मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५२४१ ते ५२५०

बोधपर अभंग - ५२४१ ते ५२५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५२४१॥
एक भाव चित्तीं । कांहीं न लगे ती चित्तीं ॥१॥
कळों आलें जिवें । मज माझियाचि भावें ॥२॥
आठव चि पुरे । सुख अवघें मोहरें ॥३॥
तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥४॥

॥५२४२॥
इळा घेऊनि जे आले । त्यांसीं तरवार न हाले ॥१॥
नव्हे आपुलें उचित । टाका करोनि फजित ॥२॥
आंगोळिया मोडी । त्यासी काय लिले घोडी ॥३॥
नपुंसका साठीं । तुका म्हणे ने घे जेठी ॥४॥

॥५२४३॥
न्हावी परीट जन्माचे । जात साचे नरकीं ॥१॥
जैसा वखड चचरी । तोंडें करी संवादणी ॥२॥
पूर्व जन्मीं शिखा सूत्र । मळ मूत्र अंतरीं ॥३॥
तुका म्हणे करी निंदा । पुढें धंदाधुवट ॥४॥

॥५२४४॥
वदें अनुभववाणी । धरा ध्यानीं आपुले ॥१॥
कैंचि चिका दुध चवी । जरी दावी पांढरें ॥२॥
जाती ऐसें दावी रंग । बहु जग या नांव ॥३॥
तुका म्हणे ते खद्योत । दुंगा त्यांतें आपुल्या ॥४॥

॥५२४५॥
न धांवतां घरीं । करी धनाची चाकरी ॥१॥
होय बैसल्या व्यापार । नको सांडावेंचि घर ॥२॥
रानीं वनद्वीपीं । होती आसतीं तीं सोपीं ॥३॥
तुका म्हणे मोल । देतां कांहीं नव्हे खोल ॥४॥

॥५२४६॥
राजद्वारीं ओळंगणें । काय होउनियां सुनें ॥१॥
आंगीं दावी निष्कामता । जाण पोकळी ती वृथा ॥२॥
कासया मोकळें । शिष्टां भोंवतें गाबाळ ॥३॥
तुका म्हणे ढाळे । बाह्य रंग ते निराळे ॥४॥

॥५२४७॥
थोर म्हणतांचि सुख । सर्व पाहतां चि मुर्ख ॥१॥
काय करावें घोकिलें । वेदपाठ वांयां गेले ॥२॥
वेदीं आहे तें न करी । ब्रह्म नेणे दुराचारी ॥३॥
तुका देखे जिवीं शिवीं । जाणे तें चि अनुभवीं ॥४॥

॥५२४८॥
धर्म वैष्णवांचा खरा । हरीहरा स्मरती ॥१॥
देह लोभ काम क्रोध । गेला भेद नासोनी ॥२॥
शांती सहित ती क्षमा । या अपेक्षा राहिल्या ॥३॥
तुका म्हणे विष्णुदासां । देव पिसा हिंडत ॥४॥

॥५२४९॥
विठोबा सारिखा सांडूनि व्यवहारी । आणिकांची करी आस वांयां ॥१॥
बहुतांसी दिल्हा उद्धार उदारें । निवडीना खरें खोटें कांहीं ॥२॥
याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणिक व्यापार चालती ना ॥३॥
तुका म्हणे माझें हातीचें वचन । यासी बोल कोण ठेवूं शके ॥४॥

॥५२५०॥
तीर्थाचिये आसे पंथ नीट देव । पाविजे तो ठाव अंतराय ॥१॥
ह्मणऊनि भले निश्चळचि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥२॥
संकल्पा आरुढ प्रारब्धेंचि जिणें । कार्या तें कारण वाढतसे ॥३॥
तुका ह्मणे कामा जिरवितां सुख । नाहीं एक मुख हातें पोटीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP