बोधपर अभंग - ४९८१ ते ४९९०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥४९८१॥
संसारीं असतां हरीनाम घेसीं । तरीच उद्धरसी पूर्वजांसी ॥१॥
अवघींच इंद्रियें न येतील कामा । जिव्हे रामनामा उच्चारीं वेगीं ॥२॥
शरीरसंपत्ति नव्हे रे आपुली । भ्रांतीची साउली अवघी व्यर्थ ॥३॥
तुका ह्मणे सार हरिनामउच्चार येर्हवी येरझार हरिविण ॥४॥
॥४९८२॥
आधीं देह पाहतां वाव । कैचा प्रारब्धासी ठाव ॥१॥
कां रे रडतोसी माना । लागें विठ्ठलचरणा ॥२॥
दुजेपण झालें वाव । त्रिभुवनासि नाहीं ठाव ॥३॥
तुका ह्मणे खरे पाहें । विठ्ठल पाहोनियां राहें ॥४॥
॥४९८३॥
स्त्रिया धन बा हें खोटें । नागवले मोठे मोठे ॥१॥
म्हणोनि सांडा दोनी । सुख पावाल निदानीं ॥२॥
सर्व दु:खासी कारण । हीं च दोन्हीचीं प्रमाण ॥३॥
आशा सर्वस्वें सांडावी । तेणें निजपदवी पावावी ॥४॥
देहलोभें नाडला । घाला यमाचा पडला ॥५॥
तुका ह्मणे निरापेक्षा । कांहीं न धरावी अपेक्षा ॥६॥
॥४९८४॥
पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा ॥१॥
सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥२॥
ऐसी सहस्त्र त्या सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरीं ॥३॥
पुत्रपौत्रांचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥४॥
चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण ॥५॥
तुका ह्मणे ज्याचे देव बांदवडी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥६॥
॥४९८५॥
पापाचीं संचितें देहासी दंडणा । तुज नारायणा बोल नाहीं ॥१॥
पेरी कडू जिरें मागे अमृतफळें । अर्का वृक्षा केळें कैसीं येती ॥२॥
सुख अथवा दु:ख भोग हा देहाचा । नास हा ज्ञानाचा न करावा ॥३॥
तुका ह्मणे आतां देवा कां रुसावें । मनासी पुसावें काय केलें ॥४॥
॥४९८६॥
भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥१॥
जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥२॥
उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥३॥
तुका ह्मणे चित्त । होय आवडी मिश्रित ॥४॥
॥४९८७॥
तांबियाचें नाणें न चले खर्या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥१॥
करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया ॥२॥
हिरियासारिखा दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न पाहाती ॥३॥
देऊनियां भिंग कामाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥४॥
तुका म्हणे काय नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥५॥
॥४९८८॥
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दुर तों चि भले ॥१॥
ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥२॥
हो कां पिता पुत्र बंधु कोणी तरि । विजाति संग्रहीं धरुं नये ॥३॥
तुका ह्मणे सत्य पाळावें वचन । अन्यथा आपण करुं नये ॥४॥
॥४९८९॥
आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुट ॥१॥
नाहीं कोणासवें बोलणें लागत । निश्चितीनें चित्तसमाधान ॥२॥
लपविलें तें ही ढेंकरें उमटे । खोटियाचें खोटें उर फोडी ॥३॥
तुका ह्मणे निंदा स्तुति दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥४॥
॥४९९०॥
आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदु:ख दोष अंगीं लागे ॥१॥
ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करुं नये पाप भांडवल ॥२॥
क्लेशाची हे चित्तीं राहाते कांचणी । अग्नींत टाकोनी ठाव जाळी ॥३॥
तुका ह्मणे येणें घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 03, 2019
TOP