मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५३३१ ते ५३४०

बोधपर अभंग - ५३३१ ते ५३४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५३३१॥
इच्छा मनीं धनवंता । प्रयत्नता आटाटी ॥१॥
बहु कष्टतां साधनें । कर्मपणें त्यापुढें ॥२॥
रत्न शोधोनियां वांटा । शंख मोठा हातासी ॥३॥
तुका ह्मणे यत्न वृथा । कां संचिता रुसावें ॥४॥

॥५३३२॥
गाढवाचे गांवीं लाथांचा सुकाळ । भुंकोनी कोल्हाळ माजविला ॥१॥
श्वानाचिये घरीं भुंकणें न राहे । स्वभावासी काय करावें त्या ॥२॥
तैसा दुर्जनाचा पीडा करी संग । न साहवे भोग कोणासही ॥३॥
नानापरी पीडा देतां कंटाळेना । छळितां भिईना पाप बुद्धी ॥४॥
माळा टिळे टोपी उपचार भोग । करितां हें अंग पोळतसे ॥५॥
वरी पुष्प वृष्टी शास्त्राचियेपरी । साहिलें हें भारी न बोलेची ॥६॥
तुका ह्मणे भोग प्रारब्धाचे हातीं । मानिला हा चित्तीं धीर ऐसा ॥७॥

॥५३३३॥
न करी जाणतां सांगतां तें हित । आडमार्गे जात दाटोनियां ॥१॥
कैसें न कळे हे अन्न खातां पाणी । न पिये तो प्राणी वांचे कैसा ॥२॥
ग्रासोग्रासीं विष घेतां आवडीनें । वांचला हा कोण कोणेवेळीं ॥३॥
तुका ह्मणे रोग दिधल्या औषधी । पथ्याविण व्याधी जाय कैशी ॥४॥

॥५३३४॥
ज्यानें देव गडी केला । हातीं भोपळा लाधला ॥१॥
जो कां देवाचा सांगाती । त्याची खायाची विपत्ती ॥२॥
तुका ह्मणे भक्तिशीळ । आलें मरणासी मूळ ॥३॥

॥५३३५॥
नेणती तयांनीं सोडियेली वाट । पडलें अव्हाट काळचक्रीं ॥१॥
तयां सोडविता नाहीं दुजा कोणी । आणिक निर्वाणीं देवाविण ॥२॥
देवाविण नाहीं कोणासी आधार । रविविण थार नाहीं जैसा ॥३॥
तुका ह्मणे तया शरण ह्मणतां । कृपा दिनानाथा मग होय ॥४॥

॥५३३६॥
ज्याचे अंतरींझ निर्धार । वदे कोमळ जिव्हार ॥१॥
नाहीं द्वेष जया चित्ता । सर्वाभूतीं त्या समता ॥२॥
सदा निर्मळ अंतर । शुद्ध सत्वाचें आगर ॥३॥
तुका ह्मणे जाणे ऐसें । तैसे विठोबासरिसे ॥४॥

॥५३३७॥
आणुनियां मनीं मानितो विश्वास । असो या सर्वास उदासीन ॥१॥
ठेविलें दुकानीं विश्वासी म्हणोनी । पाहिलिया मनीं एक निष्ठा ॥२॥
सांगितलें तैसें पाळिलें वचन । तें प्रतिपादना शब्दाचिया ॥३॥
न्य़ूनाधिक जें न कळतां घडे । त्याचें त्यासी पडे सांभाळावे ॥४॥
मी तो काय येथें निमित्याचा वाणी । राखे पोतीं धणी ज्याचीं तोच ॥५॥
तुका म्हणे केलें निमित्याचें आड । देवाचें कैवाड देव जाणे ॥६॥

॥५३३८॥
नारायण नारायण । नाहीं ज्ञान याविण ॥२॥
गोविंद गोविंद । भक्तिवाद मानिती ॥२॥
हरीसखा हरीसखा । नाहीं धोका सकळां ॥३॥
तुका म्हणे साह्य देव । नाहीं भेव कदापि ॥४॥

॥५३३९॥
प्रपंचाचे संगे थोर झाली हानी । व्यासंगबंधनीं भूल पडे ॥१॥
तेथें कोणालागीं सोडविना कोणी । जन्मोनियां प्राणी नर्का जाय ॥२॥
सहस्त्र विंचूंची एकचि वेदना । अंगोळिया प्राणा जातेवेळे ॥३॥
हात खोडी पाय विचकती दांत । ताठा भरे व्यस्त शरीर हें ॥४॥
देखोनियां जन भयाभेत मन । अंतरीं वेदना तोचि जाणे ॥५॥
कफ दाटे भारी गर्गरीत कंठ । यातना उत्कंठ होती जीवा ॥६॥
तुका म्हणे प्राण जातानां जाईना । यमाची यातना थोर आहे ॥७॥

॥५३४०॥
हातीं आहे हित होईल तयासी । हाणी हृषिकेशी येऊं नेदी ॥१॥
हिताचा सायास होतें न करिती । हातींचें सांडिती नवल हें ॥२॥
होणारासी बुद्धि होत असे सोई । हेंचि पुढें राही वारी कोणा ॥३॥
होकां भलतेंसे होणार सारिखें । हाचि एक देखे आनंदातें ॥४॥
होय म्हणे तुका ऐसा कोणी प्राणी । ज्याचे ध्यानींमनीं पांडुरंग ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP