बोधपर अभंग - ५०७१ ते ५०८०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५०७१॥
चोरटें कांचें निघालें चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥१॥
नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥२॥
बुद्धिहीन नये कांहींचि कारणा । तयासवें जाणा तेंचि सुख ॥३॥
तुका ह्मणे नाहीं ठाऊकें वर्म । तयासी कर्म वोडवलें ॥४॥
॥५०७२॥
बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥
काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकीं तें ॥२॥
दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसी ॥३॥
तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनी बुरबुरी ॥४॥
॥५०७३॥
वैद्य वांचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥१॥
काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥२॥
नवसें कन्यापुत्र होती तरि कां करणें लागे पती ॥३॥
जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥४॥
॥५०७४॥
आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठुर अतिवादी ॥१॥
याति कूळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥२॥
काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग । अंगाचेंच अंग साक्षी देतें ॥३॥
तुका ह्मणे बरी जाती सवें भेटी । नवनीत पोटीं सांठविलें ॥४॥
॥५०७५॥
एक नेणतां नाडलीं । एकां जाणिवेची भुली ॥१॥
बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ काय निकें ॥२॥
दोहीं सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥३॥
तुका ह्मणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥४॥
॥५०७६॥
एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टीं राहावें ॥१॥
होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥२॥
एवढा जगदानी । मागे तुळसी दळ पाणी ॥३॥
आला नांवा रुपा । तुका ह्मणे झाला सोपा ॥४॥
॥५०७७॥
भले ह्मणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरुप ॥१॥
ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥२॥
पाकसिद्धी लागे संचित आइतें । घडतां सोई तें तेव्हां गोड ॥३॥
तुका ह्मणे सांगतांचि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडे तों ॥४॥
॥५०७८॥
मोहोर्याच्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥१॥
नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥२॥
स्वामीचिया अंगें । रुप नव्हे कोणाजोगें ॥३॥
तुका ह्मणे खोडी । देवमनी न देती दडी ॥४॥
॥५०७९॥
येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥
घरीं देवाचे अबोला । त्यासि तेचि सवे त्याला ॥२॥
नाहीं पाहावें लागत । एकाएकींच तें रितें ॥३॥
तुका ह्मणे जन । तयामध्यें एवढें भिन्न ॥४॥
॥५०८०॥
त्रैलोक्य पाळितां उबगला नाहीं । आमचें त्या कायी असे ओझें ॥१॥
पाषाणाचे पोटीं बैसला दर्दुर । तया मुखीं चार कोण घाली ॥२॥
पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥३॥
तुका ह्मणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 03, 2019
TOP