मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
भारतमाता माझी लावण्याची ख...

भारतमाता माझी लावण्याची खाण! - भारतमाता माझी लावण्याची ख...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


भारतमाता माझी लावण्याची खाण
गाइन तिचे गान, मी गाइन तिचे गान
करिन तिचे ध्यान, मी करिन तिचे ध्यान
भारतमाता माझी लावण्याची खाण
प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण
भारतमाता माझी लावण्याची खाण॥

मांडिन निर्भय ठाण, मी मांडिन निर्भय ठाण
देइन माझे प्राण, मी देइन माझे प्राण
हातात घेतले आहे सतिचे मी वाण॥ गाइन...॥

जाळिन सारी घाण, मी जाळिन सारी घाण
काटिन रुढिरान, मी छाटिन रुढिरान
हसवीन आइचे जे मुख झाले म्लान॥ गाइन...॥

उडविन दाणादाण, मी उडविन दाणादाण
करिन धूळधाण, मी करिन धूळधाण
स्वातंत्र्य-विरोधकां देतो मी आव्हान॥ गाइन...॥

विसरेन देहभान, मी विसरेन देहभान
कापुन देइन मान, मी कापुन देइन मान
मातेला जगामध्ये देइन पहिले स्थान॥ गाइन...॥

नुरविन कसली वाण, मी नुरविन कसली वाण
काढिन रुतले बाण, मी काढिन रुतले बाण
मातेला घालीन माझ्या हातांनी मी स्नान॥ गाइन...॥

सर्वस्वाचे दान, करिन सर्वस्वाचे दान
घेतो आज आण, मी घेतो आज आण
मातेला घडविन माझ्या मोक्षामृतपान॥ गाइन...॥

-धुळे तुरुंग, मे १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP