपभेय होण्याला योग्य अशा दोन पदार्थांचें जें रम्य सादृश्य त्याला काव्यज्ञ लोक उपमा म्हणता. ” हें प्राचीनांचें लक्षणही चुकीचें ठरतें. कारण ह्लद्य या साधर्म्याच्या विशेषणानें काम भागत असल्यानें , इतर ( म्हणजे ‘ उपमानो .... योग्ययो: ’ व ‘ द्वयो: ’ हीं विशेषणें व्यर्थ आहेत. ह्याचप्रमाणें ( “ उपमान व उपमेय या  दोहोंत ) भेद असतां, त्यांतील साधर्म्याला उपमा म्हणतात. ”
हें काव्यप्रकाशकारांनीं दिलेलें ( उपमेचें ) लक्षणही फारसें रमणीय नाहीं. कारण, व्यतिरेकालंकारांतील निषेधप्रतियोगी सादृश्य, ( या लक्षणा-प्रमाणें ) उपमा होऊ लागेल. “ शेवटपर्यंत राहणारें हें विशेषण साधर्म्याला द्या ( म्हणजे त्याची व्यतिरेकालंकारांत अतिव्याप्ति होणार नाहीं ) ” असें म्हणू नये. कारण तुमच्या या ( ‘ पर्यवसायी ’ या ) विशेषणानें, अनन्वय अलंकारांतील सादृश्याचा निरास होत असल्यानें, ( तुमच्या लक्षणांत तुम्ही दिलेलें ) ‘ भेदे’ ( भेद असतां ) हें विशेषण व्यर्थ होण्याची आपत्ति येईल. ( आणि शिवाय ) काव्यांतील अलंकारांच्या ( विवेचनाच्या ) सुरवातीलाच, लैकिक, अलैकिक ( शास्त्रीय ) प्रधान, वाच्य, व्यंग अशा ( विविध ) उपमांना लागू पडणारें असे ( उपमेचें ) सामान्य लक्षण करणें, हें योग्य नव्हे. ( आणि ) म्हणूनच,
‘ भेद व अभेद सारखे असतां, ( उपमान व उपमेय ह्या दोहोंतील ) साधर्म्याला उपमा म्हणतात. ’
हे अलंकारसर्वस्वकारानीं केलेलें ( उपमेचें ) लक्षणही असेंच ( म्ह० चुकीचें ) समजावें.
अशाच प्रकारें,
“ प्रसिद्धगुण अशा उपमानाशीं, अप्रसिद्धगुण अशा उपमेयाचें जें सादृश्य ती उपमा. ”
हें अलंकाररत्नाकारानें सांगितलेलें ( उपमेचें ) लक्षणही ( मनावर ) प्रभाव पाडणारें नाहीं. कारण, श्लेषमूलक उपमेंत, श्लिष्टशब्दरूपी साधारण धर्माची दृष्टीनें उपमान प्रसिद्ध नसतें. ( म्ह० तो श्लिष्टशब्द उपमानधर्म म्हणून प्रसिद्ध नसतो )
असें हें दुसर्‍यांचें ( त्यांच्या लक्षणांतील ) दोष शोधून काढणें, पुरें झालें ( बस्स झालें ). आतां चालू विषयाकडे वळूं या.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP