बोधपर अभंग - ४९६१ ते ४९७०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥४९६१॥
परद्रव्यपरनारीचा अभिलास । तेथूनि हारास सर्व भाग्या ॥१॥
घटिका दिवस मास वर्षे लागती तीन । बांधलें पतन गांठोडीस ॥२॥
पुढें घात त्याचा रोकडा शकून । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥३॥
तुका ह्मणे । एकां तडताथवड । काळ लागे नाड परी खरा ॥४॥
॥४९६२॥
तातडीची धांव अंगा आणि भाव । खोळंबा तो वाव निश्चयाचा ॥१॥
ह्मणउनि बरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥२॥
कोरडें वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगीचें तें ॥३॥
तुका ह्मणे बरी झर्याची ते चाडी । सांचण्या खोली कैसी यांची ॥४॥
॥४९६३॥
आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥१॥
उकरडयावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ॥२॥
गाईचा जो भक्ष्य अमंगळ खाय । तीचें दुध काय सेवूं नये ॥३॥
तुका ह्मणे काय सलपटासी काज । फणसांतील बीज काढुनि घ्यावें ॥४॥
॥४९६४॥
राहे उभा वादावादीं । तरी फंदीं सांपडे ॥१॥
लव्हाळयासी कोठें बळ । करिल जळ आपुलें ॥२॥
कठिणासी बळजोडा । नम्र पीडा देखेना ॥३॥
तुका म्हणे सर्वरसीं । मिळे त्यासी गोत तें ॥४॥
॥४९६५॥
ह्मणउनि झाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥१॥
दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥२॥
हातें मुरगाळितां कान । नाहीं भिन्न वेदना ॥३॥
तुका ह्मणे एकांतसुखें । अवघें गोतें गुंतलें ॥४॥
॥४९६६॥
पायां लावुनियां दोरी । भृंग बांधिला लेंकुरीं ॥१॥
तैसा पावसी बंधन । मग सोडविल कोण ॥२॥
गळां बांधोनियां दोरी । वानर हिंडवी घरोघरीं ॥३॥
तुका ह्मणे पाहें । रीस धापा देत आहे ॥४॥
॥४९६७॥
मायबापें सांभाळिती । लोभाकारणें पाळिती ॥१॥
तैसा नव्हे देवराव । याचा कृपाळु स्वभाव ॥२॥
मनासारिखें न होतां । बाळकासी मारी माता ॥३॥
तुका ह्मणे सांगूं किती । बाप लेंकासी मारिती ॥४॥
॥४९६८॥
धन मेळवूनि कोटी । सवें नये रे लंगोटी ॥१॥
पानें खाशील उदंड । अंतीं जासी सुकल्या तोंडें ॥२॥
पलंग न्याहाल्या सुपती । शेवटीं गोवर्या सांगाती ॥३॥
तुका ह्मणे राम । एक विसरतां श्रम ॥४॥
॥४९६९॥
पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे ॥१॥
अनामिका हातीं समर्थांचा सिक्का । न मानितां लोकां येईल कळों ॥२॥
तुका ह्मणे येथें दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावें ॥३॥
॥४९७०॥
सिंदळीसी नाहीं पोराची पै आस । राहे बीज त्यास काय करी ॥१॥
अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देईल कोण काका त्याचा ॥२॥
तुका ह्मणे नाहीं राखायाची चाड । तरी कां लिगाड करुनी घेतो ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 03, 2019
TOP