बोधपर अभंग - ५२५१ ते ५२६०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५२५१॥
मृगजळा ठायीं नाहीं नाहीं जळ । सर्व मिथ्या मूळ माया पाही ॥१॥
नाहीं आन माया जग ब्रह्म पाही । इंद्रियें सर्वही ज्ञाननादें ॥२॥
दोराचें जिवित्व जितांचि पैं मेले । बंधमुक्त बोलें ब्रह्मीं नाहीं ॥३॥
तुका ह्मणे माया चैतन्य दिद्धन । सत्य मिथ्या जाण मुळ सर्व ॥४॥
॥५२५२॥
सबळ हे माया नागवे कवणा । भांबाविलें जनां दाही दिशा ॥१॥
आशा तृष्णा दंभ लागलेसे पाठीं । नेंदीं बैसो हाटीं मोहो ठायीं ॥२॥
कामक्रोध घरा लावितील आगी । निंदा हिंसा दोघी पळताती ॥३॥
लाज पुढें उभी राहिली आडवी । करी ते गाढवी थोर घात ॥४॥
तुका ह्मणे चिंता बांधी गर्भवासीं । वेढोनियां पाशीं चहुंकडे ॥५॥
॥५२५३॥
औषध घेईना असोनियां व्यथा । पथ्य न करितां हानी पावे ॥१॥
संगेंविण करी विदेशगमन । ओळखीवांचोन कोणासंगें ॥२॥
सरळ असतां सुपंथ मारग । व्यर्थ भागाभाग करुं नये ॥३॥
तुका ह्मणे उडी घाली महापुरीं । मुर्ख निरंतरी हित नेणें ॥४॥
॥५२५४॥
सर्वथा नातले परदाराधन । ऐसें ज्याचें मन मनातीत ॥१॥
ऐसें जयापाशीं दृढ निरंतर । अखंड पवित्र तप ज्याचें ॥२॥
तुका ह्मणे सदा तोचि एक शुचि । नेणे महत्वचि थोरपण ॥३॥
॥५२५५॥
कागदीं लिहितां नांवाची साकर । चाटीतां मधूर केंवि लागे ॥१॥
बोलाचीच कढी बोलाचाचि भात । जेविलिया तृप्त केवि होय ॥२॥
तुका ह्मणे तैशा शब्दज्ञानगोष्टी । वायां त्या चावटीं बोलों नये ॥३॥
॥५२५६॥
तुझ्या सर्व गोष्टी ऐकतांचि सुख । करितां हें दु:ख थोर आहे ॥१॥
तैसी हरीभक्ति सुळावरिल पोळी । निवडे तो बळी शूर जाणा ॥२॥
पिंड पोशिलिया विषाचे पायक । वैकुंठनायक कैंचा तेथें ॥३॥
तुका ह्मणे व्हावें देहासी उदार । रुक्मिणीचा वर जोडावया ॥४॥
॥५२५७॥
अमृत अंतरीं गेलिया सहज । लखलखी काज काय काम ॥१॥
साधु सज्जनांचीं तिचि वृत्ति जाण । समान लक्षण आन नाहीं ॥२॥
आत्मज्ञान पूर्ण सर्वा भूतीं अंश । सत्य सदोदित शुद्ध बुद्धि ॥३॥
तुका ह्मणे मूळ ढाळ नाहीं रुप । जें जें भासे दपि तेंचि ब्रह्म ॥४॥
॥५२५८॥
भोळ्या भाविकासी एका भाग्य देतां । भिकेसी लावितां एका मागें ॥१॥
कदा काळीं न कळेचि देणें । राव रंक होणें तुज लागे ॥२॥
गर्वाचिया मुळा समुळ निवारी । ऐसा माझा हरी पांडुरंग ॥३॥
तुका ह्मणे सर्व देवावरी भार । तयाचा विचार तोचि जाणे ॥४॥
॥५२५९॥
पांडुरंग कांहीं न धरी संकोच । उभा पंढरीचे विटेवरी ॥१॥
घरा येती देव नव्हती संदेह । फकीराचा येव जेव्हां होय ॥२॥
होई तो सगुण योगी अनुभवें । घडी घडी देव संभाळील ॥३॥
तुका ह्मणे सर्व देवावरी भार । तयाचा विचार तोचि जाणे ॥४॥
॥५२६०॥
उबगेसी झाली दिवस रजनी । राहिलें लाजोनी न बोलावें ॥१॥
रुचीविण वांया शब्द काय माप । अनादर कोप येत असे ॥२॥
आपुलिया रडे आपुलेंचि मन । दाटे समाधान सर्वकाळ ॥३॥
तुका ह्मणे आम्ही असों जी जाणते । काय करुं रिते वादावाद ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP