मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
बाळबोधलक्षण

आदिखंड - बाळबोधलक्षण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


आतां बोधाचा सन्मंधु । कळे आत्मा सश्चिदानंदु । तोचि देखे अभेदु पदत्रयीं ॥३८॥
तोचि आत्मरुपीं सकळें । देखे भूतें सूक्ष्में स्थूळें । तो आत्मतत्वावेगळें । कांहिचि नेणें ॥३९॥
माया अविद्या निरासी । भेदुत्रयांचा हराशी । शुध्द तत्वमसीं । ज्ञान होय ॥४०॥
महावाक्ये वेदवाणी । ये प्रमाणें अखंड मानी । गुरुकृपे पूर्णज्ञानी । निर्धारुवंतु ॥४१॥
प्रकृतिपुरुषें तेंचि देखे । ब्रह्मानंदे नित्य तोषे । ब्रह्मी ब्रह्म मुखें । हें चि बोलें ॥४२॥
असें हीं असोनि वरि । देखे प्रपंच उभारी । परि वस्तु वाचुनि दुसरी । भाषा नेणें ॥४३॥
जैसें जळचरां जळ । घनां अंत्राळ । तेवि अंतर्बाह्य सकळ । ब्रह्म देखे ॥४४॥
दिसे मिं तुं भेदाकारें । हा भेदु समूळ सरे । आपण तेंचि दुसरें । देखणें तें काय ॥४५॥
तरंगु तोयातें पाहे । पोतासु परिमलातें लाहे । शर्करा घेऊनि जाय । आपुली गोडी ॥४६॥
भांगार पाहे हेमा । किरण पाहति चंद्रमा । छाया आपुलीया दृमा । गिवसुं जाय ॥४७॥
तेवि आत्मरुपी सर्व जन । गिवसी मानुनि भिन्न । तेव्हा पूर्ण बोधाचें लक्षण । वोसावले की ॥४८॥
कापड पाहे तंतु । दीपु पाहे फुतु । नादातें गिवसित शब्दु । चाले ॥४९॥
येथ ब्रह्मेंसी भेदु नसे । वेदें ची देखिलें असें । निश्चयात्मक उल्लासे । गर्जे श्रृति ॥५०॥
एकमेवाव्दितीयंब्रह्म । ब्रह्माहमस्मि हे वर्म । तदिदं खल्विदं सम । नेमेंसी बोले ॥५१॥
असीं प्रमाणें नेणों किति । बोले बृहदार्णिका श्रृति । ते हि कीजैल निश्चंती । उत्तरखंडी ॥५२॥
असा जो इहीं गुणीं । वर्त्ते तो बोधला प्राणी । आणि चतुष्टय ज्ञानी निर्धारु असा ॥५३॥
एक ब्रह्म चतुर्विध । चौ अर्थी मिळनि शुद्र । तें हीं आतां प्रसिध्द । सांगिजैल ॥५४॥
प्रथम ब्रह्म शरीर । देहीं दिसे ते साचार । सर्व अर्थ अर्थातर । येथें नेमी ॥५५॥
दुसरें स्वरुप ब्रह्म । देव धर्म व्रतें नेम । सर्वेपरी उत्तम । हें चि मानें ॥५६॥
तृतीय ब्रह्म ऊँ कारु । शब्द मातृका उच्चारु । वेद शास्त्र डंबरु । येथें चि देखे ॥५७॥
चतुर्थ ब्रह्म साक्षात्‍ । देखे ईश्वरीं सर्वभूत । कल्पनाहेतुरहित । निरंतर ॥५८॥
हें चतुर्विध ब्रह्मसार । पुढां सांगैन मनोहर । तें उत्तरखंडी सुंदर । षष्टम कथन॥५९॥
या बुध्दि ब्रह्मी असे । लोकसंग्रही सदा वसे । सांडनें मांडनें नसे । ठाईं होनि ॥६०॥
तो क्रिया कर्में करितु । परि फळ कामना रहितु । कां जे वासना हेतु । नसे तया ॥६१॥
तो सदा सचिल स्वधर्मी । ब्रह्मबोधें सत्कर्मी । अखंड असोनि परब्रह्मीं । देखे असें ॥६२॥
चक्षीं पक्षीं कुक्षीं घ्राणीं । मुखीं श्रवणीं वदनीं । बाह्याभ्यंतर दाटुनि । दाटली वस्तु ॥६३॥
तीथि क्षेत्रीं पुरीं पाटनीं । देशीं भूमी जळी वनीं । सर्व ही विश्व भरुनि । भरणी भरलें ॥६४॥
कोठें आहे कोठें नाही । असें अपूरें नोहे कांही । हें चि देखोनि निवाले देहीं। पूर्विल ज्ञानें ॥६५॥
कपिल कार्त्तिक नंदि गिरिजा । भृषंडी वशिष्ठ शिखिध्वजा । कुंभा अवधूता यदुराजा । हें चि ज्ञान ॥६६॥
भृगु भास्करु रुद्र ईक्ष्वाकु मनु । सूत शुक वाम वैशंपायनु । जनक याज्ञवल्क्यु अर्जुनु । हे बोधानंदी सर्व ॥६७॥
उद्वोधु हेतुरहित । सुखबोधीं समस्त । जे प्राणी बोधरहित । ते चि बाळ ॥६८॥
भेदु तेव्हढे बाळपण । अभेदीं बोधप्रमाण । यास्तव निरुपण । हें चि पुढां ॥६९॥
आह्मीं नोबलुं वावसि । जो निर्धारु होय बहुतासि । ते वचनें सुदेशी । प्रकट करुं ॥७०॥
गुह्यें ज्ञानें दाटूनि । पडलीं अज्ञानरयनी । यास्तव उदो करुं दिनमणी । बालबोधु हा ॥७१॥
जो जो बाणें निर्धारु । ते ते बोल उदास करु । शिष्यतरणार्थ तारुं । रचु ग्रंथु ॥७२॥
समुद्र मथुनि यत्नें । जेवि प्रकट केली रत्नें । तेवि झांकले बोल प्रयत्ने । उदास आणूं ॥७३॥
नाना शास्त्रगौचे क्षीर । दुहुनि येकवाट सार । तेणे खंडें डेरे परिकर । भरुं बाळधीचें ॥७४॥
पूर्वप्रणिते वचनें । नाना मार्गिची गुह्यज्ञानें । प्रत्यक्ष लाहिजे येषणें । तें चि बोलें ॥७५॥
जे शास्त्र संप्रदाई मिळति । ते चि बोल घालीन ग्रंथी । उपमा दृष्टांत सुमती । उभे करीन ॥७६॥
भवानीशंकरें जेतुलें । कृपा करुनि उपदेशिलें । तें प्रसादिक संचलें । बोल आणूं ॥७७॥
निर्धार बोलासि बोलि । तेंचि पदें आरंभिली । बरवी मांडनी मांडिली । सुलळित जेणें ॥७८॥
तो श्रीभैरवाचा नंदनु । ह्मणें त्रिंबकु ब्राह्मणु । या पुढिल कथन आणू । निर्धाराचें ॥७९॥
इति श्रीचिदादित्य प्रकाशे श्रीमव्दाळावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे आदिखंडे विवरणें बाळबोधलक्षणनाम तृतीयकथनमिति ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP