वंदन - मी वंदितो पदरजे विनये तया...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
मी वंदितो पदरजे विनये तयांची
ज्यांची मने विमल सुंदर सोनियाची
जे संकटास न भिती न जयास पाश
आशा सदैव अमरा न कधी उदास॥
कार्ये करून, वदती न कधी मुखाने
उत्साहमूर्ति मति सांद्र दयारसाने
जे ठेविती निजसुखावरती निखारा
त्या वंदितो नरवरा विमला उदारा॥
स्वार्थी खरोखर तिलांजलि देउनीया
संतोषवीत पर कष्टहि सोसुनीया
श्रद्धा जया अविचला रघुनाथपायी
माझी नमून मति जात तदीय ठायी॥
ज्या मोह ना पडतसे पदवीधनांचा
ज्या धाक ना कधि असे रिपुच्या बळाचा
अन्याय ना कधि बसून विलोकतील
ते वंदितो नरमणी गुणि पुण्यशील॥
ना पाहतील नयनि कधि सत्यखून
ना दीनभंजन तसे बघती दुरुन
जाळावयास उठती सगळा जुलूम
ऐशा नरांस करितो शतश: प्रणाम॥
त्यांच्यापरी मति मदीय विशुद्ध राहो
त्यांच्यापरी हृदय कष्टदशास साहो
त्यांच्यापरी परहितास्तव मी झिजावे
त्यांच्यापरी जगि जगून मरुन जावे॥
-अमळनेर, छात्रालय १९२७
N/A
References : N/A
Last Updated : April 20, 2018
TOP