राष्ट्रपताका - करु वंदना प्रभाती। करु की...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
करु वंदना प्रभाती। करु कीर्तना प्रभाती
राष्ट्रप्रभा पताका। वंदून पूजु हाती
स्वातंत्र्यमंत्रपूते। स्वातंत्र्यगीतगीते
ज्योतिर्मय अखंडे। स्वातंत्र्यसद्विभूते
हे उज्वले पताके। तेजस्वि हे पताके
तुज पाहुनी सदैव। कळिकाळ पोटी धाके
खुलतात तीन रंग। किति गोड गोड गोड
हे तीन रंग म्हणजे। शम शौर्य धर्म जोड
शांतीस दावि हरित। सत्त्वास दावि धवल
शौर्यास केशरी तो। दावीत अर्थ विमल
चकरा वरी विराजे। श्रमगौरवास दावी
समता स्वतंत्र्यचे। हे चिन्ह सुप्रभावी
रमवील उद्यमांत। सर्वांस नित्य झेंडा
देईल सर्व लोकां। साधा स्वतंत्र्य धंदा
जाळील दास्य सारे। नमवील मत्त लोक
वितरील सौख्य सर्वां। दडवील दीन-शोक
हे निर्मळे पताके। तू मोक्षमार्गदीप
न दिसेल दैन्य दास। जरि तू सदा समीप
तू मूर्त राष्ट्रवृत्ति। तू मूर्त राष्ट्रकीर्ती
तू त्याग मूर्तिमंत। तू मूर्त राष्ट्रदीप्ती
तू शौर्य धैर्य वीर्य। तू स्वाभिनामसूर्य
जे स्तव्य सेव्य भव्य। ते सर्व तू अपूर्व
राष्ट्रास तूच आस। राष्ट्रा तुझीच कास
आधार तू जनांचा। विश्वास तू अम्हास
तू ना तरी न काही। ना राष्ट्रानाम राही
ना वित्त अब्रु जीव। स्वातंत्र्यलाभ नाही
करा गर्जना धीर उर्जस्वला ती। जिला ऐकुनी कापती ते अराती
उठावे अता एकदाची समस्ती। चला झाडुनी जीवनातील सुस्ती॥
आम्हां थोर वीरां जगी कोण वारी। अम्हां दिव्य वीरां जगी कोण मारी॥
करु मुक्त आम्ही प्रिया भारताते। प्रतिज्ञा अशी ऐकवीतो जगाते॥
-त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टोबर १९३०
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2018
TOP