सरला घन अंधार - सरला घन अंधार। आला प्रकाश...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
सरला घन अंधार। आला प्रकाश अपरंपार॥
प्रभूची मुरली हळुच वाजली
क्षणात सारी सृष्टी बदलली
सुमने पायाखाली फुलली
हरला माझा भार॥ आला....॥
गदारोळ तो सकळ निमाला
प्रकाश आला सत्पथ दिसला
करुणासागर तो गहिवरला
जाइन आता पार॥ आला....॥
अभ्रे येती विलया जाती
फिरुन तारकातती चमकती
तैशी झाली मदंतरस्थिति
उदया ये सुविचार॥ आला....॥
विवेकदंडा करी घेउन
वैराग्याची वहाण घालुन
धैर्ये पुढती पाऊल टाकिन
खाइन मी ना हार॥ आला....॥
डसावया ना धजती सर्प
व्याघ्रवृकांचा हरला दर्प
भीति न उरली मजला अल्प
विलया जात विकार॥ आला....॥
हलके झाले माझे हृदय
मोह पावले समूळ विलय
सदभावाचा झाला उदय
केला जयजयकार॥ आला....॥
मदंतरंगी मंजुळवाणी
वाणी तुमची शुभ कल्याणी
प्रभु! येऊ दे ऐकू निशिदिनी
विनवित वारंवार॥ आला....॥
-त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१
N/A
References : N/A
Last Updated : April 11, 2018
TOP