आदिखंड - रुद्रदृष्टांत
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
॥अज्ञस्यार्था प्रबुध्दस्य सर्व ब्रह्मेति यो वदेत् ॥
॥ महानरकजालेषु स तेन विनियोजित: ॥१॥
हा परमात्मा साचु । भेदे देखिलाअ प्रपंचु । भेदु सरे पाठि वेचु । करणें चि न लगे ॥१॥
भेद संशयें उद्भवे । तैसा चि संशये स्थिरावे । संशय संहारीं संहारावें । अवश्य एणें ॥२॥
रजुसी देखोनि भ्याला । तो चि त्यासी सर्पू जाला । भयें मागा सरला तो चि निर्धारु त्याचा ॥३॥
ऐसा सर्पु प्रतिपादितां । तो साचु होये बहुतां । भय संचरे तो पळतां । स्मरु न धरिती ॥४॥
असत्याचें भय साच पोटिं । दडे येकु येकापाथीं । तो देखना दॄष्टी । विनोदु पाहे ॥५॥
तो व्याळु वायाळु सत्यु । परि संशयबाधकां नित्यु । ते देखना देखोनि अनित्यु । विस्मो करी ॥६॥
मग तो वारुनि सकळां । आला दोरिये जवळा । हातें धरुनि अवलिळा । उचलिली जेणें ॥७॥
तो सर्पूमिथ्याकारु जाला । मागिल प्रेत्नु वृथा गेला । एकें संशय फेडला । तो विश्वासु सर्वा ॥८॥
तेवि प्रपंच अतो चि परमात्मा । संसार नव्हे अनात्मा । भेदु न कीजे महात्मा । सर्वथैव ॥९॥
विवर्त्तला सर्पु मानि । तो बुध्दिभ्रंशु प्राणि । अज्ञान ह्मणों तरि मनि । भुजंगभय काईसें ॥१०॥
अज्ञान म्हणिजे सर्वनेण । हें सुषुप्तिचें लक्षण । कारणदेह आठवेवीण । विसरु सदा ॥११॥
हें पूर्णदशा वनस्पति । काहिं हेतु गर्भोत्पत्ति । मागां बाळलक्षणें केलीं निरुति । विपरीत ज्ञानें ॥१२॥
शास्त्रोप-देशविचारु । तो ज्ञानबोधु साचारु । याचा जो जो निर्धारु । तें विज्ञान बोलिजे ॥१३॥
जंवरि नये आत्मदशे । तंवरि ज्ञेय ज्ञान ही उव्दसे । म्हणौनि वेद्शास्त्र उपदेशे । तें चि घेणें ॥१४॥
ज्ञप्ति निर्धारी ज्ञान । तेथ ज्ञाता होय आन । ध्येय ध्याता ध्यान । याचि पारचें ॥१५॥
तु ह्मणसी श्रृतीस्मृति । या प्रपंचातें चि बोलति । परि ब्रह्मनिर्धारु निश्चंती । येंहि चि केलि ॥१६॥
प्रथमं दशें वेदु । घेतां प्रपंचीं सवादु । तेथ स्थापिला भेदु । निश्चयेंसी ॥१७॥
पाठीं तेणें चि महंतें । नेति निरसुनि भेदमतें । सर्व ही वस्तु निरुतें । तो चि बोलिला ॥१८॥
वेदु प्रथमदशे बोलिलां । तो पुराणा आधारु जाला । शास्त्रीं निर्धारु केला । त्यांही पूढां ॥१९॥
मज गमली मातु । जाणितला वेदाचा अंतु । एणें चि नामें विख्यात । वेदांत मिर्वे ॥२०॥
तर्क भाष्य मिमांसा । तिं शास्त्रीं भेददशा । वेदांत ब्रह्मप्रकाशा । मधिल होय ॥२१॥
जें शास्त्रीं जे स्थिरावले । तें तें दर्शरुपां आलें । यातु ही भेद प्रकटले । तें उपदर्शनें ॥२२॥
तर्हिं वेदाचें आधारे । सर्व ही चाले निर्धारें । तुं यावेगळें दुसरें । मानु नोको ॥२३॥
वेदें निरसिलें तें निरसी । प्रकाशिलें ते प्रकाशी । ब्रह्मानंदें अनर्निशि । बोधरुप जो ॥२४॥
कर्म आणि नि:कर्म । हे वेदांचें वर्म । मार्ग पीपलिका विहंगम । याचें चि आधारें ॥२५॥
तु असें म्हणसी । जें पिप्पलिका कर्मकांडेंसी । विहंगमा प्राप्ति येकसरिसी । तो वेदु कैसा ॥२६॥
कर्मि तात्पर्य तेवढा । तो पिप्पलिका मार्ग गाढा । ब्रह्म जाला पुढां । वेदमागें ॥२७॥
जे वेदाचें निर्वाण । पूर्णदशेचें लक्षण । घेऊनि निवाला तो जाण । उडाण साधूनि पाखिरें । ते चि घेति ॥२९॥
यां दोघा वेदु कारण । दोघां येक चि प्रमाण । दोन्हि मार्ग भिन्न । भेदबुध्दि ॥३०॥
कर्म विस्तारलक्षण । ब्रह्म स्वस्थ संपूर्ण । येथ दृष्टांत सांगैन । अपूर्व येकु ॥३१॥
जेवि समुद्र न पवता । मार्गी उचंबळे सरिता । परि सिंधुचा मार्गु सर्वथा । न संडि ते ॥३२॥
ते सागरीं मिलत । आपण चि होय शांत । एर सागरीचें समस्त । सागरीं असे ॥३३॥
तेविं कर्मिष्ट चपळु । एरु ज्ञानी निश्चळु । तो नुचंबळे केवळु । पूर्णपणें ॥३४॥
कहि चि कोण्हें काळें । विहंगमा काळांती न ढळे । परि पिप्पलिका कर्मफळें । वोढितां चुके ॥३५॥
तो जै कर्में कर्म निरसी । पुढील उचते गिवसी । त्यासी ब्रह्मदशा असी । प्राप्त होय ॥३६॥
जैं तो येकें चि ठाईं थारे । कां कोण्हें आडफोटा भरे । तैं न पवे निर्धारे । ब्रह्मसुखातें ॥३७॥
जैसें न लक्षितां फळां । मुगी भरे अन्य डाळा । कां अन्यरसीं गुंते तै गळाळा । सुस्वादाचा चुके ॥३८॥
तेवीं ब्रह्मज्ञानी ब्रह्मानंदीं । असोनी चाले कर्मपदी । हे कर्मिष्टां बुध्दि । शाश्वत कैची ॥३९॥
कर्मिष्ट असुनि निका । जो लाहे शुध्दभूमिका तरि तो ब्रह्मानंद सुखा । साधकु होय ॥४०॥
आणि जे प्राणि शुध्दांशु । त्यासी न लगती सायास । याचें निजगुण सर्वस । संप्रदायिक शुध्द ॥४१॥
श्रवणी पडतां चि गुरुवचन । तो पुढां चि विस्तारें ज्ञान । असी ते ब्रह्मपरायण । सत्सिध पुरुष ॥४२॥
जो वेधें गुरुचां वेधी । त्यासी निर्धारें आत्मसिधी । जो भरे उपाधी । तया प्राप्ति कैची ॥४३॥
जै दर्शनाचा डंखु उतरे । तैं फीटे उपाधिचें भुरुरे । मग तो श्रीगुरुसी अनुसरे । तैं असें कीजे ॥४४॥
मग भक्तिवैराग्य ज्ञानें । शमदमादि साधनें । असा शुध्द करुनि देणें । प्रकाशु तया ॥४५॥
अंतरेंद्रिया निग्रहो कीजे । यासी शमसाधन बोलिजे । बाह्येंद्रिया दमिजे । दम तें असें ॥४६॥
तितिक्षा सहनशीलवृत्ति । वासनापरावृत्ति ते उपरती । चित्तएकाग्र ते स्थिति । समाधानाची ॥४७॥
श्रध्दा आस्तिकीं विश्वासु । यावरी होय जो जो प्रकाशु । ते समाधि यावेगळा विश्वासु । मानू नये ॥४८॥
असें साहिपरी साधन । वैराग्य देह दमन । पाठि उपजे ज्ञान । श्रीगुरुकृपे ॥४९॥
श्रवण मनन निजध्यासन । साक्षात्कारु या पासुन । निर्धारें होय ज्ञान । तें चि निकें ॥५०॥
आत्मविषईं कारण । वेदांतीं उपनिषदीं जें निरुपण । तेथ निश्चयें घालि मन । यासि श्रवण बोलिजे ॥५१॥
यावरी परवस्तुचां स्वरुपीं । वस्तुविषईं बुध्दि निक्षेपी । तें मनन आक्षपी । वस्तुचां ठाई ॥५२॥
सांडी विजाती भेदुं । मानि आत्मा सश्चिदानंदु । हें निजध्यासन बोधु । यातें ह्मणिजे ॥५३॥
या सर्वा शिरी विचार । जो जो थिरावे निर्धार । प्रत्यक्ष तो साक्षात्कार । जाणिजे असा ॥५४॥
साधनचतुष्टयं संपत्ति । येणें शिष्यगुरु वोळियेती । ते सांगिजैल निगुती । यथाक्रमें ॥५५॥
नित्यानित्यवस्तुविवेक । हें प्रथम-साधन एक । सांडिजे स्वर्गमृत्युभोगाचें सुख । ते प्रकारु दुसरा ॥५६॥
तिजा प्रकारु कारण । तैं वैराग्य देहदमादि साधन । मुमुक्ष मोक्षाची अपेक्षा हा पूर्ण । प्रकारु चौथा ॥५७॥
असिं साधनें चतुष्टय । जाणें तो अनुग्रहीतु होय । उपदेशु कीजे गुरुरायें । नेमेंसीं तया ॥५८॥
जो लाहे शुध्दा भूमिका । तो शिष्य करावा निका । तै गुरुच्याही सकळीका । भडसा पुरती ॥५९॥
परि गा गुरु गहिंवर ढांडोळितां ।ब्रह्म ये त्याचें चि हातां । आहाच वाहाच पाहातां । कांहीं न लाभे ॥६०॥
कवणें येकें अवस्वरी । भक्त पाहावया त्रिपुरारी । होऊनि ब्रह्मचारी । मृत्युलोकां आले ॥६१॥
भक्तांचा मेळा मेळउनि तेणें । मांडिलें उत्तरपेणें । पाठीं जगत्रजीवनें काय केलें ॥६२॥
धान्य द्रव्य दिधलें एकासी । येकें गोविलीं रत्नापसीं ।या हीं पुढें आलें त्यासी । मणि संतान दिधलें ॥६३॥
या ही पुढां आले प्राणी । ते ठेविले सुरस्थानीं । येक इंद्रांचा आसनी । स्वस्थ केले ॥६४॥
याचि ही ज्यसि नाहि आशा । ते नेले कैलासा । येक ते महेशा । वेगळें नव्हती ॥६५॥
तेवि श्रीगुरु शिष्यातें । चकवि दाउनि नाना मतें । परि निर्धारावाचुनि निरुतें । पूर्ण न संगे ॥६६॥
या कारणें गुरुगहिंवर राखावें । हळुवेंपणें नेद्यांवें । आर्त जाणौनि पेरावें । श्रुध्दभूमिके तैसें ॥६७॥
॥इति रुद्रदृष्टांत ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 07, 2018
TOP