बोधपर अभंग - ४८२१ ते ४८३०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥४८२१॥
संदेह बाधक आपआपणांतें । रज्जुसर्पवत भासतसे॥
भेऊनिया काय देखिलें येणें । मारें घायेविण लोळतसे ॥१॥
आपण चि तारी आपण चि मारी । आपण उद्धरी आपणयां ॥
शकुनळिकेन्यायें गुंतलासी काय । विचारुनि पाहें मोकळिया ॥२॥
पापपुण्य कैसे भांजिले अंक । दशकाचा एक उरविला ॥
जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥३॥
दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजला पाणी न ह्मणें चाडा ॥
धांवतां चि फुटे नव्हे समाधान । तुका ह्मणे जाण पावे पीडा ॥४॥
॥४८२२॥
ऐसें कां हो न करा कांहीं । पुढें नाहीं नास ज्या ॥१॥
विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥२॥
श्रुतीचें कां नेघा फळ । सारमूळ जाणोनि ॥३॥
तुका म्हणे पुढें कांहीं । वाट नाहीं यावरी ॥४॥
॥४८२३॥
कथे उभा अंग राखेल जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥१॥
येथें तो पातकी नयेता च भला । रणीं कुचरला काय चाले ॥२॥
कथे बैसोनी आणिक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥३॥
तुका ह्मणे ऐल पैल ते थडिचे । बुडतील साच मध्यभागीं ॥४॥
॥४८२४॥
कल्पतरुखालीं । फळें येती मागीतलीं ॥१॥
तेथें बैसल्याचा भाव । विचारुनि बोलें ठाव ॥२॥
द्यावें तें उत्तर । येतों प्रतित्याचा फेर ॥३॥
तुका ह्मणे मनीं । आपुल्याचि लाभहानि ॥४॥
॥४८२५॥
पायरवे अन्न । मग करी क्षीदक्षीण ॥१॥
ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥२॥
जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥३॥
तुका ह्मणे शंका । हित आड या लौकिका ॥४॥
॥४८२६॥
बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥१॥
वायां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥२॥
पाल्याची जतन । तरि प्रांतीं येती कण ॥३॥
तुका म्हणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥४॥
॥४८२७॥
नाहीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥१॥
मुंगियाच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥२॥
तुका म्हणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥३॥
॥४८२८॥
नका धरूं कोणी । राग वचनाचा मनीं ॥१॥
येथें बहुतांचें हित । शुद्ध करोनि राखा चित्त ॥२॥
नाहीं केली निंदा । आह्मी दूषिलेंसे भेदा ॥३॥
तुका म्हणे मज । येणेंविण काय काज ॥४॥
॥४८२९॥
क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारुन ॥१॥
धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥२॥
द्रव्य आणि कन्या । येथें कुळ कर्म सोधण्या ॥३॥
तुका ह्मणे पुण्य गांठी । तरिच उचितासी भेटी ॥४॥
॥४८३०॥
कर्कशसंगती । दु:ख उदंड फजिती ॥१॥
नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥२॥
वचन सेंटावरी । त्याचें ठेवूनि धिक्कारी ॥३॥
तुका ह्मणे पायीं बेडी । पहिली कपाळीं कुर्हाडी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 01, 2019
TOP