परी बाळाला सकळ ती समान - तीन वर्षांचा बाळ गोड आला।...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
तीन वर्षांचा बाळ गोड आला। नसे सीमा जणु त्याचिया सुखाला
हास्य त्याच्या मुखि गोड किति साजे। मूर्ति गोंडस ती गोजिरी विराजे॥
अधर मधुर तसे गोड गाल डोळे। सुखानंदाने भरुन जणू गेले
काय झाले सुख एवढे अपूर्व। तया बाळा, ज्यापुढे तुच्छ सर्व॥
“काय सापडले? हससी का असा रे। लबाडा सांग सांग सारे”
प्रश्न ऐकुन लागला हसायाला। अधिक निज मोदा दाखविता झाला॥
खिशामाजी तो बाळ बघू लागे। “काय आहे रे त्यात मला सांगे”
फिरुन हसला मत्प्रश्न ऐकुनी तो। कौतुकाने परि पुन्हा तो पहातो॥
हास्य ओठांतुन दाबल्या निघाले। बाळकाने मग फूल काढियेले
खिशातूनी ते गोड गुलाबाचे। दिव्य सुंदर सदधाम सुगंधाचे॥
काढि बाळक ते प्रथम फूल एक। दुजे काढी मग त्याहुनी सुरेख
आणि तिसरे ते कण्हेरिचे लाल। सकल संपत्ति प्रकट करी बाळ॥
परी राहे सुम अजुन एक आत। खिशामाजि पुन्हा घालि बाळ हात
फूल चौथे बाहेर काढियले। सर्व सुकलेले वाळुन जे गेले॥
चार पुष्पे मज दाखवून हासे। चार पुष्पे मज दाखवून नाचे
पुन्हा चारीही ठेवि ती खिशात। हसुन बाळक तो दूर निघुन जात॥
तीन पुष्पे रमणीय गोड छान। परी चवथे ते गलित शुष्क दीन
तुम्ही म्हटले असतेच तया घाण। परी बाळाला सकळ ती समान॥
-अमळनेर, छात्रालय १९२९
N/A
References : N/A
Last Updated : April 20, 2018
TOP