उदाहरणार्थ-
“ सकाळीं फटफटीत उजाडलेलें पाहून आपल्या सैल झालेल्या निर्या आवरून ती कमलनयना आपली शय्या सोडायच्या बेतांत होती. अशा वेळीं कमळाच्या गाभ्यासारख्या तिच्या नाभीची मी पाहिलेली कांति माझ्या मनांतून बिलकुल जात नाहीं. ”
ह्यांत ‘ सरसिजोदरसोदरा ’ ह्याचा सरळ अर्थ, कमळाच्या उदराची ( आंतल्या भागाची ) सख्खी बहीण हा, येथें जुळत नसल्यानें, त्याचा बाध करून, लक्षणेनें त्याचा, ( कमळाच्या गाभ्या ) सारखी हा अर्थ केला. ह्या लक्षणेंतील प्रयोजन, कमळाच्या गाभ्याची जी शोभा, तिच्यांत बहिणीप्रमाणें सारखी वाटेकरी होणें, हें आहे; व सदृश हा अर्थ लक्षणेनें हातीं येत असल्यानें, ( कमलोदर व नाभि ह्या उपमानोपमेयांनीं होणारी ) ही आर्थी उपमा आहे, ( श्रौती नाहीं. ) आतां, ‘ मानसात् अवरोहति ’ या पदाची ( स्मृतींतून ) नाभीची कांति हा विषय पार उतरणें, अथवा विसरणें ह्या-अर्थी लक्षणा करून विसरणें हा जो अर्थ झाला त्याचा, नैव पदानें निषेध
केला असतां, ( कधींही विसरत नाहीं म्हणजे ) स्मरण राहतें, हा अर्थ व्यंजनेनें हातीं येतो. ह्या स्मृतिरूपी व्यभिचारी भावाला वरील ( आर्थी उपमा उपस्कारक आहे. ह्याचप्रमाणें ‘ प्रतिभट, प्रतिमल्ल ’ इत्यादि शब्दांचीही सदृश ह्या अर्थीं लक्षणाच मानावी. कारण ह्या शब्दांत ( उपमानाला ) खालीं पाडणें ( त्याच्या ) शोभारूपी सर्वस्वाचेम हरण करणें, इत्यादि प्रयोजन येथें स्पष्ट आहे; म्हणून सदृश ह्या अर्थी वरील शब्दांची लक्षणा मानावी. पण येथें व्यंजनामात्र मानतां येणार नाहीं. कारण ह्या ठिकाणीं मुख्यार्थाचा बाध झाला आहे. ( आणि व्यंजनेंत मुख्यार्थबाध होत नाहीं. ) आतां वर सांगितलेल्या लक्षणेंत, प्रयोजनाच्या वर्क्षेत मात्र व्यंजना आहे, हें उघडच आहे.
कुठें कुठें ही उपमा व्यंग्य असूनही अलंकार होते. उदाहरणार्थ -
“ हे चंद्रा, ( आपल्या ) कांतीमुळें ( स्वत:ला ) अद्वितीय समजून कशाला आनंदित होतोस ? अरे मूर्खा, ही सारी पृथ्वी कुणी ( धुंडाळून ) पाहिली आहे ? ”
आपल्या किरणांनीं ताप देणार्या चंद्राला उद्देशून, परमुलखांत असलेल्या कुणाची तरी ही उक्ति आहे. ह्या श्लोकांत, “ कधींही घराबाहेर न पडलेल्या आणि म्हणूनच तुझ्या ( म्ह० चंद्राच्या ) सुद्धां दृष्टीस न पडलेल्या माझ्या प्रियेचें मुख, तुझ्यासारखें ( म्ह० चंद्रासारखें ) आहे ” या अर्थाला व्यक्त करणारी ही ( व्यंग ) उपमा आहे. आणि मूढ ह्या शब्दानें व्यक्त झालेल्या, व चंद्राविषयीं वक्त्याला वाटणार्या, असूयारूपी भावाला, ही व्यंग्य उपमा अलंकृत करते,
म्हणून हिला अलंकार म्हणावे. ह्यावरून ( हें सिद्ध झालें कीं, ) अप्पय दीक्षितांनीं स्वत:केलेल्या उपमेच्या लक्षणांत दिलेलें अव्यंग्यत्व हे विशेषण योग्य नाहीं. कारण असें कीं व्यंग्यत्व आणि अलंकारत्व ह्या दोहोंत कस-लाही विरोध नाही. आतां हें खरें कीं, अलंकार मुख्यत्वानें व्यंग्य असेल तर त्यांत व अलंकारांत विरोध असल्यानें प्रधान व्यंग्यांत, अलंकाराचें लक्षण अतिव्याप्त होऊ नये म्हणून, त्या लक्षणांत उपस्कारक हें विशेशन अवश्य घालावें; पण अलंकाराच्या लक्षणांत अव्यंग्य हें विशेषण घालण्याची कांहीं जरून नाहीं. नाहींतर, ( म्ह० उपमेला अव्यंग्य हें विशेषण दिलें तर ) आतां वर दिलेल्या उदाहरणांतील, व्यंग्य असूयाभावाला, व्यंग्य उपमा मदत करीत असल्यानें, ती व्यंग्य आहे एवढ्याचमुळें उपमालंकार होणार नाहीं. आतां ह्यावर म्हणतील कीं, बिंबप्रतिबिंबभावापन्न साधारण धर्म स्थलीं ह्या साधारण धर्माचीं जीं विशेषणें त्यांतही परस्पर उपमा असतेच: पण ती व्यंग्य असते आणि शिवाय ती उपमा मुख्य उपमेला अलंकृत करते. म्हणून तीही अलंकार होऊ लागेल; तेव्हां तिला अलंकार भ्हणता येऊं नये म्हणून उपमेच्या लक्षणांत अव्यंग्य हें विशेषण घातलें पाहिजे. ह्या आक्षेपावर आमचें उत्तर-
विशिष्टोपमा वगैरे स्थलीं, विशेषणांत असणार्या व्यंग्य उपमा, वाच्य जी मुख्य उपमा तिची सिद्धि करीत असल्यानें, त्या विशेषणांतील उपमांना गुणीभूत व्यंग्य म्हणा; अलंकार म्हणूंच नका. कारण ह्या व्यंग्य उपमा कोणत्याही पूर्वीं सिद्ध असलेल्या वस्तूला अलंकृत करीत नसून, फक्त प्रधान उपमेची सिद्धी करतात. तेव्हा अव्यंग्यत्व हें विशेषण न देतांही ह्या विशेषणीभूत व्यंग्य उपमांना अलंकाराच्या सदरांतून बाहेर काढतां येत असल्यानें, व्यंग्यत्व व अलंकारत्व ह्या दोहोंत विरोध नाहीं, असें म्हणण्यांत कसलीच असंगति नाहीं.