मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
मंगळाचरण

आदिखंड - मंगळाचरण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


श्रीमन्मदगोपालोज्जयति ॥ श्रीगणेशाय नम: ॥
श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरवे नम: ॥
श्रीसिध्देशाय नम: ॥ श्रीचामुंडायै नम:॥
प्रणम्य शंकरं देवं देवदेवं जगद्रुरुं । तत्प्रसादेन वक्ष्यामि बालावबोध मनुत्तमं ॥१॥
बाल्यं रम्यमिति व्यर्थं बुध्दय: कल्पयंति यम्‍ । भेदैरुध्दरतानीत: संसारकुहरे भ्रम: ॥२॥
विकल्पाक्ल्पनातल्प जल्पितैर्भेदबुध्दिभि । स्तान्मूर्खपुरुषान्‍ बालान्‍ धिगस्तु हॄतचेतस: ॥३॥
आदौ शमदमप्रायैर्गुणै: शिष्यं विशोधयेत्‍ । पश्चात्सर्वमिदं ब्रह्म शुध्दस्त्वमिति बोधयेत्‍ ॥४॥
सम्यक् ज्ञानेन बोधेन मंदबुध्दिर्निवर्त्तते । निराकारा निजाशांता मुक्तिरेव प्रवर्त्तते ॥५॥
यतो वाचो निवर्त्तंते इति सल्यवती श्रुति: । इत्युक्तवचनं त्वेव प्रोवाच मनसा स्वयं ॥६॥
==
अथ सुरेशी ॥ऽ॥
स जयति भूतिभूषणा । सर्वातरेंबाह्यपूर्णा । जी त्रिंबका त्रिभुवना । मंगलनिधी ॥१॥
अनादिमूर्ति श्रीसिध्देशा प्रकाश स्वयंप्रकाशा । जगदात्मया जगदीशा । जगत्पूर्णा ॥२॥
जी जगदादि जगज्जनका । जगस्त जगद्‍व्यापका । जगदात्मयां चालका । जगन्मूर्त्ति ॥३॥
हें जे प्रपंच उभारणी । ते तुजपासोनि तुझां स्थानीं । जैसी अंबरा बिंबे वाणि । निजतंतुसी ॥४॥
शक्ति तुझां अहंभावी । तुं शक्तिचक्रांचा गोसावीं । रुपें धरुनि मायावी । प्रकट होसी ॥५॥
ते माया तुझेनि घटें । तुं न भुलतां देहो फुटे । येरा वाजे कांबिटे । संसाराचें ॥६॥
इंद्रादिके बापुडीं । अखंड जीजा बांदोडी । ते मायादेवीचि प्रौढी । कवण जाणें ॥७॥
मायामूर्ति खेचरा । आवत्ति पाडिलें चराचरा । ते तुज अधिन ईश्वरा । बाधिल कैसी ॥८॥
जेवि कारागृहिचां रक्षकीं । धरुनि रक्षावीं पारकीं । स्वामिचिये कौतुकीं । तया बंधु नव्हे ॥९॥
ते तुझेनि ये भेदा । तर्‍हीं असंभावनीय अगाधा । जयेसी नाहीं मर्यादी । कव्हणे काळीं ॥१०॥
जे निमे ना उठे । लपे ना प्रकटे । पोकळी ना दाटे । निरंतर जे ॥११॥
जे सरे ना भरे । जे चळे ना थावरे । सछिद्रता ना सघण सर्वातरे । सर्वादि जे ॥१२॥
जें ब्रह्मी ब्रह्म संचली । वाढोनी विश्वाकार जाली । ते मोटकी सामावली । सप्तश्रृगीं ॥१३॥
सप्त चक्रें आदिवंते । ते श्रृगें अधिदेवतें । वाटिका मातृका तेथें । शबळचंडी ॥१४॥
हें नां सप्ता धरणें । मूळेंचा तेथें सारें सप्तश्रृगें । तो हा ब्रह्मांडाद्रि जगें । जाणावा ऐसा ॥१५॥
तो हा शाश्वतळमूगिरी । तत्त्वसृष्टीउद्याना माझारी । तेथ शबळ ब्रह्म सर्वेश्वरीं । पूर्ण नांदे ॥१६॥
ते भवानी चंडिका । या जगा जगदंबिका । आदिद्रष्टु तुं त्रिंबका । श्रीसिध्देश्वरु ॥१७॥
तुमचेंनि अभिवंदनें । ज्ञान होय हातधरणे । ह्मणौनि आरंभि येषणें । अंत:करण ॥१८॥
या उल्लासाचें हावें युक्ति पदपंथी धावें । ते ब्रह्मानंदीं विसावें । ये चीं प्रसंगी ॥१९॥
सौरम्याचेनि पीके । शब्द होती नेटुके । पाठी उन्मेषा ही अधीकें । दळे चढती ॥२०॥
तुझी पुरस्काराल हे वाणी । तैं वाचा होईल ताम्रपर्णी । ते मोलातीत पीकेल खाणि । शब्दरत्नाचीं ॥२१॥
तुमचे कृपेचे लाहेल बळ । तै रसना होईल घनपटळ । पाठिं मुक्तामणि सकळ । द्रवैल शब्द ॥२२॥
पाहातां सर्वाचीं शेषें । ते तुझी प्रकृति पुरुषें । कथामूळी संतोषें । नमस्कारुं आह्मीं ॥२३॥
तुमचा अभिवंदनी । फिटे सर्व ही सीराणि । येरा देवतां येषणी । उदार्यता कैचीं ॥२४॥
कल्पतरु कल्पलता । तुह्मीं तादृशें उभयथा । येरा वनतरुदेवता । का मीं शोचूं ॥२५॥
या वरीं स्मरलें निकें । तुह्मीं सर्वाची मूळिके । तुमचां नमनीं सकळिकें । नमस्कारिलीं म्या तें ॥२६॥
मूळिं पावलीया पाणी । शाखापल्लवा होय धणी । फळॆं घेईजती वोढोनी । देठग्रिचीं ॥२७॥
येणें नमस्कारें सहसा । होति अभिमुख त्रिदशा । जेवि प्रसन्न केलया नरेशा । सैन्यवश्य ॥२८॥
तुमचा अवलीला वरु । तो मतिज्ञानाविस्तारु । मांडला रसु सुंदरु । ब्रह्मावबोधु हा ॥२९।
तत्वबोधाचा निर्मिता । ब्रह्मसायुज्य पूर्णता । तो मज ज्ञानदाता । श्रीगुरुदेवो ॥३०॥
हा दृष्टिगोचर ऐसा । दिसे प्रपंचाकारु ठसा । परि जीव घे शिवदशा । कृपे ज्याचें ॥३१॥
भवे भवार्णव तरिजे । हें तारु नसे दूजे । प्रपंचें तत्व उल्लंघिंजे । हें हातधरणें ज्याचें ॥३२॥
देह पटु घडी सान । नेमलें दीसे प्रमाण । तें दाविलें उकलोन । अगाध जेणें ॥३३॥
कर्मब्रह्मपल्लव । ऐसें विस्तारलें सर्व । यासी आदि अंत सीव । आथी चि ना ॥३४॥
हे प्रमाण गुजदेह होय । उकललें ब्रह्मांडी न समाये । मा आत्मपदवीं सामाये । हा कोण ठावो ॥३५॥
येवढा उदार्याचा स्तंभु । दे ब्रह्मश्रीचा पूर्ण लाभु । तो रोकडा कमळगर्भु । आह्मी लाहों ॥३६॥
यावरी सर्वाचे कारण । श्रोते हो तुह्मां विज्ञापन । स्वस्त करुनि अंत:करण । परिसा वचनें ॥३७॥
तुझीं बोला कृपाबिंदें । तैं वाचावल्ली पेलील दोंदे । रसनाडेंखी पदें । पुष्पें येती ॥३८॥
तुह्मी ज्ञानगिरीचे डोहो । आह्मीं गौरवस्नान लाहों । तेणें तुझां सन्मुख राहों । अष्येंवचनें ॥३९॥
आह्मां हे चि दिवाळी । आजि जिव्हेचा परेळी । तुह्मां सज्जनातें वोंवाळी । शब्दरत्नीं ॥४०॥
तुमचें कृपाकटाक्ष । मज चेष्टविति प्रत्यक्ष । एकें निमिषें ही लक्ष । साधे आह्मां ॥४१॥
पूर्णिमेची पीयूषकळा । चकोरे घेतीं गळाळा । मास येक जिव्हाळो । तो चि तया ॥४२॥
साठींतीस्यांकोण्हि दीनि । चातकें तृप्तहोति घनीं । संवत्सरा हि घणी । हे चितया ॥४३॥
हे ना प्रेतां संजीवनी । चढे आयुष्याचें पाणी । तेविं तुमचां तोषलेपणीं । सुष चि आह्मां ॥४४॥
जी तुमची प्रसन्नता । उल्लास पावे वाग्देवता । ते पदें प्रसवैल पूर्णता । ब्रह्मविद्येचीं ॥४५॥
तेणें बोधार्णव होय उतळु । उन्मेष मेरु घे तळु । हा विचार येवढा ब्रह्मगोळु । हातिचा होय ॥४६॥
तुह्मीं ज्ञानाब्धि ठाईचे । तेथ शब्द गंडूष आमुचे ।पूर्ण न करिती तर्‍हीं याचें । रहस्य घेणें ॥४७॥
हो कां भलतैसा वक्ता पण पदरसु घे तो श्रोता । श्रोतेविण कविता । शोभे केवि ॥४८॥
स्वकरें कुमामर्द्दनीं । संतोष न पवे कामिनि । तेवि श्रोतयावांचूनि । दीनवक्ता ॥४९॥
जेवि सुवायूचेनि तोले । प्रव्हाण समुद्रिं चालें । तेवि श्रुत संवादिं बोलें । उठती बोल ॥५०॥
वक्तयाचे पदडोळें । स्वभावें होति आंधळे । कां जे श्रोतासूर्य न मिळे । अर्थप्रकाशें ॥५१॥
जो अर्थ गीवसी श्रोता । ते ची पदीं वोडवीं वक्ता । तो संवाद अमृता । उणें आणीं ॥५२॥
जैसा द्राक्षिचे आळां । दीधले रंग उमटे फळां । तेवी श्रीतेस्नेहो जिव्हाळा । वाचकां होय ॥५३॥
श्रोते सावध नसते । वक्ते कां स्थळें बोलते । गुणकीर्त्तन आछादते । ईश्वरादिकाचें ॥५४॥
वेदशास्त्रपुराण झ। यांचे अपाडे महीमान । परि हें हि श्रोतयांवाचोन ।रुपा न ये ॥५५॥
असो हें नव्हतां सजातीसंयोगु । तो काई करावा कथारंगु । जैसा नटांचा शोचांगुं । परी सगर्भु नोहे ॥५६॥
सुंदर शाल्मली दोडे । सेवितां कोण रसु आतुडे ।पांगरपुष्पें देंठफेडें । कोण तुरंबी ॥५७॥
जैसीं अकाळीं मेघडंबरें । तैसीं निरर्थकें उत्तरें । तें सवितीं गवारें । आदरेंसी ॥५८॥
जो परिपूर्ण पवित्र । नित्य शुध्द सर्वत्र । जें भूमिअंगें चित्र । हें येवढें उठे ॥५९॥
यासी वंचले मूढ । शोचिति वृथा काबाड । आत्मतत्वीं कोड । कैचें तया ॥६०॥
सुकाळ असोनु सर्वेपरि । रोगी अन्नातें अव्हेरी । तेवी दुर्ज्जन ब्रह्म उत्तरीं । विषादु मानी ॥६१॥
सूर्य नमनें उलका । वायसु ने घे मयंका । नावडती कोळकीटका । पद्मकमळें जैसीं ॥६२॥
अंधापुढां रत्नराशी । किं भोगवस्तु विधवापसी । किं नपूंसका पुढें जैसी । सुंदर श्यामा ॥६३॥
असें जे मूढ जन । त्यासि उपदेशील कवण । जें बोलतां ब्रह्मज्ञान । उफाडती ॥६४॥
मांडलया शुध्द रसा । मूर्ख पाषांडी कैसा । चकोराच्या उद्यमा जैसा । राहो निगे ॥६५॥
भोजनाचां प्रथम ग्राशी । दातुरां आडळे मासी । पाषांडां ब्रह्मकथेंसि । तैसी होय ॥६६॥
असो तें पाषांडीं मूढें । काईसीं तुमचें स्तुतीपूढें । काय कल्पतरु गणेंरीझाडें । हारी शोभती ।६७॥
तुह्मी प्रभूचे अवतार । तेणेंसी चि निरंतर । यास्तव हें उत्तर ।बोलों आह्मीं ॥६८॥
तुह्मीं स्वभावें सावधान । तेथं आह्मीं विज्ञापन । करावया कारण । येक आहे ॥६९॥
जी आमचा उध्दारु । ग्रंथा आदि अंतीं मनोहरु । तुमतें न करीतां नमस्कारु । पतन असे ॥७०॥
यास्तव तुमची स्तुति । आह्मीं न करु कांकुळती । तुह्मीं स्वभावें सभापती । पूज्य आह्मां ॥७१॥
माझे स्तुतिचेनि पाडे । गोसावीं न पडावें भीडे । शुध्दाशुध्द तेव्हढें । निवडावें जी ॥७२॥
भक्त अभक्त असें । देव नेणें मानसें ।त्याचें देवपण कैसें । संपादैल ॥७३॥
चंद्रकांत फटिका । निवाडु नोहे मयंका । तैं चंद्रपणाचा लटिका । आळु तया ॥७४॥
यकवाटलया पयपाणी । हंस ने घे निवडोनि । तो हंसु हंसपाणीं । वाखाणूं नये ॥७५॥
कां ज्वरा ज्वरलक्षणे । मूळी धन्वंतरी तर्‍हीं नेणें । त्याचीं कोण प्रयोजनें । उपचारविषई ॥७६॥
कां न्यायान्यायविचारणा । जैं प्रष्णिक नाणी मना । तैं त्याच्या प्राष्णिपणा । हानि चि होय ॥७७॥
तेवि शुध्दाशुध्द कविता । जैं न पाहे श्रोता । तो श्रोतेपणें वानिता ।लाज चि असे ॥७८॥
यास्तव सुचित्त सावधानी । इंद्रियें ठेउनि श्रवणीं ।आइकावी सुवाणी । शुचि कथा ॥७९॥
हें आहाच परि सघन । देशस्ते मध्यें ब्रह्मज्ञान । तें हळुवे हें वचन । मानूं नये ॥८०॥
जैसा सुकासनाचा मार्गु । तैसा मर्‍हाटीचे प्रसंगु । आंगी बाणें राजयोगु । रोकडा चि ॥८१॥
ये मर्‍हाटीचे पल्लवें । जीव उगमाते पावें । तरी कासया उलथावें । पानाचें कवळे ॥८२॥
हें आरुष आरुतें वचन । रोकडें करीचें कांकण । वेदाशास्त्राचें दूहन । मोकळें तें हें ॥८३॥
ते आदिवाचेचि आटि । उपसोन कीजे मर्‍हाटी । हा अर्थु जीवाचीये गांठी । बांधतां भला ॥८४॥
गुह्यकवटें फेडितां । मद्रळा जोडे आईता । तेवि संस्कृता । गर्भु सुदेशी हे ॥८५॥
जैसा कां कापुर कर्द्दळिचा ।त्यासी नाहिं गर्भु त्वचा । तैसी महाराष्ट्रवाचा । अर्थविषई ॥८६॥
वापी कूप देववाणी । मध्यें सखोल अर्थुपाणि । ते सुदेसी सेदणी भरुनि । आहाच कीजे ॥८७॥
याही मध्यें कारण । अर्थ सगर्भ प्रमाण । ते चि देशभाषा वाचून । येर काबाडकष्ट ॥८८।
हे आहाच आरुती बोली । जरि शुध्द बोधें आथिली । तरि संस्कृतिची काढिली । पवित्र होईल ॥८९॥
आमोदार्थ आणि पवित्रपणा । तळां आणिजे चंदना । तो वोडीस्तव कां इंधना । विभांडो नये ॥९०॥
पुढीलिया स्वादासरिसा । प्रयत्नें आणिजे उसा । तो कणार्थ बुध्दि कणिसा रक्षूं नये ॥९१।
तेवि संस्कृत केवळ । अर्थे करावें प्रांजळ । येर्‍हवीं रक्षतां फळ । कोण त्याचें ॥९२॥
अर्थज्ञानें पदें प्रासें । वरि बैसति प्रमाणें सुरसें । ते मर्‍हाटी पुरवील भडसें । विव्दज्जनाचीं ॥९३॥
धन्य धन्य हे मर्‍हाटी । ब्रह्मविद्येचि कसवटी । हा व्दारशिलेचां पोटी । परिस जोडला ॥९४॥
हे घरिची कामधेनु । आंगणिचा संतानु । अमृत उकळा पूर्णु । माथणीये आला ॥९५॥
हा पल्लवीचा चिंता मणी । मोक्ष गीवसीला आंगणीं । बापु रे हे पवित्र वाणी । एसी चि आहे ॥९६॥
शुध्दस्वरुपीं निर्द्दोष । ते हे सुदेशीं सुरस । यास्तव घेणें सर्वास । सादरेंसीं ॥९७॥
हे ब्रह्मरसाची पव्हे । नडनाचु होय जिव्हे । यास्तव हळवें नव्हे । बोलणें माझें ॥९८॥
जैसी सुगंधाची कळी । ते विकासलेयां काळी । गंधघ्राणमेळीं । आनंदु दावी ॥९९॥
तेवि या ग्रंथाचि खोली । सगर्भ मना नाहीं आली । तव वरि हे महाराष्ट्र बोली । आहाच वाटे ॥१००॥
केतुकीं कंटकामाझारी । आहे आमोदाचि पेटारी । किं रंभेचां सोपटगाभारीं । पोतासु द्ळी ॥१॥
हा सगर्भ ग्रंथु उल्होटें । तैं सर्वज्ञता प्रगटे । आत्मा रोकडा ची भेटे । हें सामर्थ्य याचें ॥२॥
हें पवित्र माझें बोलणें । ब्रह्मीष्ठा चि पुढां पेखणे । कां जे ग्राहिका वाचूनि वाणें । विके कैसें ॥३॥
हा अबोधां प्रबोध । परिणामकां संवाद । आरंभला सुविद । शास्त्रतिलकु ॥४॥
ते श्रीसिध्देशप्रसादें चामुंडेंचेंनि वरदे । चालतीं होतिं पदें । त्रिंबकाचेंनि मुखें ॥५॥
इतिश्रीचिदादित्यप्रकाशे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे आदिखंडे मंगळाचरण नाम प्रथमकथन समाप्त ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP