मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५३९१ ते ५४००

बोधपर अभंग - ५३९१ ते ५४००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५३९१॥
संकल्पा विकल्पा द्यावी तिळांजुळी । सुखें वनमाळी आठवावा ॥१॥
आणीक तूं कांहीं न धरीं विचार । राहें निरंतर समाधानें ॥२॥
तुका म्हणे पडे स्वरुपासी मिठी । मग पोटीं पाठीं आत्माराम ॥३॥

॥५३९२॥
कोणा मंचकीं पहुडणें । कोणा भुमीसी लोळणें ॥१॥
कोणा वस्त्रें ढिगावरी । कोणा फाटकी गोधडी ॥२॥
कोणा भोजन घृतापरी । कोणा कुंडयाची भाकरी ॥३॥
कोणी बैसावें वहनीं । कोणी पायीं अनवाणी ॥४॥
जे जे जैशी वेळ पडे । तैसें भोगणेंच घडे ॥२॥
कोणी जन्मावें मरावें । कोणी सायोज्यासी जावें ॥६॥
कोणी सुखदु:ख विसरावें । तुका ह्मणे अक्षयी व्हावें ॥७॥

॥५३९३॥
आतां कळतसे देव । अनुभव अखंड ॥१॥
सत्य सत्यत्व ऐसिया । नसे भया प्राणिया ॥२॥
आन नसे दुजें ऐसें । स्वप्रकाश संचला ॥३॥
कधीं इंद्रिय न मनी । समजुनी राहिला ॥४॥
तुका ह्मणे मोठा । आडफांटा नसावा ॥५॥

॥५३९४॥
कथा भगवंताची सार । सकळ तीर्थाचें माहेर ॥१॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागिरथी ॥२॥
सेतुबंध वाराणसी । पुण्यलाभ हरिकथेसी ॥३॥
तुका ह्मणे संतसंग । सदा कथेचा प्रसंग ॥४॥

॥५३९५॥
अवघाचि देव वेगळें तें काय । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥१॥
अवघाचि दंभ घातलें दुकान । चाळविल जन पोटासाठीं ॥२॥
काय आह्मी आतां पोटचि भरावें । जग चालवावें भक्त म्हूण ॥३॥
तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणोनि यादव दुरी झाला ॥४॥

॥५३९६॥
आधीं मन घेई हातीं । तोचि गणराजा गणपती ॥१॥
मन इंद्रियांचा राजा । त्याची सर्वभावें पुजा ॥२॥
मन जिवाचा प्रधान । मन माझा नारायण ॥३॥
तुका म्हणे मन चंचळ । हातीं येईल गुरुच्या बळें ॥४॥

॥५३९७॥
काय करुनी तीर्थाटण । अंगीं भरले अवगुण ॥१॥
मनसंकल्याची पापें । न जातो तीर्थाचिया वापें ॥२॥
काय करुनियां जप । चित्तीं नाहीं अनुताप ॥३॥
तुका ह्मणे वर्म सोपें । पापें जाती अनुतापें ॥४॥

॥५३९८॥
गुरुच्या सेवेसी ज्यासी हो कंटाळा । पाहूं नये डोळां पतीत तो ॥१॥
हत्यादिक दोष प्रायश्चित्तें जाती । गुरुद्रोह निश्चिती जात नाहीं ॥२॥
तुका म्हणे जरी होय गुरुदया । तेणें जाय वांया दोष त्याचा ॥३॥

॥५३९९॥
सत्य बोले निरंतर । तोच पुण्याचा सागर ॥१॥
देव त्यानें जिंकियेला । तिहीं लोकीं मानवला ॥२॥
सर्वा भूती झाला हीन । टाकुनियां अभिमान ॥३॥
तुका ह्मणे जन्मुनियां । शांतीसुख लाभे तया ॥४॥

॥५४००॥

सहातें जो नाशी साधी नारायण । सन्यासी तो जाण धन्य एक ॥१॥
ब्राह्मण तो जाण जाणे ब्रह्मज्ञान । तोचि नारायण वेदमूर्ती ॥२॥
शेवडा तो जाणा जाणे सारासार । निरंजन पेठ वसविली ॥३॥
मलंग तोचि जाणा साधी निज मन । होऊनी उन्मन बैसलासे ॥४॥
योगि तोचि जाणा जाणे योगकळा । होउनि विमळा निवृत्तीसी ॥५॥
जंगम तोचि जाणा साधी आत्मलिंग । लिंग देहभंग करुनियां ॥६॥
ऐसें षडदर्शनीं जाणें हेंचि वर्म । नसतेंचि मुंडण करुनी काय ॥७॥
तुका ह्मणे जेव्हां गळे अभिमान । तोचि एक जाण धन्य योगी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP