द्विविध अनुभव - भरला हा अंधार। सारा भरला ...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
भरला हा अंधार। सारा भरला हा अंधार॥
क्रूर पशू हे हिंसक भेसुर
गदारोळ करितात भयंकर
थरथरते भीतिने मदंतर
निरखुनि हे कातार॥ सारा....॥
वाघ गुरगुरे अंगावरती
भुजंग फूत्काराते करिती
विंचू करिती नांगी वरती
नाहि कुणी आधार॥ सारा....॥
डोळे जैसे खदिरांगार
झिंज्या पसरुन भेसुर फार
धावुन येई हा अंगावर
पिशाच्चगण अनिवार॥ सारा....॥
काटे रुतती टुपती दगड
भुजंग विंचू दिसती रगड
मरुन जाइन राहिन ना धड
डोळ्यां लागे धार॥ सारा....॥
भयभीतीने मी गांगरत
शतदा मार्गी मी अडखळत
जखमा होती वाहे रक्त
केला हाहा:कार॥ सारा....॥
पाहुनि दु:खाचा बाजार
माझे झाले मन बेजार
अंगी उरला अल्प न जोर
पडली गात्रे गार॥ सारा....॥
तीक्ष्ण नखांनी फाडफाडुन
दातांनी चावुन कडकडुन
टाकतील मजला खाऊन
करितिल वाटे ठार॥ सारा....॥
झंजावाते जैसे पान
कांपे, तेवी मी बलहीन
प्रभुजी, कोणा जाऊ शरण
वदवे ना मज फार॥ सारा....॥
हे विश्वंभर करुणासागर
हे परमेश्वक परमोदार
शेधित आहे तुझेच दार
तार मला रे तार॥ सारा....॥
N/A
References : N/A
Last Updated : April 11, 2018
TOP