बोधपर अभंग - ५२३१ ते ५२४०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५२३१॥
परपीडा सुख मानी सावकाश । बाहिरल्या विष भोगण्याचे ॥१॥
देव गुरुद्रोही ब्राह्मण असतां । प्रत्यक्ष पहा तो अति शूद्र ॥२॥
तुका ह्मणे जाण सहसा तो मुर्ख । नीट धरी देख यमपंथ ॥३॥
॥५२३२॥
तरी निर्भर ते दास । चिंता आस वेगळे ॥१॥
एकीं अवघाचि ठाव । सर्वभाव विठ्ठलीं ॥२॥
तेव्हां निरविलें त्यास । झाला वास त्यामाजि ॥३॥
तुका ह्मणे रुप ध्यावें । नाहीं ठावे दुर्गुण ॥४॥
॥५२३३॥
सान न ह्मणती थोर । दुष्ट नष्ट पापी चोर ॥१॥
सर्व द्यावी एक चवी । तान्ह हरुनी निववी ॥२॥
नेणे कधीं दिसराती । सर्वकळा सर्वाभूतीं ॥३॥
तुका ह्मणे झारी । घेतां तांब्यानें खापरी ॥४॥
॥५२३४॥
वेडे वेडे बहुवेडे । चाखी गोडे चवी ना ॥१॥
देहा लावी घाली वात । झाली रात पालवी ॥२॥
मुल भोंवतें तें भोये । रडे धाय मोकलूं ॥३॥
लेंक वित्त पुसे जगा । कोण सांगा साक्ष तें ॥४॥
शुद्धी आपुलिया नाहीं । जाणे कांहीं आणिकां ॥५॥
तुका ह्मणे ऐसे जन । राखे कोण नरकीं ॥६॥
॥५२३५॥
भवसिंधु काय कोड । दावी वाट पुढें पुढें ॥१॥
भला पांडुरंग । पायजी जो नेदी अंग ॥२॥
मागें उतरी बहुत । पैल तिरीं साध संत ॥३॥
तुका ह्मणे लागवेगें । जाऊं तयाचिया मागें ॥४॥
॥५२३६॥
मन वोळी मना । बुद्धी बुद्धि क्षण क्षणा ॥१॥
मज राखण मी झालों । ज्यानें तेथें चि धरिलों ॥२॥
जे जे जेथें उठी । ते ते तया हातें खुंटी ॥३॥
भाजिली स्वजनी । तुका साक्ष तुरे दोन्ही ॥४॥
॥५२३७॥
नव्हे करितां जें कांहीं । ध्यातां ध्यायीं तें नव्हे ॥१॥
नव्हे जाणवी जें जना । वाटे मना तें नव्हे ॥२॥
त्रास मानी जो कंठाळा । व्यर्थ चाळा तें नव्हे ॥३॥
नव्हे भोंवतें जें भोंवे । नग्न धांवे तें ही नव्हे ॥४॥
तुका म्हणे एक आहे । सर्वा पाहे सहज ॥५॥
॥५२३८॥
एकाचीं उत्तरें । गोड अमृत मधुर ॥१॥
ऐशा देवाच्या विभुती । भिन्न प्रारब्धाची गती ॥२॥
एकाचीं वचनें । कडू अत्यंत तिक्षणें ॥३॥
प्रकारचे तीन । तुका म्हणे केले जन ॥४॥
॥५२३९॥
आपुलें तों कांही । येथें सांगिजेसें नाहीं ॥१॥
परी वाणी वायचळे । छंद करवी बरळे ॥२॥
पंच भूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥३॥
तुका म्हणे भुली । इच्या उफराटया चाली ॥४॥
॥५२४०॥
प्रश्न अक्षराचा केला । फळा आला तेणें तो ॥१॥
तळ सकळांचा धरी । जिवा उरी होईना ॥२॥
लवे फळले तें भारें । पिक खरें आलें तें ॥३॥
तुका म्हणे घाली उडी । भव फेडी पुढें तें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP