जीवननाथ - तृणास देखून हसे कुरंग। मर...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
तृणास देखून हसे कुरंग। मरंदपाने करि गान भृंग
जलांतरंगी करि मीन नाच। तवानुरागी प्रभु मी तसाच॥
दयासुधासिंधु तुम्ही अपार। सुखामृताचे तुम्हि डोह थोर
लहानसा तेथ बनून मीन। विजेपरी चमचम मी करीन॥
मदीय तू जीवननाथ देवा। मला स्वपायांजवळीच ठेवा
तव स्मृति श्वाससमान जीवा। मदीय संजीवन तूच देवा॥
मदीय तू नाथ मदीय कांत। मदीय तू प्राण मदीय स्वांत
मदीय तू सृष्टी मदीय दृष्टी। मदीय तू तुष्टी मदीय पुष्टी॥
जिथे तिथे मी तुजला बघेन। कुदेन नाचेन मुदे उडेन
तुलाच गातील मदीय ओठ। तुझेच ते, ना इतरा वरोत॥
कधी कधी तू लपशी गुलामा। परी तुला मी हुडकीन रामा
तुला लपंडाव रुचे सदैव। गड्या परी तू मम जेवि जीव॥
कधी न जाई बघ दूर आता। तुझ्या वियोगे मज मृत्यु नाथा
प्रिया! तुझे पाय मदीय डोई। बसू असे सतत एक ठायी॥
-नाशिक तुरुंग, डिसेंबर १९३२
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2018
TOP