बोधपर अभंग - ५५११ ते ५५२०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५५११॥
फार खातो त्यासी ह्मणती ढोरकीं । कुटुंबघातकी राक्ष हा ॥१॥
थोडें खाय अन्न करिती टवाळी । पाप्याचे कपाळीं अन्न कैचें ॥२॥
ऐसा लोकाचार न राखवे कदा । स्वामी हा गोविंदा कोणेपरी ॥३॥
तीर्था जाय त्यासी ह्मणती कावळा । न करी तयाला निंदिताती ॥४॥
कथा करितो त्यासी ह्मणती टाळकुटया । न करी तो वेटया संसारींचा ॥५॥
तुका ह्मणे सेवा देवाची करिती । तयासी ह्मणती झाला वेडा ॥६॥
॥५५१२॥
सत्तासामर्थ्ये जगदानी । चक्रपाणी ऐकतो ॥१॥
तया विसरुं नका कोणी । जे पुराणें वर्णिती ॥२॥
तारी मारी सृष्टिक्रम । पुरुषोत्तम एकला ॥३॥
तुका ह्मणे काल पाहे । धाक वाहे जयाचा ॥४॥
॥५५१३॥
ठेवूनियां भाव बळ पायीं । देव तई सन्निध ॥१॥
तोचि एक आला साह्य । अशुभ होय शुभचि ॥२॥
धरिलें तें होय चित्तीं । सर्व शक्ति सिद्धचि ॥३॥
तुका ह्मणे वाणावाण । लाभ दुणे साधती ॥४॥
॥५५१४॥
न भरे पोट न मिळे खाया । जाय वांयां तें करी ॥१॥
सांडुनियां कर्म धर्म । व्यर्थ श्रम करितसे ॥२॥
नाना उपाय द्रव्यासाठीं । करी आटी आर्जव ॥३॥
तुका ह्मणे नेणे वर्म । जोडी कर्म पातक ॥४॥
॥५५१५॥
बरवा हा छंद । बैसे वाचेसी गोविंद ॥१॥
बहु साधनाची आटी । बुडूं नको न मिळे सृष्टि ॥२॥
बुद्धि साह्य तरी । बोला माजी जोडे हरी ॥३॥
तुका ह्मणे बल । नाहीं तात्काळचि फळ ॥४॥
॥५५१६॥
भविष्य ओढवल्या माथां । भजन न घलीं सर्वथा ॥१॥
जो अंगा आला भोग । भाग साहि सोसा रोग ॥२॥
भार असावें निमित्य । माथां एकाचिया सत्य ॥३॥
तुका ह्मणे बहु काळ । करी साह्य श्रीगोपाळ ॥४॥
॥५५१७॥
सरती विठ्ठला । सोस ज्याचा अवघा गेला ॥१॥
शिण झाला नकळे । सोसें झांकियेले डोळे ॥२॥
सिंधुपायवाट । संसारभ्रम सपाट ॥३॥
तुका ह्मणे सरे वेळ । सानि ह्मणावा विठ्ठल ॥४॥
॥५५१८॥
आलंकार लेणें तुळसी भूषणें । टिळे मुद्रा लेणें वैष्णवांचे ॥१॥
वेळोवेळां चिंती गोपाळांचे पाय । सकळ उपाय साध्य होती ॥२॥
सोज्वळ मारग येणें बळें सोपा । नाहीं कोठें गुंपा रामनामीं ॥३॥
लांगुलें तारिलीं पालाणुनी सिंधु । गोपाळासी वेधु हरिनामीं ॥४॥
तुका ह्मणे ऐसे ब्रह्मांड उदरीं । कितेक उद्धरी एक्या नामें ॥५॥
॥५५१९॥
सर्व पक्षीं झाला हरिख । परम वोळलें ॥१॥
नव्हतीसी झाली झोंप । रविदीप प्रकाश ॥२॥
ज्ञानचक्षु सद्गुरुकृपा ॥ तिन्ही तापा निववी ॥३॥
तुका ह्मणे तैसी कथा । नाशी व्यथा भवाची ॥४॥
॥५५२०॥
आणीक एक तया घरीं । दोषा उरी नसेचि ॥१॥
नाहीं थोर सानें परी । वर्ते येरीसारिखें ॥२॥
समब्रह्म ह्मणती मुखें । करी हरिखें पापासी ॥३॥
तुका ह्मणे सांगूं काय । नाहीं सोय धर्माची ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP