बोधपर अभंग - ५३४१ ते ५३५०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५३४१॥
नामाचे पवाडे ऐकती श्रवण । अर्थी तें नमन वेधियेलें ॥१॥
चित्ता होय सुख वेधि लागे हेत । वासना हे शांत ठायीं ठायीं ॥२॥
जिवा बोध झाला निर्वाळला आत्मा । उठावला प्रेमा आवडीचा ॥३॥
उपरती चित्ता झाली तृप्तीवरी । रोमांच शरीरीं दाटलासे ॥४॥
तुका म्हणे अंगीं आदळे अवस्था । यया नांव वक्ता श्रवणार्थी ॥५॥
॥५३४२॥
भक्ति तैसें फळ । असे सिद्धचि जवळ ॥१॥
एक जाती ऐसेरंग । खूण दावी मिळे संग ॥२॥
सूर्यबिंब शशीरश्मी । भिन्न नाहीं एका नामीं ॥३॥
तुका म्हणे तें मोहरा । कळे अग्नीनें सामोरा ॥४॥
॥५३४३॥
नव्हे सांगितलें शिकविलें ज्ञान । आंगींचा हा गुण सहजचि ॥१॥
राहतां न राहे दिल्हें हेंचि सांडी । मागीलाची जोडी त्यागी सर्व ॥२॥
नि:शंक निर्भय स्फुरण सर्वागीं । उदासीन जगीं देहभान वा ॥३॥
गृहसुतवित्त कुळ श्रेष्ठ गोत । मागील वृत्तांत नाठवेचि ॥४॥
तुका ह्मणे वेष शूरत्वाचे अंगीं । सतीचे विभागीं एक भाव ॥५॥
॥५३४४॥
कर्मरेखा क्रियमाण । हें तो ठायींचें चि जाण ॥१॥
विधीनिषेधाची संधी । एका निवडेना मधी ॥२॥
घडे त्यागाचे ते संग एक एकिचिया अंगें ॥३॥
होय तृष्णेचेनि दु:खे । केलें कासावीस मुखें ॥४॥
तुका ह्मणे करी । ऐसी कृपा निरंतरी ॥५॥
॥५३४५॥
अवघियां श्रेष्ठ साधनांचे सार । अवघा प्रेमभर विठोबाचा ॥१॥
अवघीयां योग साधन सेवन । विठ्ठल निधान सेवा जोडे ॥२॥
सर्व दान व्रतें उद्यापन नेम । विठोबाचें प्रेम नाम निष्ठा ॥३॥
सर्व तीर्थ क्षेत्रें केलीं यथासांग । जरी पांडुरंग साह्य होई ॥४॥
तुका म्हणे केलीं सत्कर्मे सकळ । हृदयीं गोपाळ वास करी ॥५॥
॥५३४६॥
बाळपणीं खेळे मातेसन्निधानें । श्लाघ्य वाटे मनें तेंचि घ्यावें ॥१॥
कोणाही पदार्थी भय नाहीं धाक । करितां ही शोक निदूं नये ॥२॥
पुढें येत येतां कुमारत्व आलें । खेळासी गुंतले चित्त आधीं ॥३॥
नाइके सांगतां वडिलांची नीत । सदा हिंडे चित्त खेळासवें ॥४॥
गाडे घोडीं बैल हिंडोनी बैसोनी । नाचे उडे मनीं आलें तैसें ॥५॥
लोण पाट थाट लेंड हेंड भेंडी । सुरकांटी धोंडी धरी अंगें ॥६॥
पोंवा मोहरी ते कमरी लकुटा । लपणीची मूठ हाताहातीं ॥७॥
चिर घोडी बेंदू खत गोटयासारी । बैसे पाठीवरी एकमेकां ॥८॥
कोणें सांगितल्या कोणाचें ही मना । नये अनुमाना शिकविलें ॥९॥
तुका ह्मणे गेलें पोरपण वृथा । तारूण्याची कथा थोर आहे ॥१०॥
॥५३४७॥
येउनी संसारीं विषयीं आसक्त । गुंडाळिलें सुत तांतणीनें ॥१॥
तैसा चित्त हेत गुंतोनियां राहे । तया कैसा होय परमार्थ ॥२॥
काय करावे ह्या माळा मुद्रा टिळे । वैष्णव केवळ कैसा होय ॥३॥
तुका ह्मणे आह्मी येथील पारखी । छंदाची सारिखी नव्हे ऐसी ॥४॥
॥५३४८॥
जन्म किती सोसी पुढें । हे बापुडे इच्छेचे ॥१॥
वारंवार नरकीं पचे । पाय साचे यमाचे ॥२॥
कितीवेळां तरी धका । खातां सांगा न सोडी ॥३॥
तुका संचित हिकुडे । आलें पुढें टाकोनी ॥४॥
॥५३४९॥
धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥१॥
तात घातलीयावरी । दासां उपेक्षिल हरी ॥२॥
यावें ऐशी आटी । द्यावें द्रव्याचिये हातीं ॥३॥
तुका ह्मणे पोटीं । देवा बहुकें खोटीं ॥४॥
॥५३५०॥
नाम लक्षुमीचें धरी । शिरीं वाहे मोळिया ॥१॥
कोण त्याचा थोरपणा । विटंबना नामाची ॥२॥
धनपाल नामदीक्षा । परी भिक्षा मिळेना ॥३॥
श्रेष्ठ नाम अमराचें । गृह साचें यमाचें ॥४॥
तुका न वागवी खोटें । कर्म मोटें बलाढय ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP