बोधपर अभंग - ४८०१ ते ४८१०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥४८०१॥
ह्मणसी होऊनी निश्चिंता । हरुनियां अवघीं चिंता ॥ मग जाऊं एकांता । भजन करुं ॥१॥
संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साठी होईल तुझ्या ॥२॥
सेकीं नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील ॥ मागुता पडसील । भवडोंहीं ॥३॥
शरीर सकल मायेचा बांधा । यासी नाहीं कदा अराणूक ॥४॥
करिती तडातोडी आंत बाह्यात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥५॥
मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोडी ॥६॥
जागा होई करीं हिताचा उपाय । तुका ह्मणे करिसी मग ॥७॥
॥४८०२॥
कंथा प्रावर्ण । नव्हे भिक्षेचें तें अन्न ॥१॥
करीं यापरी स्वहित । विचारुनि धर्म नीत ॥२॥
देऊळ नव्हे घरे । प्रपंच पर उपकार ॥३॥
विधिसेवन काय । नव्हे शब्द रामराम ॥४॥
हत्या क्षत्रधर्म । नव्हे निष्काम तें कर्म ॥५॥
तुका ह्मणे संतीं । करुनि ठेविली आइती ॥५॥
॥४८०३॥
पडोनियां राहीं । उगा च संतांचिये पायीं ॥१॥
नलगे पुसणें सांगावें । चित्त शुद्ध करीं भावें ॥२॥
सहज ते स्थिती । उपदेश परयुक्ति ॥३॥
तुका ह्मणे भाव । जवळी धरुनि आणी देव ॥४॥
॥४८०४॥
फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे ॥१॥
ह्मणोनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥२॥
पुढें चढे हात । त्याग मागिलां उचित ॥३॥
तुका ह्मणे रणीं । नये पाहीं परतोनि ॥४॥
॥४८०५॥
अगी देखोनियां सती । अंगी रोमांच उठती ॥१॥
हा तो नव्हे उपदेश । सुख अंतरीं उल्हास ॥२॥
वित्तगोतांकडे । चित्त न घाली न रडे ॥३॥
आठवूनि एका । उडी घाली ह्मणे तुका ॥४॥
॥४८०६॥
फळ पिके देंठीं । निमित्य वारी याची भेटी ॥१॥
हा तों अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥२॥
तोडिलिया बळें । वांयां जाती काचीं फळें ॥३॥
तुका ह्मणे मन । तेथें आपुलें कारण ॥४॥
॥४८०७॥
हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट ॥१॥
मग तयाच्या आधारें । करणें अवघेंचि बरें ॥२॥
सुख दु:ख साहे । हर्षामर्षी भंगा नये ॥३॥
तुका ह्मणे जीवें । आधीं मरोनि राहावें ॥४॥
॥४८०८॥
भोग द्यवि देवा । त्याग भोगीं च बरवा ॥१॥
आपण व्हावें एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥२॥
योजे यथाकाळे । उत्तम पाला कंदे मुळें ॥३॥
वंचक त्यासी दोष । तुका ह्मणे मिथ्या सोस ४॥
॥४८०९॥
जायांचें अंगुलें लेतां नाहीं मान । शोभा नेदी जन हांसविलें ॥१॥
घुसळितां ताक कांडितां भूस । साध्य नाहीं क्लेश जाती वायां ॥२॥
तुका ह्मणे नाहीं स्वता भांडवल । भिकेचे तें फोल बीज नव्हे ॥३॥
॥४८१०॥
बळ बुद्धी वेचुनियां शक्ती । उदक चालवावें युक्ती ॥१॥
नाहीं चळण तया अंगीं । धांवे लवणामागें वेगीं ॥२॥
पाटमोट कळा । भरित पखाला सागळा ॥३॥
बीजा ज्यासी घ्यावें । तुका ह्मणे तैसें व्हावें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 01, 2019
TOP