मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५२६१ ते ५२७०

बोधपर अभंग - ५२६१ ते ५२७०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५२६१॥
अयाचित वृत्ती देवावरी भार । या नांव साचार खरें व्रत ॥१॥
सांभाळितां देव देह यथाकाळीं । योजिलें कपाळीं प्राप्त होतें ॥२॥
विश्वास जतन धीर राहे मन । सदां समाधान आली वेळ ॥३॥
तेव्हां लाभ असे चिंतन नेमिलें । अलभ्य ठेविलें विश्वंभरें ॥४॥
तुका ह्मणे बळ अंगीं बरें व्हावें । एकचि जाणावें व्रत सार ॥५॥

॥५२६२॥
कासया संकोच चित्ताचि भोंवता । होय तें बहुतां सुख किजे ॥१॥
देवाचें पूजन भुतांचें पालन । मत्सर तो शिण बहुतांचा ॥२॥
रुसावें फुगावें आपुलियावरे । उरला तो हरी सकळही ॥३॥
तुका ह्मणे संतपण याचि नांव । जेणें होय जीव सकळांला ॥४॥

॥५२६३॥
आंधळें तें सांगे सांगितल्या खुणा । अनुभव जाणा प्रगटल्या ॥१॥
नांद्णूक सांगे वडिलांचे बळ । कैसा तो दुर्बळ सुख पावे ॥२॥
तुका ह्मणे नांदे आपुल्या प्रतापें । तयाची लोकांपें स्तुती सांगे ॥३॥

॥५२६४॥
सुगंध ह्मणोनी चोळूं नये फुल । खावूं नये मूल आगडतें ॥१॥
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेद नाद पाहूं नये ॥२॥
मर्कट ह्मणोनी इच्छुं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं नये ॥४॥

॥५२६५॥
देवाचें गौरव न कळे पाठका । अधिकार लोकां नाहीं येर ॥१॥
विठोबाचें नाम सुलभ सोपार । तारी एकसर भवसिंधु ॥२॥
जाण त्या असाध्य मंत्रतंत्रकळा । येर त्या सकळां मुढलोकां ॥३॥
तुका ह्मणे विधीनिषेध लोपला । उच्छेद या झाला मारगाचा ॥४॥

॥५२६६॥
नये दंतकथा येथें सांगूं कोणी । कोरडे ते मानी कोण बोल ॥१॥
अनुभव येथें पाहिजे साचार । न चलती चार आह्मापुढें ॥२॥
वरी कोण मानी रसाळ बोलणें । नाहीं ज्याणें मनें ओळखिलीं ॥३॥
निवडी वेगळें दुध आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥४॥
तुका म्हणे येथें पाहिजे जातीचे । येर गव्हाराचें काम नाहीं ॥५॥

॥५२६७॥
मोक्षा जावयास हेत उपजेल । तरीच भेटेल सद्गुरु तो ॥१॥
मग हो कां भलतैसा साधु कोणी । त्याचिया चरणीं भाव बैसे ॥२॥
क्षुधा असलिया भलतैसें कांहीं । गोड लागे पाही तुका ह्मणे ॥३॥

॥५२६८॥
कोणी नव्हत कोणाचे । अवघे संबंधी देहाचे ॥१॥
देह चाले हा जंवरी । तंव सोयरीं धायरीं ॥२॥
अंतीं न येती कामासी । विचारिती द्रव्यराशी ॥३॥
तुका ह्मणे हरिचें नाम । गातां होय पूर्ण काम ॥४॥

॥५२६९॥
मायबाप आणि बंधु हे सोयरे । चोर हे खाणोरे दु:ख दायी ॥१॥
पदरीं असे धन तंववरी सारीं । नसतां मग दूरी सांडतील ॥२॥
हरीनाम गातां साधू तो भेटेल । विश्रांती होईल सुख मोठें ॥३॥
तुका ह्मणे आह्मी संताचे ते दास । आवडूं विठोबास सर्व भावें ॥४॥

॥५२७०॥
मायबाप बंधू सोईरे श्रीहरी । माझा सुखकारी पांडुरंग ॥१॥
मायबाप काळा हातीं ओगरती । विठो काळाप्रती पाहों नेदी ॥२॥
जन्मवरी आह्मी हरिनाम गावें । वडीलें भुलावें वेव्हारासी ॥३॥
हरिकथा करितां सोयरे हांसती । संत संतोषती तुका ह्मणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP