दिव्य आनंद - दिव्य आनंद मन्मना एक गोवि...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
दिव्य आनंद
मन्मना एक गोविंद॥
विषयवासना मम मावळली
सकल अहंता माझी गळली
वृत्ती प्रभोरूपोन्मुख वळली
न दुजा छंद॥ मन्मना....॥
ख-या सुखाचा झरा मिळाला
भेदभाव तो सकल निमाला
आज तपस्या येइ फळाला
तुटले बंध॥ मन्मना....॥
भावभक्तिची गंगा भरली
ज्ञानपंकजे सुंदर फुलली
अपार शांती हृदयी जमली
सुटला गंध॥ मन्मना....॥
सम मम आता डोळे उभय
सम मम आता प्रेमळ हृदय
परम सुखाया झाला उदय
मी निष्पंद॥ मन्मना....॥
शांत समीरण, शांत अंबर
शांत धरित्री, शांत मदंतर
रहावया येतसे निरंतर
गोड मुकुंद॥ मन्मना....॥
अता जगाची सेवा करित
दीनदु:खितां हृदयी धरित
नेइन जीवन हे उर्वरित
मी स्वच्छंद॥ मन्मना....॥
अशांत अस्थिर लोकां पाहुन
तळमळती हे माझे प्राण
त्यांना आता नेउन देइन
सच्चित्कंद॥ मन्मना....॥
-त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३०
N/A
References : N/A
Last Updated : April 11, 2018
TOP