रडण्याचे ध्येय
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
केव्हा मी कृतिवीर होइन, न ते काहीच माते कळे
डोळ्यांतून मदीय नित्य विपुला ही अश्रुधारा गळे
स्वप्ने खेळवितो किती निजमन:सृष्टीत रात्रंदिन
ना येती परि मूर्तीमंत करण्या नाही मला तो गुण॥
या माझ्या हृदया बघा उघडुनी मी ध्येयवादी असे
ध्येयालाच अहर्निश स्मरतसे चित्ती दुजे ना वसे
ध्येये मात्र मदंतरी विलसती, ध्येयेच ती राहती
माझे लोचन अश्रुपूर्ण म्हणुनी खाली सदा पाहती॥
इच्छाशक्ति जया नसे प्रबळ ती जी पर्वता वाकवी
यच्चित्ता लघुही विरोध रडवी नैराश्य ज्या कापवी
त्याला ध्येय असून काय? रडतो निर्विण्ण रात्रंदिन
वाटे ध्येयविहीन कीट असणे, तेही बरे याहुन॥
ध्येये जी धरिली उरी न मम का ती? चित्त त्या का भुले?
देवा! ध्येय मदीय नित्य रडणे हे का असे निर्मिले?॥
-अमळनेर, १९२७
N/A
References : N/A
Last Updated : April 11, 2018
TOP